मन म्हणते काँग्रेस बरी, परिस्थिती म्हणते उपयोग नाही…!

जे जे आपणासी ठावे

BJP1For sweetest things turn sourest by their deeds;
Lilies that fester smell far worse than weeds.
(सर्वोत्तम गोष्टी स्वतःच्या कर्माने सर्वात वाईट गोष्टी बनतात. लिलीची सडलेली फुले ही तणापेक्षाही जास्त दुर्गंध पसरवतात) असे शेक्स्पियरने म्हटले आहे. यात लिलीच्या जागी कमळ लिहिले, की भाजपच्या सध्याच्या स्थितीचे यथायोग्य वर्णन होते. युतीची आमची २५ वर्षे सडली, हे शिवसेनेने उच्चरवाने म्हटले असले, तरी भाजपबाबत ते जरा जास्तच प्रकर्षाने जाणवते आहे. एरवी पालिका निवडणुकांच्या निमित्ताने ‘अस्वच्छ भाजप’ मोहिमेचे दर्शन झाले नसते.
भाजपचे अध:पतन एवढे जबरदस्त, की नारायण राणे यांच्यासारखे ‘कर्तबगार’ माणसेही भाजपकडे बोट दाखवू लागली आहेत. भाजप गुंडांचा पक्ष असल्याचे बिनधास्त बोलू लागली आहेत.
“भाजपमध्ये गेलेल्यांचे क्वालिफिकेश काय असते. कुणी ३०२ खाली, कुणी बलात्काराच्या प्रकरणात तर कुणी खंडणीबहाद्दर. या सगळ्यांना कोण पवित्र करून घेत आहे तर साक्षात देवेंद्र…. आणि त्यात फडणवीस. आम्ही पुण्याच्या नानाचे काम ऐकून होते. आता हे फडणवीस,” असे काल शरद पवार पुण्यात म्हणाले. ज्या पवार आणि शर्मा बंधूंच्या संबंधावरून गोपीनाथ मुंडे यांनी रान उठवून राजकारणाच्या गुंडगिरीविरोधात रान उठवले, तेच हे शरद पवार. आज त्यांच्याच तोंडून चार बोल ऐकण्याची वेळ भाजपवर आलीय! ठाण्याचे जितेंद्र आव्हाड यांनी अद्याप तोंड उघडले नाही, ही गनीमत.
“भाजप हा गुंडांचा पक्ष बनला आहे. पुणे सुसंस्कृत शहर आहे, अशा शहरात भाजपला गुंड का लागतात,” असा प्रश्न नारायण राणे यांनी केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. अरे, काय ही दुरवस्था? शिवसेनेचे आपण समजू शकतो. बाळासाहेबांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांनी बऱ्यापैकी माणसाळवले आहे. त्यामुळे गेल्या १०-१५ वर्षांमध्येच ज्यांनी सार्वजनिक जीवन पाहिले आहे, त्यांना उद्धव ठाकरे तळमळीनेच बोलतात हे पटू शकेल. शिवसेनेला गुंडगिरीची शिसारी आहे, असे त्यांना मनापासून वाटू शकेल.

पण नारायण राणे? त्यांनीही डोळे वटारावेत? पण ते वटारतात कारण भाजपने सर्वपक्षीय गुंडांना दिलेले आवतण! त्यातही जातीयवादी गुंड असेल, तर मणिकांचन योगच! हिरे-माणके वेचावित तसे भयानक आणि बदनाम नग भाजपने वेचले आहेत. नॅशनलिस्ट काँग्रेस नावाच्या सरंजामदार व गुंडांच्या खाणीतून त्यातल्या त्यात जास्त वेचणी झाली, हा योगायोगाचा भाग म्हणावा! त्यातही आपण काही वावगे करत आहोत, याची पोचसुद्धा भाजपच्या मंडळीला लागलेली नाही.
“वादग्रस्त आणि गुंड प्रवृत्तीचे लोक पक्षात येत असतील तर त्यांच्यासाठी ही सुधारण्याची संधी आहे. अगोदर त्यांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचं काम करु,” असे सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणतात. तर “महाभारताची लढाई जिंकायची असेल, तर गुंडांना सोबत घेण्यात गैर काय,” असे सोलापूरचे खासदार शरद बनसोडे म्हणतात. आज पुढारीत मुख्यमंत्र्यांची मुलाखत छापून आलीय. त्यात अभ्यासू, सज्जन, तडफदार वगैरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “इतर पक्षांच्या मानाने आमच्या पक्षात आलेले लोक कमी आहेत.”
कमी? ही पालिकेची निवडणूक आहे की जातीयवादी गुंडांच्या भरतीची स्पर्धा आहे? ‘सत्तातुराणां भयं न लज्जा’ म्हणावे तर त्यालाही काही सीमारेषा असावी का नाही?
नरेंद्र मोदी नावाच्या कर्तबगार पुरुषाने कमावून दिलेली पुण्याई महाराष्ट्रातील भाजपच्या मंडळींनी उधळून लावली. एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाने अमाप संपत्ती गोळा करावी आणि त्याच्या नंतरच्या पिढ्यांनी बसून खावून ती धुळीस मिळवावी, असा भाजप कार्यकर्त्यांचा व्यवहार आहे, असे मी मागे एकदा लिहिले होते. मोदींच्या भरवशावर एकदा विजय मिळाला ना, मग मेहनत कशाला करायची असा यांचा खाक्या. काँग्रेसच्या मंडळींनी ७० च्या दशकानंतर हाच मार्ग धरला आणि तो त्यांना आजच्या दुरवस्थेला घेऊन आला. नेते सोन्याच्या ताटात जेवतायत आणि कार्यकर्ते दुसरा घरोबा शोधताहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खासकरून या लोकांनी गांधीनामाच्या विटा टाकून सत्तासेतू उभारण्यात हयात खर्ची घातली आणि पक्षाच्या पायाखालची जमीनच नाहीशी झाली. जी गत काँग्रेसची झाली ती भाजपची होणारच नाही, असे नाही. भुंग्याद्वारे कमळाचे परागसिंचन होत असेलही, पण भुंगा म्हणून ज्याला जवळ केले ती वाळवी निघाली तर? या चिंतेने भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांची झोप उडाली आहे.
पंचतंत्रात कथा आहे – जंगलातील एक कोल्हा फिरत फिरत शहरात जातो. तिथे तो एका निळेच्या पिंपात पडतो. ती नीळ अंगावर लेऊनच तो जंगलात फिरतो आणि त्या जोरावर स्वत:ला जंगलाचा राजा म्हणवतो. कालपर्यंत जाती-जातींमध्ये माथी फिरवत असणारी मंडळी कपाळावर भगवे टिळे लावून येत असतील, म्हणून त्यांचे कोल्हे-लांडगेपण संपले, असे थोडीच आहे? आता हे सगळे नग निवडूनही येतील, पण त्यांचा रंग उडणार नाही याची हमी कोण घेणार?
आता मजूर अड्ड्याप्रमाणे नगरसेवकांची घाऊक महाभरती करून भाजपकडे गल्लीतील आणि त्यांचे आता उत्साहात असलेले कार्यकर्ते भले जमले असतील. पण पक्षभावना निर्माण झाली का, हा खरा प्रश्न आहे. पक्षभावना दूरच, या भरती केलेल्यांची नावे जाहीर केली, तर लोकांमध्ये भीतीच जास्त पसरेल. केवळ नेत्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची संख्या वाढल्याने पक्ष वाढत नाही. जनता दल किंवा शेतकरी कामगार पक्ष या पक्षांकडे नेते काही कमी नव्हते. त्यातील काही तर अजूनही आहेत. परंतु अमीबाप्रमाणे एका मागोमाग एक अशी या पक्षाची शकले का उडाली?

रस्त्याने एक माणूस जात असावा, त्याच्यासोबत काही मुले असावीत, परिचितांपैकी कोणी विचारलेच तर “मी यांचा पालक आहे, पण ही माझी मुले नाहीत,” असे उत्तर त्या व्यक्तीला द्यावे लागावे – भाजपची अवस्था ही अशी झालीय.
खरे तर अशा वेळेस काँग्रेससारख्या पक्षाची खरी गरज होती. कारण मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे शिवसेनेचे धनुष्यबाण हे ‘अनगाईडेड मिसाईल’प्रमाणे भरकटत चालले आहे. एनसीपी हा तर जाणूनबुजून सरंजामदारांचा पक्ष. आज भाजपला जी वाळवी लागली आहे, ती तिथूनच आलेली. राहता राहिला काँग्रेस पक्ष. एकेकाळी सर्वसमावेशक पक्ष अशी प्रतिमा असलेला हा पक्ष. काकासाहेब गाडगीळांसारखे ब्राह्मणही यात बहरले, सुशिलकुमार शिंदेंसारखे दलितही वर आले आणि अ. र. अंतुलेंसारखे मुस्लिमही याच पक्षात सत्तापदावर चढू शकले. त्यामुळे भाजपला धडा शिकविण्यासाठी पर्याय म्हणून चाचपणी करण्यासाठी काँग्रेस कधीही बरी.
पण तसे या पक्षाच्या लोकांना वाटत नाही. कर्मदरिद्रीपणा, करंटेपणा आणि नतद्रष्टपणा यांचे अफलातून मिश्रण सध्याच्या काँग्रेसमध्ये झाले आहे. त्यामुळे तडजोडीवर जगणारे नेते आणि पोटापुरते काम करणारे कार्यकर्ते, अशी त्यांची जोडी जमली आहे. त्यामुळे या स्पर्धेतून त्यांनी अंगच काढून घेतल्यासारखी परिस्थिती आहे. कोणाला कितीही वाटले, तरी काँग्रेस जिंकू शकत नाही. भाजपची झालेली दुर्गती पाहता काँग्रेस बरी, असे मन म्हणत असले तरी एकूण परिस्थिती पाहता त्याचा काही उपयोग नाही…!

6 comments

  • भाजपाच्या बर्‍याच उमेदवारांना संघ स्वयंसेवकही मते देणार नाही आहेत, ह्यावरूनच परिस्थितीचा अंदाज यावा. सर्वांना बहरायची संधी देणारी कॉन्ग्रेस, ती ही कॉन्ग्रेस नव्हे, ही कॉन्ग्रेस (आय), ह्यामध्ये गांधी-नेहरू सर्वोच्च, बाकी सब झूट. देशाला सशक्त भाजपाची आवश्यकता आहे कारण घराणेशाहीशिवाय, कुणीही कार्यकर्ता पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकतो, हे खुद्द मोदींनी सिद्ध केलेलं आहे. आता ही महाराष्ट्र भाजपची काळी कर्मं सगळ्याला काळिमा फासतात का हे पाहायचं. फार वाईट वाटत आहे, देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी काही उत्तम करायची चांगली संधी भाजपा आयातीच्या खेळातून घालवत आहे. संघाची दशकांची मेहनत क्षणात मातीमोल करत आहे.

    • खरे आहे विद्याधर. जनमत बऱ्यापैकी भाजपच्या बाजूनेही असताना केवळ घायकुतीला येऊन भाजपने ही अवदसा आणून ठेवली आहे. त्यामुळेच चांगल्या चांगल्या स्वयंसेवकांनाही भाजपचा उबग आला आहे. ज्यांना आलेला नाही, त्यांना यावा यासाठी भाजप कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच नवनवीन बदनाम चेहरे ओढण्यात येत आहेत. चारित्र्य कमवायला वेळ लागतो, परंतु घालवायला वेळ लागत नाही. भाजपच्या कर्मावरून तेच दिसतेय.
      काँग्रेस चांगली असती, तर उत्तमच होते. परंतु ती तशी राहिली नाही. एखाद्या खासगी कंपनीपेक्षाही तिची अवस्था वाईट करून ठेवली आहे. मात्र कुठल्याही व्यवस्थेत लोकांपुढे एक पर्याय असायला हवा. सध्या तरी भाजप आणि सेना यातच लोकांना निवड करावी लागणार आहे. व्यक्ती पाहून लोक पसंतीचे शिक्के मारतील, दुसरे काय?
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  • फारच उधळलेयत हेय लोक याना ताळ्यावर आणले पाहिजे नाही तर काही खरं नाही. apratim lekh

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा