ये तो होना ही था!

2015121074380अखेर नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांचे खाटले जमले. लालूप्रसाद यादव यांचा भ्रष्टाचार असह्य झाल्यामुळे त्यांच्याशी संबंध विच्छेद करत असल्याचे नीतीश कुमार यांनी जाहीर केले आहे. अर्थात ते वक्तव्य प्रथमदर्शनी घ्यायला नको.

वीस महिन्यांपूर्वी नीतीश कुमार यांनी काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांना सोबत घेऊन विजय मिळवला होता. त्यावेळी झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत लालूंनी जे वक्तव्य केले होते, ती या महायुतीच्या अंताची नांदीच होती. “सर्व सेक्युलर शक्तींनी मिळून जातीयवादी भाजपचा पराभव केला आहे. आता नीतीश कुमारांनी राष्ट्रीय पातळीवरही नेतृत्व स्वीकारावे आणि मोदींचा पराभव करावा. त्यासाठी आम्ही आमची सर्व ताकत त्यांच्यामागे लावू,” असे त्यांनी जाहीर केले होते. दाढीचे खुंट वाढवून फिरत असले, तरी नीतीश कुमार मुळातच हुशार. या वाक्याने त्यांचे कान टवकारले नसते, तरच नवल.

याचा अर्थ राष्ट्रीय पातळीवर तुम्ही मोदींशी लढा, या मिषाने नीतीशना बिहारबाहेर ढकलायचे आणि इकडे बिहारचे कुरण आपल्या दोन चिरंजीवांसाठी मोकळे सोडायचे, हा लालूंचा बेत होता. तवरून ताकभात काय ते नीतीशनी ओळखले. अन् आल्या दिवसापासून नीतीशची संयुक्त जनता दल व लालूंचा राष्ट्रीय जनता दल यांच्यात उभा दावा कायम राहिला. ही दोन्ही जनता दले राम मनोहर लोहियाप्रणीत काँग्रेसविरोधाची अपत्ये. मात्र 2015 येईपावेतो परिस्थिती एवढी फिरली होती, की त्यांनी काँग्रेसलाही आपल्या महायुतीच्या आगगाडीत बसवून घेतले. कुरकुरत, चरफडत त्यांची वाटचाल होत होती. परंतु आधी नोटाबंदीच्या स्टेशनवर या आगगाडीत पहिला बिघाड झाला आणि नंतर राष्ट्रपती निवडणुकीच्या स्टेशनावर तर गाडीने मुक्कामच ठोकला.

उपमुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप हा निव्वळ बहाणा. उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी म्हणा ना! शहाबुद्दीनसारख्या गुंडाला सोडवून आणून मिरविण्याचा उद्दामपणा यादवांनी केला, तेव्हाच याच उंटाचे गंतव्य ठरले होते. “राष्ट्रपती निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय नीतीश कुमार यांनी घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी लवकर रालोआत यावे, अशी विनंती मी करतो. त्यांच्या येण्याने रालोआही मजबूत होईल, तेही मजबूत होतील आणि बिहारचेही भले होईल,” असे केंद्रीय अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी महिनाभरापूर्वीच म्हणाले होते.

“आम्ही येथे सत्तेसाठी आलेलो नसून मुख्यमंत्री नीतीश कुमार पाच मिनिटांत सत्ता सोडतील. ही महायुती नीतीश कुमारांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांची प्रतिमा निष्कलंक आहे. समता पक्षाच्या काळापासून, गेल्या २५ वर्षांत आम्ही या प्रतिमेशी कोणतीही तडजोड केली नाही आणि पुढेही करणार नाही. काहीही झाले तरी आमची हीच भूमिका राहील,” असे संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते अजय आलोक यांनी दहाच दिवसांपूर्वी सांगितले होते. म्हणाले. बहुतेक हे लोक राष्ट्रपती निवडणूक होण्याची वाट पाहत असावेत.

विशेष म्हणजे आज, २७ जुलै रोजी पाटणा येथे राष्ट्रीय जनता दलाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सभा आयोजित केली होती. ‘भाजपा हटाओ, देश बचाओ’ असे या सभेचे नाव आहे. त्या सभेत सहभागी होण्यासही संयुक्त जनता दलाने नकार दिला होता.
भाजपविरोधी सर्व पक्षांना २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी एकत्र आणणे, हा या सभेचा उद्देश आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे या सभेत उपस्थित असतील, असे राजदने म्हटले होते.

अन् इथेच खरी गोम आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत काहीही करून मोदींना पराभूत करायचे, याचा चंग विरोधी पक्षांनी बांधला आहे. त्यासाठी त्यांनी कोणाची मदत घ्यावी, तर साक्षात डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार मोहीम हाताळणाऱ्याची!

अलेक्झांडर निक्स (Alexander Nix)

डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपद निवडणूक जिंकून देणारे अलेक्झांडर निक्स हे नुकतेच भारतात येऊन गेले. केम्ब्रिज अॅनालिटीका या कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि याच कंपनीने अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार मोहीम राबविली होती. निक्स हे भारतात केवळ 24 तासांसाठी आले होते आणि त्यांनी विरोधकांतील काही नेत्यांच्या मुलाखतीही घेतल्याचे सांगितले जाते.

निक्स यांच्या टीममध्ये एक भारतीय सदस्य आहेत अंबरीश त्यागी. हे अंबरीश म्हणजे नीतीश यांच्या संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी यांचे चिरंजीव. अंबरीश हेही ट्रम्प यांच्या मोहिमेच्या टीमचा भाग होते. बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी नीतीश कुमार यांच्या सोशल मीडिया मोहिमेचे काम सांभाळले होते. अशा परिस्थितीत निक्स यांच्याशी नीतीश यांचा संपर्क होणे स्वाभाविक आहे. अन् ज्या प्रकारे विरोधकांचा तमाशा चालू आहे, त्यावरून मोदींना मात देणे अशक्य असल्याचेही निक्स यांनी सांगितले असणे अत्यंत साहजिक आहे. अन् त्यासाठी निक्स कशाला पाहिजे?
भारतातीलच रामचंद्र गुहांसारखे इतिहास-फॅब्रिकेटर तेच सांगत आहेत. “नीतीश कुमार यांनी मैत्रीपूर्ण पद्धतीने काँग्रेसची सूत्रे हातात घेतली, तर ही स्वर्गातील जोडी जमल्यासारखे होईल . मी असे म्हणत आहे, कारण काँग्रेस हा नेतृत्वविहीन पक्ष आहे आणि नीतीश पक्ष नसलेले नेते आहेत. नीतीश हे ‘पात्र’ नेते आहेत,” असे तेच म्हणाले नव्हते का?

काँग्रेस अध्यक्ष (सोनिया गांधी) जोपर्यंत हे पद नीतीश यांना सोपवत नाहीत तोपर्यंत भारतीय राजकारणात नीतीश किंवा सोनिया यांचे काहीही भवितव्य नाही.तसेच 131 वर्षे जुनी असलेली काँग्रेस आता मोठी राजकीय शक्ती बनू शकत नाही आणि लोकसभेतील तिच्या जागा सध्याच्या 44 वरून फार तर 100 पर्यंत वाढू शकतील, असेही त्यांनी सांगितले. याचाच अर्थ असा, की निबर सेक्युलर नेते आणि त्यांच्याहूनही निबर त्यांचे लेखनिक यांच्याव्यतिरिक्त सर्वांना वाऱ्याची दिशा कळत होती/आहे.

शिवाय मोदी आणि नीतीश यांचे भांडण कधी तात्विक नव्हतेच. हा केवळ अहंकाराचा संघर्ष होता. त्यात दोन्ही बाजूंनी सरशी झाल्याची नोंद केलीय. नरेंद्र मोदींनी लोकसभा जिंकून नीतीश कुमारांचा विरोध कुचकामी असल्याचे दाखवून दिले होते. त्याच प्रमाणे नीतीश कुमारांनी बिहारमध्ये मोदींची सद्दी चालत नसून आपणच तिथले मुखत्यार असल्याचे सिद्ध केले होते. त्यामुळे दोघांचाही एक-एक पॉईंट सर झालाय. आता नीतीशनी दिल्लीत मोदींना अपशकुन करायचा नाही आणि बदल्यात मोदींनी बिहार नीतीश कुमारांसाठी सोडायचा, यावर मांडवली होऊ शकते. आपल्या बळावर मोदी (भाजपला) केंद्रातून हलवू शकत नाही, हे नीतीशना पक्के माहीत आहे. आपला मुख्य शत्रू काँग्रेस आहे आणि नीतीशसारखे सहकारी येत-जात राहतील, हे मोदींना माहीत आहे.

त्यामुळे ‘सागरं वर्जयित्वा कुत्र वा महानद्यवतरति’ या न्यायाने संयुक्त जनता दलाने भाजपचा हात धरला आहे. ये तो होना ही था!

Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा