विवेकवाद्यांच्या स्वातंत्र्याचे सोवळे

जे जे आपणासी ठावे

ज्येष्ठ कम्युनिस्ट लेखक आणि कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या मृत्यूला दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या विवेकवादी मंडळीनी परत न्यायाची आरोळी ठोकली. प्रथेप्रमाणे ओंकारेश्वरजवळील पुलावर जमून त्यांनी प्रतिगामी विचार जोर धरत असल्याचा पुकारा केला. फॅसिस्ट विचारांचे प्रस्थ वाढत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची कैफियत मांडली. पूजेच्या सुरूवातीला भटजी केशवाय नमः, माधवाय नमः करतो त्या प्रमाणेच कलबुर्गी, वेमुला इत्यादी नावांचीही उजळणी झाली. हे सगळे नेहमीच्या पटकथेबरहुकूम झाले. त्यात कुठलेही अनपेक्षित वळण नव्हते. मात्र ब्रँडेड पुरोगाम्यांच्या या नेहमीच्या आन्हिकाच्या आगेमागे ज्या घटना घडल्या त्याची नोंद त्यांना घ्यावी वाटली नाही. त्याही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, सहिष्णुता अशा त्यांच्या लाडक्या मुद्द्यांशीच संबंधित होत्या. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हा विवेकवाद्यांचा निरुपाय होता कारण ते त्यांच्या सोवळ्यात बसणारे नव्हते.

ज्या दिवशी ही मंडळी पुण्यात जमून देशातील मोकळेपणाचे वातावरण नष्ट होत असल्याची भाषा करत होते, त्याच्या आदल्याच दिवशी एक घटना घडली होती. खरे तर या लोकांनी तिची दखल घ्यायला हवी होती. पण यांचे दुखणे असे, की देशाच्या वाढत्या दुःस्थितीला फक्त भगवी मंडळी कारणीभूत आहेत, हा त्यांचा लाडका ग्रह आहे. तो कुरवाळ बसणे हेच त्यांचे जीवनधेय आहे. पण ज्या घटना घडतात त्या या ग्रहाला तडे देणारे असतात. मग काय करावे? तर सरळ दुर्लक्ष करावे.

दिल्लीतील रेख्ता फाउंडेशन ही संस्था उर्दू भाषेच्या प्रसारासाठी काम करते. ती दरवर्षी राजधानीत जश्नरेख्ता नावाचा कार्यक्रम आयोजित करते. या वर्षी हा तीन दिवसांचा समारंभ होता. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तारिक फतेह हे लेखक तिथे पोचले होते. पाकिस्तानी मूळ असलेले कॅनडाचे लेखक तारिक फतेह हे आता बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेले नाव आहे. ‘झी न्यूजवाहिनीवरील त्यांचा फतेह का फतवाहा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमात ते इस्लाम धर्म आणि मुस्लिमांच्या धार्मिक मुद्द्यांवर चर्चा करतात.

हे फतेह रविवारी दिल्लीतील रेख्ताच्या कार्यक्रमात पोचले तेव्हा त्यांना अनेक युवकांनी हाकलून लावले. फतेह हे इस्लामविरोधी असल्याचे सांगून त्यांनी घोषणाबाजी केली. हे सुमारे 40 लोक असल्याचे फतेह म्हणतात. शेवटी पोलिसांनी फतेह यांना बाहेर काढले.

खरी गंमत पुढेच आहे. या घटनेवर बोलताना महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले, की फतेह यांना या कार्यक्रमात बोलावलेच नव्हते. ते स्वतःच आले होते. ‘आमची संस्कृती एवढी कमजोर नाही. एखाद्या व्यक्तीमुळे आम्ही आमचे काम थांबवणार नाही. आमचा कार्यक्रम रोजच्या प्रमाणे चालत राहील,’ असे आयोजकांनी निवेदन काढले.

खरे तर हे पुरोगाम्यांचे राखीव कुरण. आपल्या सगळ्या शबनमी, झोळ्या घेऊन, हातवारे करत त्यांनी कॅमेरे व बूम शोधत शोधत प्रतिक्रिया द्यायला हव्यात. परंतु त्यांचा आवाजच निघत नाही. का? तर फतेह यांना रोखणारे टिळेवाले नव्हते म्हणून?

यांच्यापेक्षा जावेद अख्तर प्रामाणिक म्हणायला पाहिजेत. त्यांनी या हल्ल्याचा निषेध तरी केला. 

बरे हे जाऊ द्या. हा धर्माशी संबंधित विषय आहे आणि त्यामुळे पुरोगाम्यांना अवघडल्यासारखे वाटते, हे आपण समजून घेऊ. रेख्ताच्या बरोबर विरुद्ध टोकाला, केरळमध्ये हिंसेचा आगडोंब उसळला आहे आणि एकामागोमाग एक राजकीय खून पडत आहेत. ज्या कॉ. पानसरे यांच्या आठवणीनी स्वातंत्र्यवाद्यांच्या डोळ्यात पाणी येते, त्या पानसरे यांच्या विचाराच्याच लोकांनी हा उच्छाद मांडला आहे. याला वास्तविक कन्नूर मॉडेलअसे नावच देण्यात आले आहे.

केरळमध्ये 1969 मध्ये वडिक्कल रामकृष्णन यांच्या रूपाने पहिला राजकीय बळी पडला. त्यानंतर आतापर्यंत सुमारे 270 स्वयंसेवक आणि सहानुभूतीदारांची हत्या करण्यात आली आहे. यातील 232 जणांची हत्या सीपीएमने केली आहे. मुख्य म्हणजे यातील अनेक बळी हे पूर्वीचे सीपीएम कार्यकर्ते होते. नंतर ते रा. स्व. संघाचे काम करू लागले म्हणून त्यांना संपविण्यात आले. रामकृष्णन यांच्या पहिल्या खुनातील आरोपी असलेले पिनरायी विजयन हे केरळचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

विसंगती अशी, की याच विजयन यांनी या महिन्याच्या सुरूवातीला भाजप आणि मार्क्सवादी साम्यवादी पक्षाची बैठक बोलावली. सीपीएमचे राज्य चिटणीस कोडियेरी बालकृष्णन आणि भाजपचे राज्य अध्यक्ष कुम्मनम राजशेखरन यांनी या बैठकीत भाग घेतला होता. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा खून झाल्यानंतर हिंसक राजकारणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यावर लाज झाकण्याचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री विजयन यांनी ती बैठक घेतली होती. अर्थात त्याची निष्पत्ती शून्य होती.

विशेष म्हणजे कम्युनिस्टांच्या हल्ल्यांचे लक्ष्य फक्त संघ नसते. काँग्रेस आणि आययूएमएल अशा सीपीएमच्या काही सहकारी पक्षांनीही समतेच्या या समरात आपले मोहरे गमावले आहेत.

राज्य सरकारने गेल्या आठवड्यात तुरुंगात असलेल्या तब्बल 1850 कैद्यांची शिक्षा माफ करण्याचा एक प्रस्ताव पाठवला होता. तो सुदैवाने राज्यपाल पी. सदाशिवम (हे योगायोगाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत) यांनी परत पाठवला. राज्याच्या मंत्रिमंडळाने पाठवलेल्या या यादीत सीपीएमच्या अनेक गुंडांची नावे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर यात काही स्पष्टीकरणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले आहे.

उजव्या गटांच्या आक्रमकपणाबद्दल आणि दडपशाहीबद्दल तावातावाने बोलणाऱ्या डाव्या मंडळींच्या हे गावीही नसते, ते का? जगात जुलूम आणि छळ फक्त हिटलरनेच केलेले नव्हते, ते स्टॅलिननेही केले नव्हते. पण आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे असा काही समतावादी विचार त्यात असतो? जेणेकरून या दोन्ही निर्घृणतेमध्ये तरतमभाव करता येईल.

तेव्हा आपल्या अस्तित्वावर गदा आल्याचा भयगंड घेऊन फिरणाऱ्या पुरोगाम्यांनी जरा स्वतःच्या झोळ्यांमध्ये झाकून पाहावे. आपले सोवळे जरा बाजूला ठेवावे आणि खुल्या नजरेने पाहावे, तर न्हाणीघरात सगळेच नागडे असल्याचे त्यांना दिसेल. अन्यथा चटावरचे श्राद्ध उरकावे तशा पुलावरच्या शोकसभा उरकाव्या लागतील.

(फक्त आपल्याच) विचारस्वातंत्र्याची बूज राखल्याचे तेवढेच स्वतःला समाधान. इतरांच्या दृष्टीने ‘अंधश्रद्धा’ यापेक्षा त्याचे फारसे मोल नाही.

6 comments

 • अनेक गोष्टी करायला पाहिजेत पण आम्हाला जे शक्य होते तेवढेच आम्ही करतो. असे पुरोगाम्यांचे म्हणणे असते. ते व्यवहार्यही आहे. अमुक करता मग तमुक का करत नाही? या प्रश्नांना अंत नाही तुम्ही तमुक केले तरच तुम्हाला अमुक करण्याचा नैतिक अधिकार आहे असे म्हणणे पटत नाही मग ते कोणत्याही संघट्नेचे असो. जे शक्य आहे सोयीचे आहे ते करावे बाकी सोडुन द्यावे.

  • पुरोगाम्यांनी अमुकच करावे आणि तमुकच करू नये, असे सांगायचे नाही. पण प्रश्न वेगळा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय, मुस्कटदाबी होतेय याबाबत कोणालाही शंका नाही. परंतु त्यासाठी ज्यांना जबाबदार धरायचे, त्यात ठराविक नावेच का घेता, अशा प्रकारच्या प्रत्येक घटना आणि प्रत्येक प्रवाहाचा समावेश का करत नाही, हा तो प्रश्न आहे. हा निवडक उद्वेग (सेलेक्टिव्ह आऊटरेज) कशासाठी? विचारवंतांच्या हत्या होत आहेत, हे खरे आहे. पण त्या फक्त डाव्या-समाजवादी विचारवंतांच्याच होत आहेत का? त्यांमागे फक्त उजवे गट आहेत का?
   ज्या ज्या वेळेला पुरोगामी/समाजवादी हिटलरचे नाव घेतात त्या त्या वेळी त्यांनी स्टॅलिन/माओचे नाव घेतलेच पाहिजे. ही जबाबदारी त्याना टाळता येणार नाही. ही नावे घेतली, तरच स्वातंत्र्याबद्दलचा त्यांचा कळवळा खरा आहे, असे मानता येईल.

   • एक गोष्ट खरी आहे की कुठलीही चळवळ संतुलित भूमिका घेउ शकत नाही. ते काम विवेकवादी समीक्षक करतात. आपल्या बाजूचे व त्यांच्या बाजूचे अशी तटबंदी कार्यकर्त्यांचा उत्साह निर्माण करण्यात सोयीच असते. एकांडे शिलेदार लागतातच ना!

    • बरोबर. म्हणजे ही आमची बाजू आणि आम्ही ही मांडतो, हे त्यांनी सांगायला पाहिजे. मात्र आमची बाजू तेवढी खरी आणि बाकीचे सगळे ती मोडून काढायला टपले आहेत, हा अभिनिवेश निर्माण करण्यात विवेकवाद्यांची शक्ती खर्च पडत आहे. इतकेच काय, त्यांचे उणेपण कोणी दाखवून दिले, की लगेच त्याला फॅसिस्ट, भक्त, उजवे, अशा शेलक्या शब्दांचा आहेर करण्याची प्रवृत्ती बऱ्यापैकी रूढ झाली आहे. यामुळे त्यांच्याकडे बोट दाखवायला लोकांना वाव मिळतो, हेही त्यांना कळत ना्ही.
     बाकी निष्पक्ष असे कोणीही नसते. कोणत्या ना कोणत्या बाजूने व्यक्ती झुकलेलीच असते. फक्त त्याचे प्रमाण कमी-जास्त होते एवढेच.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा