सिन्हा नि पाटोले तिकडेही आहेत!

जे जे आपणासी ठावे

Amarinder Singhभारतीय जनता पक्षाचे जुने नेते (ज्येष्ठ नव्हे!) यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडल्यापासून सेक्युलर-लिबरलांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. इतके की पुण्यासारख्या ठिकाणी काँग्रेस-एनसीपीच्या कार्यक्रमांची त्यांना आवतणे येत आहेत. अकोल्यात त्यांनी अचानक शेतकऱ्यांचे आंदोलन करून आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देऊन प्रस्थापित नेत्यांची गादी हातोहात पळविली. सांगायचा मुद्दा हा, की भाजपवर (अं हं, मोदींवर!) टीका करतोय ना, मग त्या नेत्याची पार्श्वभूमी वगैरे न बघता त्याला पाठिंबा द्या हा मंत्र सध्या बाजारात जोरात चालतोय.

नोटाबंदी आणि जीएसटीनंतर म्हणे सिन्हा यांचा विवेक जागा झाला. बुडते हे जन बघवे न डोळा अशी त्यांची अवस्था झाली. त्यातून त्यांचा जीभेचा वारू सैल सुटला. इतका, की ‘मोहम्मद बिन तुघलकनेही नोटाबंदी केली होती,’ असा घणाघाती हल्ला करून त्यांनी सगळ्या लिबरलांच्या टाळ्या मिळविल्या. त्यांच्या जोडीने नाना पाटोले हे खासदारही येऊन मिळाले. त्यांनी तर थेट खासदारकीचा राजीनामा देऊन पार शहादतच मिळविली.

पण आपल्या राजकीय साहेबांवर उलटणारे सिन्हा किंवा पाटोले हे काही एकमेव नेते नाहीत. विरोधी शिबिरातही असे नेते आहेत. त्यांच्या विवेकाचे नाणे तर निर्विवाद खणखणीत आहे. पण न हि सुवर्णे ध्वनीस्तादृक यादृक कांस्ये प्रजायते म्हणतात. म्हणजे काशाचा आवाज जसा होतो तेवढा सोनेही करत नाही. त्यामुळेच तो आवाज देशहिताचा असला, तरी त्याला कानाआड करणे ही सेक्युलरांची नियती आहे.

भारताचे भाग्यविधाते म्हणविणारे आणि स्वतःच स्वतःला भारतरत्न बहाल करणारे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व कसे होते, याकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नुकतेच लक्ष वेधले आहे. ज्या चीन युद्धाच्या वेळेस ‘प्रत्यक्ष नेहरू रडले होते’ असे कौतुक तीन-चार पिढ्यांना भरभरून सांगण्यात आले, त्या नेहरूंनी 1962च्या चीनसोबतच्या युद्धात काय दिवे लावले, याचे वाभाडेच अमरिंदर यांनी काढले आहेत. “भारत आणि चीन यांच्यात 1962 साली झालेल्या युद्धात भारतीय लष्कराकडे शस्त्रेच नव्हती आणि भारताने चिनी आव्हानाबाबत डोळेच झाकून घेतले होते,” असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे.

शनिवारी चंडिगड येथे मिलिटरी साहित्य मेळाव्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना अमरिंदर सिंह यांनी 1962 च्या युद्धातील पराभवाबद्दल तत्कालीन सरकारला जबाबदार धरले. चीनकडून हल्ला होण्याचे स्पष्ट संकेत मिळालेले असतानाही त्यावेळी कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हते, की चीन भारतावर हल्ला करेल. त्यामुळे सगळ्यांना अपेक्षा होती तसाच या युद्धाचा निकाल लागला, असे ते म्हणाले.

भारत सरकारच्या तत्काली ‘फॉरवर्ड पॉलिसी’ आणि गुप्तचर संस्थांच्या अपयशाला जबाबदार धरताना सिंह म्हणाले, की भारतीय लष्कर पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरले नव्हते. सर्व ब्रिगेड कमांडरांना बदलण्यात आले होते. त्यांच्याकडे दारूगोळाही नव्हता. रेशन नसल्यामुळे एकदा तर सैनिकांना जीवंत राहण्यासाठी पाणी व मीठावर गुजराण करावी लागली होती.

त्यांचे वाक्य असे आहे, “…राजकीय साहेबांनी (मास्टर्स) महत्त्वाच्या जागी आपल्या मर्जीतील माणसे नेमली होती. अगदी कॉर्प्स कमांडरचीही नेमणूक सरकारने पात्रतेच्या आधारावर नव्हे तर वैयक्तिक मेहरबानी म्हणून केली होती” (“…the political masters in Delhi put men of their choice in key positions, with even the Corps Commander handpicked by the government based not on competence but as a personal favour,” said Singh, a former Army officer. “It was a chaotic scenario, which ended as anyone would have expected it to end.”)

आता त्यावेळी राजकीय साहेब कोण होते, मर्जी कोणाची राखली जात होती आणि नेमणूका कोणी केल्या होत्या हे सर्वांनाच माहीत आहे. त्यासाठी इतिहासाचे भगवे पुनर्लेखनच करायला पाहिजे, असे नाही. अमरिंदर हे कोणी ‘भक्त’ नाहीत. ते स्वतः 1962 साली लष्करात भरती झाले होते आणि 1965 च्या सुरूवातीला त्यांनी राजीनामा दिला होता. पण पाकिस्तांनशी युद्धाचे ढग जमू लागल्यावर ते पुन्हा लष्करात दाखल झाले आणि त्यांनी जवानाची वर्दी अंगावर चढविली. पाकिस्तांनशी युद्ध संपल्यावरच त्यांनी ती उतरविली. हा असा माणूस जर काही सांगत असेल, तर त्यात तथ्य नक्कीच असणार.

आता हिम्मत असेल तर सर्व लिबरलांनी विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठी अमरिंदर सिंह यांचेही कौतुक करावे. नाही तर अगोदरच निखळलेला नैतिकतेचा मुखवटा आणखी कणभर निखळेल!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा