तरुण पिढीचा गुड मॉर्निंग तयारक – फास्टर फेणे

फास्टर फेणे या चित्रपटाने बघता बघता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश केला. तसा हा चित्रपट पाहण्यास आणि त्यावर लिहिण्यास मला अंमळ उशीरच झाला. इंग्रजी आवृत्ती फेल गेलेल्या किंवा बलदंड इंग्रजी वृत्तपत्राच्या जीवावरच चालणाऱ्या मराठी वृत्तपत्रांच्या भाषेत सांगायचे, तर फास्टर फेणेबद्दल लिहिण्यात मी जरा स्लोअरच ठरलो. (येथे इन्व्हर्टेड कॉमा आवश्यक. वाक्यामध्ये बळेच इंग्रजी शब्द कोंबून त्याला कॉमांची महिरप जोडणे, हे स्मार्ट लेखकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे!)

पण म्हणतात ना, देर आए दुरुस्त आए! हा चित्रपट पाहिला आणि मनमुराद मनोरंजन मिळवून झाले. वास्तविक फा. फे. हे नाव ऐकून-वाचून भा. रा. भागवतांच्या लेखनाशी जुळणारे काही तरी बघायला असेल, असे वाटले होते. खासकरून नेफा आघाडीवर फा. फे. वगैरे. प्रत्यक्षात पडद्यार भागवत तर दिसतातच, पण वि. स. खांडेकरही पदोपदी भेटतात. इतकेच काय, जरा आणखी नेट लावला असता तर ओरिसन स्वेट मोर्डेननेही त्याच्यापुढे टॉक केले असते (ओह सॉरी, झक मारली असती असे मला म्हणायचे होते).

सर्वात प्रथम हे सांगायला पाहिजे, की फास्टर फेणे हा मराठी चित्रपटांच्या जातकुळीतील नाही. म्हणजे वर्षात 100 चित्रपट काढले तर त्यातील 98 चाकोरीबाहेरचे काढायचे आणि दोनच चाकोरीतील काढायचे, हा नेम त्याने पाळलेला नाही. एक आकारबद्ध कथा तर त्यात आहेच, पण डिम लाईटमधील चित्रीकरण, मनहूस चेहरे, मख्खता, स्लो मोशनबद्धता वगैरे कलात्मक गोष्टीही त्यात नाहीत. त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये न जाता एकपडदा चित्रपटगृहात गेलात, तर परवडणाऱ्या दरांमध्ये पॉपकॉर्न (किंवा समोसे, उगाच भांडण नको) खात बघण्यासाठी हा मस्त पिक्चर आहे. (येथे खिक-खिक असा आवाज ऐकून घ्यावा आणि लगेच गंभीर होऊन पुढचे वाक्य वाचावे. काय आहे ना, चित्रपटातील व्हिलनचा माझ्यावर खूपच प्रभाव पडला आहे. ते कुलकर्णी साहेब पयल्यांदाच त्यांचं फेस्टिव्हलफेम वावर सोडून हिथं शहरात वावरले आहेत)

मात्र ‘मनोरंजन हे पाप आणि प्रेक्षकांच्या डोक्यावर काही तरी ओझे दिलेच पाहिजे’ हे मराठी चित्रपटांचे व्रत त्याने व्यवस्थित सांभाळले आहे. त्याबाबत त्याने नाळ तोडलेली नाही, असे म्हणावेच लागेल.

रितेश देशमुखांनी सादर केलेला फा. फे. फक्त स्वतःपुरता संस्कारशील नाही, तर त्याच्या अवतीभवतीची पात्रेही तेवढीच संस्कारशील आहेत. भागवत त्याला शेवटी तू मला स्वतःसारखे बनवले आहेस, असे म्हणतात, ते या अर्थाने खरेच आहे. फा. फे. शी संबंध येणारा प्रत्येक माणूस सुविचारांच्या भाषेत बोलतो. वा! ज्या लोकांना सुभाषित आठवत नाहीत, ते वृत्तपत्रांतील अग्रलेख, वाचकांची पत्रे किंवा स्फुट लेखांतील वाक्येच्या वाक्ये उधळत राहतात. त्यामुळे चित्रपट पाहायला येणाऱ्या मुलांची खूप करमणूक येते. आपले मम्मी-पप्पा मोबाईल किंवा पेप्रात काय पाहतात, हे त्यांना प्रत्यक्ष दिसते.

बालकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेलाच चित्रपट असल्यामुळे त्यात तर्काला फारसे वेठीला धरलेले नाही. त्यामुळे डेक्कन चौकीतील पोलिस अधिकारी ज्यांची दाद घेत नाहीत, तेच भागवत थेट पोलिस महासंचालकाला गळ घालून कारवाई करवून घेतात, अशा बाबी कुठेही खटकत नाहीत. तसेच दोन महिन्यांपूर्वी एक्स्पायर झालेला ड्रॉप वापरणारा पोलिस निरीक्षक असो किंवा त्याच्या हातातून बाटली हिसकावून घेणारा फा. फे.ही त्याच्या बालसुलभतेमुळे आपला वाटतो.

मिनिटा-मिनिटाला गुड मॉर्निंग सुविचारांचा रतीब घालून डोके उठविणारे व्हाट्सअप ही आजच्या काळाची वस्तुस्थिती आहे. जगण्याची कला शिकविणारे मेसेज पाठवून आयुष्याचे कलाकंद करणारे मेसेज हीही अशीच वस्तुस्थिती आहे. त्यांना कसे हाताळावे, हा मोबाईलधारकांच्या पुढचा कळीचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाची सोडवणूक फा. फे. हा चित्रपट लीलया करतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. काय सांगावे, उद्या नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील, अनिकेत आमटे यांच्या बरोबरीने उद्या फा.फे.चे संदेशही येऊ लागतील. आज फा. फे. पाहणाऱ्या पिढीला त्यावेळी ते नक्कीच अपरिचित भासणार नाहीत, एवढे मात्र नक्की.

(वि. सू. – तयारक म्हणजे काय, हा प्रश्न विचारू नका. चित्रपटातील एक पात्र म्हणते तसे, म्हंजी काय मला माहीत नाही, पण लय भारी वाटते!)
Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा