मराठमोळा सुपरस्टार

जे जे आपणासी ठावे

Rajinikanth रजनीकांतसाल १९९०. तमिळ भाषेत एक चित्रपट येतो ‘राजादिराजा’. चित्रपटाच्या एका प्रसंगात नायकाने आदिवासी लोकांचे रूप घेतलेले असते. खलनायकाच्या माणसांशी त्याला आदिवासींच्या भाषेत बोलायचे असते (म्हणजे त्यांना न समजणाऱ्या भाषेत). नायक त्यांच्याकडे जातो आणि थेट मराठीत बोलायला सुरूवात करतो. एरवी कुठल्याही मसाला चित्रपटातील एक दृश्य म्हणून हा प्रसंग खपला असता.परंतु येथे मामला अगदी वेगळा होता.चित्रपट तमिळ होता आणि ज्या नायकावर दृश्य चित्रित झाले होते तो मराठी होता. शिवाय त्या दृश्यात हा नायक मराठी म्हणून स्वतःची ओळख दाखवतो, हेही महत्त्वाचे. पण हे महत्त्व बहुतेकांच्या नजरेतून सुटले, कारण चित्रपटाला गर्दी करणाऱ्या बहुतांश तमिळ जनांना मराठीचा गंध नाही आणि तमिळ चित्रपटाचे मराठी लोकांना कौतुक नाही.

या दृश्याचे अप्रूप यासाठी, की २० वर्षे तमिळ चित्रसृष्टीत काढल्यानंतरही त्या नायकाला उपरा म्हणूनच संबोधले जात होते. दुसरीकडे अलम तमिळ चित्ररसिकांनी त्याला डोक्यावर घेतले होते. तो त्यांचा सुपरस्टार होता. तो त्यांचा स्टाईलकिंग होता. तो त्यांचा तलैवा होता – तो त्यांचा रजनीकांत होता.

पडद्यावर किंवा पडद्याबाहेर रजनीकांतने स्वतःची ओळख कधी लपवली नाही. एखाद्या सुपरस्टारला न साजेशा टक्कल पडलेल्या डोक्याने आणि शर्ट-लुंगीवर वावरताना त्याला काही वाटत नाही. त्याच प्रमाणे आपले मूळ काय हेही त्याने कधी लपवून ठेवले नाही.

 तमिळ कशाला, अगदी हिंदीतही रजनीकांतने आपली सगळी वंशावळ उलगडून दाखवली आहे. ‘फरिश्ते’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, तर त्यात तुम्हाला रजनीकांत आपल्या वाडवडिलांची नावे सांगताना दिसेल. या चित्रपटात त्याची अगदी काही मिनिटांची भूमिका आहे. त्यात पडद्यावर आल्यापासून दोन-तीनदा त्याच्या तोंडी एक वाक्य आहे – “मेरा नाम है शिवाजीराव रामोजीराव गायकवाड”!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा