अशोकच वन (नंबर)!

DL6wVpoWkAAXjVbनांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उर्फ अशोक चव्हाण यांनी मिळविलेल्या विजयामुळे अनेकांच्या हर्षाला पारावार उरला नाही, तर अनेकांचे मन खट्टू झाले. या निकालाने काँग्रेसींचे हुरळून जाणे जेवढे साहजिक, तेवढेच धुव्वा उडाल्याच्या धक्क्याने भाजपेयींचे खचून जाणेही चुकीचे. हा निकाल ठरलेलाच होता. त्यात अशोकरावांनी एकहाती सत्ता राखली, असे म्हणणेही योग्य ठरणार नाही, कारण ती कुठे जाणारच नव्हती. “भाजपने विजयाचे चित्र निर्माण केले होते, तसे काही झाले नाही” म्हणून धक्का बसल्याची बतावणी काही जण करत आहेत. पण भाजपने असे चित्र निर्माण केल्याचे दाखवले कोण होते? त्यावेळी तुमचे जमिनीवरचे खबरी कुठे होते?
नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही भाजप जिंकली नव्हतीच. मागच्या पालिकेच पक्षाचे दोनच नगरसेवक होते. मग भाजपचा पराभव झाला आणि परतीचा पाऊस सुरू झाल्याच्या आरोळ्या ठोकण्यात काय अर्थ आहे? ऐन मोदी लाटेतही ज्या नांदेडमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आणि ज्याने शेजारच्या हिंगोलीत आणखी एक निवडून आणण्यास मदत केली, त्या नांदेडमध्ये भाजप जिंकू शकतो हा विश्वास ही फसवणूकच होती. मग स्वतःची ही फसवणूक कोणी करून घेतली?

नांदेड महापालिका ही मुळात अशोकरावांची निर्मिती. या महापालिकेची पहिली निवडणूक 1997 साली झाली, तेव्हापासून ती त्यांनी निगुतीने सांभाळलीय. गेल्या निवडणुकीत मजलिस-ए-इत्तेहादुल-मुसलमीन (एमआयएम) पक्षाने त्यांना काहीसा धक्का दिला. पण त्यांनी त्यातून चटकन धडे घेतले. आज आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांनी अडीच वर्षे त्यांनी शहराचे महापौरपद दिले. मुस्लिम मतदारांना सांभाळून घेतले.

नांदेडमधील विजय हा काँग्रेसचा अजिबात नाही. मतदानाच्या सुमारे 15 दिवस आम्ही काही जण पुण्यात काँग्रेसच्या एका नेत्यासोबत बोलत होतो. त्यावेळी नांदेड आणि अशोकरावांचा उल्लेख झाल्यानंतर या नेत्याने मुरडलेले नाक बरेच काही सांगणारे होते. पक्षाचे नेतृत्व अक्षम ठरले आहे, असे याच नेत्याने म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसच्या ठिकठिकाणी असलेल्या संस्थानिकांची मदत अशोकरावांना मिळण्याचा प्रश्नच नव्हता. स्वतःच घडविलेल्या शिलेदारांसोबत त्यांनी मिळविलेले हे यश आहे. लोकसभेप्रमाणेच त्यांनी याही वेळी आपला झेंडा रोवला. वाळवंटातील मरुद्यानांप्रमाणे (ओअॅसिस) आलेल्या या यशानंतर राहुल गांधींनी अभिनंदन करण्यासाठी घेतलेला वेळ आणि अशोकरावांना श्रेय देताना केलेली कुचराई, यातूनच काय ते कळते. हा विजय एकट्या अशोकरावांचाच. अन् त्यामुळे नांदेडमध्ये त्यांना परास्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचे पद घेण्याचे अनेकांचे मनसुबेही उध्वस्त झाले आहेत.

त्यांना हे यश का मिळाले, याची कारणे शोधताना एक गोष्ट मान्य करावी लागेल की त्यांनी नांदेडमध्ये बऱ्यापैकी काम केले आहे. आज नांदेडमध्ये थोडेसे चांगले रस्ते, काही सभागृह , सार्वजनिक वाहतूक इत्यादी दिसते त्यामागे अशोकरावांचा हात आहे. अर्थात ही सर्व विकासकामे मराठवाड्याच्या फुटपट्टीवर मोजायची आहेत, राज्याच्या किंवा देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत नाही. त्यामुळे उस्मानाबाद, परभणी किंवा बीडच्या माणसाच्या दृष्टीतून नांदेड हे त्याच्या स्वतःच्या शहराच्या मानाने चांगलेच ठरते. याच शहरांत ये-जा करणाऱ्या नांदेडकरांसाठीही म्हणूनच त्यांची व्यवस्था ‘आदर्श’ ठरते.

आणखी वेगळ्या पातळीवर सर्वसामान्यांशी संवाद वैयक्तिक ओळखींवर भर, सहज संपर्क यांद्वारे त्यांनी आपला मतदारवर्ग जपला होता. अशोकरावांनी पहिली निवडणूक 1986 साली (±1) लढली होती. तेव्हापासून आजवर त्यांच्या नावावर एक तरी वादग्रस्त वक्तव्य कोणी दाखवून द्यावे. अशोक चव्हाण हे किती ‘निबर’ राजकारणी आहेत, हे पाहण्यासाठी त्यांची कालची झी 24तासवरची मुलाखत पाहायला हवी.

ashok chavan nanded

दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष या निवडणुकीत होता, असे का म्हणावे एवढ्या भाराभर चिंध्या या पक्षाने जोडल्या होत्या. काँग्रेसच्या सत्ताकाळात विरोधक अनेक पिढ्यांनी भाजपचे काम केले. अन्याय /अत्याचार सहन करीत जेलची हवा खाल्ली (युती असताना डॉ. डी. आर. देशमुख निवडून आले होते तेव्हा सेना-भाजप कार्यकर्त्यांवर झालेला अमानुष लाठीमार अनेकांना आठवत असेल). त्या सगळ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भाजपने वाऱ्यावरच सोडून दिले होते. नांदेड जिल्ह्यात हा पक्ष बाहेरच्या मंडळींनी हायजॅक केल्याची चर्चा अनेक ठिकाणी चालू होती. भाजपची प्रचार मोहीम जर शिवसेनेचा आमदार चालवत असेल, तोच उमेदवार ठरवत असेल, तर लोकांनी काय म्हणून तुम्हाला मते द्यावीत?

गंमत म्हणजे आ. प्रताप पाटील चिखलीकरांचे सध्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नांदेडमध्येच सभा घेतली. तिथे त्यांनी सत्ताधारी काँग्रेसपेक्षा सत्तावाटी भाजपवरच हल्ला केला. तरीही आजही चिखलीकर शिवसेनेतच आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा प्रवास करणारे चिखलीकर उद्या कुठे असतील? अन् लोह्याच्या या आमदाराने नांदेड शहराचे सुकाणू चालवावे? या अशा राजकारणात लोकांनी अशोकरावांकडेच आशेने नाही पाहायचे तर कोणाकडे? मग या फिदायिन राजकारणाचा परिणाम म्हणूनच असावे, शिवसेनाही भुईसपाट झाली. एरवी 1990 पासून शिवसेनेचा आमदार नांदेड शहराने निवडून दिलाय. आज तिथे ती अस्तित्वासाठी झगडतेय. आपले नाक कापले म्हणून काय झाले, शेजारणीला अपशकुन झाल्याचे मनसोक्त सुख आता शिवसेना कुरवाळत बसली आहे. एरवी ‘जशी मुंबईत शिवसेना भक्कम आहे, तसे नांदेडमध्ये काँग्रेसचा पाया मजबूत आहे. हे आम्ही प्रांजळपणे स्वीकारत आहोत आणि अतिशय खुल्यादिलाने अशोक चव्हाण यांचे अभिनंदन करत आहोत,’ असे उद्धव ठाकरे म्हणालेच नसते. शिवसेनेने २०१२ च्या निवडणुकीत ८७,९३० मते घेतली होती, १४ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत केवळ २२,४४० मते त्यांना प्राप्त करता आली आणि १ जागेवर समाधान मानावे लागले. यालाच ते आपले यश समजत आहेत.

अर्थात भाजपच्या या फटफजितीने काँग्रेसने मनातले मांडे खाण्याचे कारण नाही. पालिका, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका इ. सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्यात. याचाच अर्थ लोकांचा पाठिंबा काँग्रेसला जास्त आहे. पण या पाठिंब्याचा चेक वटविण्याची उर्मीच काँग्रेस नेत्यांमध्ये राहिलेली नाही. आपल्या प्रदेशाध्यक्षाच्या महापालिकेत सत्ताधारी पक्षाचे पानिपत होते आणि तरीही याचा आनंद अख्ख्या राज्यात फक्त एका शहरात साजरा होतो. यावरून काँग्रेस संघटना किती मुर्दाड झालीय, याचा अंदाज करता येतो. आपल्या पक्षाला जिंकवायचे आहे, ही भावनाच या लोकांमध्ये राहिलेली नाही. माझ्या संस्था, माझ्या बँका, माझ्या डेयऱ्या टिकल्या पाहिजेत, मग बाकी काँग्रेसचे काहीही होवो, ही यांची मानसिकता! काँग्रेसला जनाधार आहे पण नेत्यांमध्ये ऊर्मी नाही; राष्ट्रवादीत नेते आहेत पण जनाधार नाही असे हे त्रांगडे आहे. मग परतीचा पाऊसच काय, मोसमी पाऊसही फळणार नाही.
Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा