मुखभंग मतांधांचा

नोव्हेंबर (नगरपालिका निकाल) – नोटाबंदीला अजून 50 दिवस व्हायचे आहेत. लोकांमध्ये नाराजी आहे, पण ती मतपेटीत व्यक्त झाली नाही.
डिसेंबर (दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निकाल) – लोकांमध्ये नाराजी आहे, पण भाजपने मतदारांना भुलवून मते मिळवली आहेत.
फेब्रुवारी (महापालिका निकाल) – लोकांमध्ये नाराजी आहे, पण भाजपने दुसऱ्या पक्षातील लोकांना घेऊन विजय मिळवला आहे. नोटाबंदीचा लोकांना त्रास झाला, पण त्यांनी तो दाखवलेला नाही.
मार्च (विधानसभा निकाल) – नोटाबंदीचा लोकांना त्रास झाला, पण तो त्यांनी मोठा मानला नाही. म्हणून त्यांनी भाजपलाच मते दिली आहेत.

सहा वर्षांपूर्वी जपानमध्ये आलेल्या सुनामीच्या वर्धापनदिनीच चार राज्यांमध्ये आलेल्या ‘सुनामो’ची चर्चा करताना ही वाक्ये मुद्दाम लक्षात घ्यावी लागतील. स्वतःला टोचणाऱ्या मुद्द्यांचाच इतरांनाही त्रास होईल, हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरी आणखी एक नामुष्की आली आहे.

हे लिहीत असताना उत्तर प्रदेशात भाजप 300 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वात 1991 साली राममंदिराची लाट होती, त्यापेक्षाही हे मोठे यश होते. त्यावेळी भाजपने 221 जागा मिळवून बहुमत मिळविले होते. रामाला जमले नाही ते नमोला जमले म्हणले तरी हरकत नाही. या निवडणुकीत राम मंदिराचा उल्लेखही झाला नाही. निव्वळ आणि निव्वळ काम व विकास यांच्या आधारावर मिळालेले हे यश आहे.

उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण ताकत पणाला लावली होती, हे खरेच आहे. एक राजकीय पक्ष म्हणून त्याचे ते कर्तव्यच होते. रमझान आणि दिवाळी, स्मशान आणि कब्रस्तान या मोदींच्या वक्तव्यावर चर्वितचर्वण करणाऱ्यांनी त्या वाक्याचा पुढचा भाग ऐकला असता, तर त्यांनी तोंड किंचित आवरते घेतले असते. ‘अगर होली में पानी आता हो, तो ईद में भी आना चाहिए,’ असे मोदी त्याच भाषणात आणि त्या दोन वाक्यांच्या ओघातच बोलले होते. हे ऐकविण्याची किंवा बोलण्याची तुमची नीयतच नसेल तर त्याला मोदींचा काय ईलाज? शिवाय उत्तर प्रदेशात खरोखर असे होते की नाही, याची पडताळणी करण्याचेही कोणी कष्ट घेतले नाहीत. फक्त मोदीच्या नावावर बोटे मोडणे, हा यांचा एकमेव कार्यक्रम. अन् विचारवंतांच्या अशा ठकबाजीला भीक घालण्याची मोदींना आता तीळमात्रही गरज उरलेली नाही. 

त्यामुळेच ज्या फतेहपूर येथे मोदींनी हे वक्तव्य केले, तेथील सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत. शिवाय, देवबंद या मुस्लिमबहुल मतदारसंघातही विजय मिळवला आहे.

उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य. त्यामुळे येथील निकाल देशातील राजकीय समीकरणे बदलू शकतो. देशभरात अश्वमेधाच्या घोड्यासारख्या उधळलेल्या भाजपच्या रथाला येथे तरी खीळ बसेल, या आशेवर कित्येक जण बसले होते. या राज्यात असलेल्या मोगल संस्कृतीच्या अवशेषाची दुहाईही त्यासाठी आडून-आडून दिली जात होती.

दोन वर्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनेही ही निवडणूक म्हणजे मोदी सरकारची सत्वकसोटी, असेच पत्रपंडितांनी व पॅनेलपंडितांनी मानले होते. शिवाय लोकसभेत भाजपला येथे विक्रमी यश मिळालेले. त्यामुळे येथे भाजप (पर्यायाने नरेंद्र मोदी) तोंडावर आपटतील आणि आपण जीतं मया म्हणून फिरू, असे मनसुबे अनेकांनी बांधले होते. म्हणूनच वाराणसी येथे पंतप्रधानांनी रोड शो केला, तेव्हा ते भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे चिन्ह मानले गेले. “गुजरातमधून आलेलो असलो तरी मी उत्तर प्रदेशचा आहे,” हे सांगण्यासाठी मोदींना स्वतःच्या मतदारसंघात जाणे भाग होते. शिवाय, केवळ सोशल मीडियातच नाही तर मी जनतेशी थेट बांधलेला आहे, हे ठसविणेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यामुळेच अत्यंत धूर्तपणे हा जामानिमा केला गेला.

पण स्वतःला हवे ते पाहण्याचीच सवय लागलेल्यांची वास्तव पाहण्याची सवय तर गेलेलीच होती. त्यात त्यांना हवेचा अंदाजही आला नाही. अन् आता हे नित्याचेच झाले आहे. त्यात नोटाबंदीनंतर आता मोदी जिंकतातच कसे, हे सांगण्यासाठी बाह्या सरसावून तथाकथित राजकीय पंडीत पुढे सरसावत होते.

नोटाबंदीमुळे लोकांना रांगेत उभे राहावे हे खरे, परंतु आज जे पस्तिशीच्या पुढचे लोक आहेत, ते अशा रांगा बघतच मोठे झालेत. रेशनच्या रांगा, गॅसच्या रांगा, रेल्वे तिकिटांच्या रांगा, सिनेमा तिकिटांच्या रांगा अशा रांगांना सरावलेल्या लोकांच्या दृष्टीने ही आणखी एक रांग होती. एवढेच काय, त्यातील जे अगदीच खालच्या आर्थिक स्तरातील लोक होते, त्यांना जन्म देण्यासाठी त्यांच्या आयांनाही रांगेतच उभे राहावे लागले होते (सरकारी दवाखान्याच्या). त्यामुळे रांगा लागल्या म्हणजे जगबुडी आली, असे म्हणून जे लोक धाय मोकलून बायटा देत होते, आज त्यांचा मुखभंग झाला आहे. हा मुखभंग पहिलाही नाही आणि शेवटचाही नाही. कारण आपले मत तेच सत्य (‘हमारा वचन, वही शासन’ – बाहुबली) हे मानून चालणाऱ्यांची फौज नरेंद्र मोदीच्या विरोधात होती. त्यांच्या पदरात जे पडले आहे, ते पडणे अपरिहार्य होते. पण म्हणून त्यांचे डोळे उघडतील याची सुतराम शक्यता नाही.

दशरथाच्या दरबारात आलेल्या अष्टवक्राला पाहून सगळ्या पुरोहित व पंडितांनी त्याची टर उडवली आणि नंतर त्याची विद्वत्ता पाहिल्यानंतर तोंडात बोटे घातली. आज या मोदी-विरोधकांची अवस्था कितीशी वेगळी असेल? शेवटी शेवटी तर या अहंमन्यतेने पराकोटीचा निबरपणा अंगीकारला. त्यांची मजल इथपर्यंत गेली, की बहुतांश एक्झिट पोलनी आणि सट्टा बाजाराने उत्तर प्रदेशात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे सांगितल्यावर एक्झिट पोल खोटे ठरण्याचा इतिहास हाच आपला आधार असे ते सांगू लागले. आशेच्या त्या एकमेव धाग्यावर ते तगून होते. तो धागाही तुटला आहे.

राजकीय जाणत्यांनी (म्हणजे काँग्रेस आणि सेक्युलरिझमवर अंधश्रद्धा असलेले वगळता) त्यातून योग्य तो अर्थ काढला आहे.

 

स्वेटर हे असे वस्त्र आहे, जे लहान मुलांना त्यांच्या आईला थंडी वाजली का घालावे लागते, असे एक इंग्रजी वाक्य आहे. या निवडणूक निकालांचा काही अर्थ काढायचा असेल, तर ते या वाक्यातूनच काढावे लागेल. “आता आम्ही मोठे झालो आहोत, तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही तुमचे स्वेटर घाला,” हा संदेश मतदारांनी दिला आहे.
यश हे फक्त अंधश्रद्धा निर्माण करते, वास्तविक ज्ञान अपयश देते असे म्हणतात. दिल्ली आणि बिहारमध्ये झालेल्या पराभवानंतर घ्यायचे ते धडे भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचेही या निकालांनी दाखवले आहे. त्यांच्या या मवाळपणाचा कितपत लाभ घ्यायचा, हे आता त्यांच्या मित्रपक्षावर अवलंबून आहे.

या जगात फक्त धर्मांध आणि सत्तांध असतात, असे जे मानतात त्यांच्यासाठी एक नवीन वर्गवारी तयार झाली आहे – मतांध. ज्यांचे स्वतःच्याच मतावर, विचारसरणीवर अतोनात प्रेम आहे आणि म्हणून वाहत्या वाऱ्यालाही नाकारण्याचे ज्यांचे धाडस होते, त्यांची ही मतांध वर्गवारी. अर्थात कुपुत्राची माय जशी ‘माझा पोरगा नाही हो तसा, त्याला संगत चांगली नाही’ असे सांगत फिरते, तसेच हे मतांधही स्वतःचे मुसळ पाहणार नाहीत. ‘आम्ही नाही हो हरलो, संपूर्ण जगातच उजवी विचारसरणी फोफावतेय,’ हे वाक्य पुढचे काही दिवस ऐकायची तयारी ठेवा. तोपर्यंत आहेच – कालची निवडणूक बरी होती!
Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा