चारित्र्यमेव जयते

2015121074380पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागले आहेत आणि त्या त्या राज्यात सरकारेही स्थापन झाली आहेत – उत्तर प्रदेशात आज-उद्या सरकार कोणाचे ते समजेल! तरीही हत्तीभोवती फेर धरलेल्या आंधळ्यांप्रमाणे काही लोकांची या निकालांचे विश्लेषण करण्याची हौस काही जात नाही. कोणी जात हेच गमक म्हणते, तर कोणी पैसा हेच इंगित असल्याचे सांगते. प्रत्यक्ष पराभूत झालेल्यांनी तर ‘मतदान यंत्रासुर’ नावाचा एक राक्षस जन्माला घालून सगळे अपयश त्याच्या पदरात टाकले आहे. आम्ही चुकूच शकत नाही, असा दुर्दम्य आत्मविश्वास असल्याशिवाय हा नेमकेपणा अंगात येऊच शकत नाही.

आम्हीच निर्माण केलेल्या मोदी नामक दानवाला लोक भरभरून दान कसे देतील, असा प्रामाणिक आणि कळवळीचा प्रश्नही त्यातील काहींनी केला ( “सगळ्या तज्ञांनी आमच्या विजयाची हमी दिली होती, मग आम्हाला मते का मिळाली नाहीत? – इति ‘आप’लेच अरविंद केजरीवाल!; ‘मुस्लिम भाजपला मते देऊच कसे शकतील’ – इति मायावती)

मात्र मोदी नावाच्या चक्रवर्ती राजाचा घोडा रोखणारे एकापेक्षा अधिक नेते याच भारतात निघाले आहेत, बाहुबळ किंवा धनशक्ती यांपेक्षाही या मतदारांना चारित्र्य हवे आहे, हे दाखवून देणारे निकाल अलीकडेच लागले आहेत, हे पाहण्याची त्यांना गरज वाटत नाही. तेलंगाणातील चंद्रशेखर राव यांनी २०१४ च्या ऐन मोदी लाटेतही आपला गढ राखला, ते कशाच्या बळावर? मोदी सरकारला एक वर्ष झालेले असताना बिहारमध्ये भाजपला वेसण घालणाऱ्या नीतीश कुमारांकडे कुठले जगावेगळे अस्त्र होते? आता पंजाबमध्ये एकीकडे भाजप आणि दुसरीकडे आप अशा दोन-दोन प्रतिस्पर्ध्यांना अमरिंदर सिंहांनी कसे चितपट केले?

दिल्लीच्या सिंहासनावर बसलेल्या नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी शक्ती आहे ते त्यांचे स्वच्छ चारित्र्य. निष्कलंक चारित्र्य या भांडवलाच्या जोरावर वाटेल तो जुगार खेळण्याची जिगर हा खेळाडू बाळगून आहे – नोटाबंदी वगैरे त्यांच्या दृष्टीने मामुली डाव आहे. आता गंमत अशी, की मोदीविरोधी शिबिरांमध्ये बाकी सगळे आहे, फक्त चारित्र्याची तेवढी वानवा आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक म्हणजे बलदंड मोदी विरुद्ध बाजारबुणगे अशी लढाई वाटते. अपेक्षेप्रमाणे ती एकतर्फी निकालात निघते आणि मग विरोधक भुई धोपटत बसतात. त्यातील काही जणांनी प्रशांत किशोर नावाच्या रथात बसून ही लढाई लढण्याचा प्रयत्न केला. आता रथ कितीही भारी असो आणि त्यात महारथी कितीही पराक्रमी असला, तरी लढाई ही फक्त सैनिकांच्या जीवावर लढली जाते. लढाईचा फैसला करते ती सैनिकांची लढाऊ वृत्ती. ही लढाऊ वृत्ती उपजते ती विश्वासातून आणि विश्वास जन्मतो तो सेनापतीच्या चारित्र्यातून.

हे चारित्र्य म्हणजे केवळ भ्रष्टाचारहीनता नाही. राजकीय औदार्य, सामंजस्य आणि विवेक यांचाही त्यात समावेश होतो. तसेच संघर्षात सैनिकांच्या बरोबरीने चालण्याचाही त्यात अंतर्भाव असतो. उदाहरणार्थ नीतीश कुमार घ्या. बिहारमध्ये स्वच्छ आणि कार्यक्षम कारभार करणारे नीतीश कुमार भाजपच्या विरोधात पाय रोवून उभे राहिले. भाजपच्या झंझावाताशी सामना करत राहिले. त्यासाठी लालूप्रसाद यादव यांच्या सारख्या राजकीय लोढण्याला सोबत घेऊन ते जिंकूनही आले. मात्र पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर त्यातला गर्भित लाभही त्यांनी ओळखला. त्यानंतर आजतागायत त्यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. कालही निवडणूक निकालानंतर बाकी सगळे व्यावसायिक राजकारणी उथळ प्रतिक्रिया देत असताना नीतीश कुमार मात्र तोंड भरून मोदींचे कौतुक करत होते. (त्यात मसाला नसल्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली नाही, हा भाग अलाहिदा!)

तिकडे अकाली दल-भाजपला चारी मुंड्या चीत केल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी पंजाबात असाच पोक्त पवित्रा घेतला. पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे सांगून त्यांनी गांभीर्याने कारभार करण्याची ग्वाहीच दिली. याच अमरिंदर सिंहांनी अकाली-भाजपच्या विरोधात पंजाबमध्ये राज्य पिंजून काढले होते आणि काँग्रेसचे नेतृत्व त्यांचे खच्चीकरण करण्यात गुंतली होती. शेवटी निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या हाती नेतृत्वाची सूत्रे देण्यात आली आणि त्यांनी विजयश्री खेचून आणली.

ज्या ज्या ठिकाणी एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला अपार जनसमर्थन मिळाले, तेथे तेथे हेच पाहायला मिळाले. गोव्यात बहुसंख्य आमदारांनी मनोहर पर्रिकर यांच्या नावाचा आग्रह धरला, त्या मागेही हेच कारण होते. अगदी दोन वर्षांपूर्वी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या टोळीला जे घबाड सापडले होते, त्यावेळी वेगळे काय घडले होते?

दिल्लीच्या पहिल्या सत्तेला लाथाडून लोकसभेत मोदींना अपशकुन करायला केजरीवाल उतरले होते. त्यावेळी त्यांनी अनेक चाळे केले – शाईफेकीपासून थपडा खाण्यापर्यंत! साहजिकच लोकांनी त्यांच्यासकट त्यांच्या सगळ्या उमेदवारांना झिडकारले. त्यानंतर त्यांनी शहाणपणाचा मार्ग चोखाळला आणि वावदूकपणा पूर्णत: थांबविला. पुण्यात (विपश्यनेसाठी!) आले असताना मी स्वत: ‘मोदींचा कारभार तुम्हाला कसा वाटतो’ हा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावेळी नुसते स्मित करून त्यांनी टिप्पणी टाळली होती.

त्या वर्षभरातील मेहनतीचे आणि गांभीर्याचे फळ त्यांना मिळाले. दिल्लीत ‘आप’ला घवघवीत यश मिळाले. तेव्हा मात्र केजरीवाल यांनी धारण केलेला संयतपणा हा केवळ आव असल्याचे सिद्ध झाले. सूत्रे हाती घेतल्यापासून या मुख्यमंत्र्याने राज्यपालांशीच उभा दावा मांडला. घटनात्मक तरतुदींवर नौटंकी करायला सुरूवात केली. यांच्या तमाशामध्ये एका व्यक्तीचा जीव गेला, तरी यांना भान आले नाही. अन् आता हेच मतदान यंत्राच्या नावाने खडे फोडत आहेत.

खरे म्हणजे मोदींची मजा आहे. मायावती, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी अशा नाटकी नेत्यांची विरोधावळ त्यांना लाभली आहे. शिवसेना उर्फ उद्धव ठाकरे या ऐतिहासिक पोशाखी पात्राची त्यात भर पडली आहे. खलनायक जेवढा प्रभावी तेवढे नायकाचे नायकत्व अधिक ठाशीव या न्यायाने हे विरोधक जेवढे गोंधळी तेवढे मोदी अधिक उदात्त होत जाणार! ज्यांना हे समजले, ते या तमाशातून बाजूला झाले. ज्यांना आपली भूमिका काय हेच कळालेले नाही, त्यांचा ‘जनकल्याण, गोरगरिबांचा कळवळा’ इत्यादि नावांचा वग गर्दी खेचत राहील.
Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा