शिवसेना – सडण्यापासून विघटनापर्यंत

Uncategorized, जे जे आपणासी ठावे
Hardik Patel ShivSena
गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाची घोषणा देऊन कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करून आणि त्याचा हिशेब देण्यात टाळाटाळ करणारा हार्दिक पटेल आता हरलेला जुगारी दुप्पट खेळतो या म्हणीप्रमाणे नवे नाटक करतआहे. गुजराती लोकांना सोडून मराठी माणसाची हाक देत आहे, असे संदेश या गुजराती वृत्तपत्राने म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीच्या काळात आमची २५ वर्षे सडली, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मोठ्या तोऱ्यात म्हणाले खरे. परंतु युती तोडल्यानंतर त्यांचा पक्ष ताजातवाना झाला का? का उलट तो विघटनाकडे सरकू लागला आहे? ज्या प्रकारे भाजपच्या ‘शत्रूं’शी (विरोधक नव्हे!) हा पक्ष चुंबाचुंबी करत आहे, त्यावरून तरी हेच दिसते आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी गुजरातमध्ये आरक्षणासाठी रण करणाऱ्या हार्दिक पटेल याची भेट घेतली. प्रथेप्रमाणे पटेल हाच मातोश्रीच्या उंबरठ्यावर गेला होता. त्यामुळे “सन्मानाने बोलणी व्हायला पाहिजे” ही पहिली अट पूर्ण झाली. त्या नंतर ठाकरे आणि पटेल यांनी पत्रकार परिषदही घेतली.
ज्या वयात इतर युवक स्पर्धा परीक्षा किंवा तत्सम अभ्यास करतात त्या वयात हा माणूस आरक्षण मागतोय. बरे ते आरक्षणही कोणासाठी? तर आधीच सत्ता आणि साधनांच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या पटेल जातीयांसाठी!
“मी नेहमीच शिवसेनेसोबत आहे,” असे पटेलने यावेळी सांगितले. तर “न्याय हक्काच्या लढाईत शिवसेना आणि हार्दिक पटेल एकत्र आहेत,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
कुठले न्याय हक्क? वडापावच्या गाड्या टाकून बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा मुंबापुरीत पिचलेल्या मराठी लोकांना स्वत:च्या पायावर उभे केले, तेव्हा कोणते आरक्षण मागितले होते? दादर चौपाटीवर ज्या खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या आहेत, त्यातील एका गाडीवर ‘मराठी माणूस वडापाव’ अशी पाटी आहे. न्याय्य हक्क याला म्हणतात. स्कॅार्पियो आणि लँडक्रुझरमध्ये फिरुन गोरगरिबांच्या आरक्षणावर डल्ला मारण्यात कसला आलाय हक्क नि बिक्क?
“लोकशाही आणि ठोकशाही हे बाळासाहेबांचे विचार मला भावले असून त्यांच्या विचारधारेवरच वाटचाल करु,” असे पटेलने म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. यातील ठोकशाही ठीक आहे पण लोकशाही? त्याचा आणि पटेलचा संबंध काय? परंतु तो तसा ममता बॅनर्जी नावाच्या आक्रस्ताळ्या आणि कांगावखोर बाईचाही नव्हता. म्हणून तर त्यांच्या सख्ख्या सहकाऱ्यांनीही त्यांच्यापासूध दोन हात दूर राहणे पसंत केले.
172157202मात्र शिवसेनेच्या ज्वलंत हिंदुत्वाची धग एवढी, की या वावदूक महिलेसोबत जाण्यासही तिच्या मनात किंतु आला नाही. मोहरम असल्यामुळे तुम्ही दुर्गापूजा करू नका म्हणणाऱ्या ममता शिवसेनेला जवळच्या ठरल्या; चारा घोटाळ्यात तुरुंगवास घडलेले लालूप्रसाद यादव शिवसेनेला कौतुकास्पद वाटतात (यांची संगत भोवते रे बाप्पा असे म्हणून त्यांचे साथीदार नीतीश कुमार कमळाभोवती पिंगा घालतायत!); मग न्यायालयाने तडीपार केलेला हार्दिक पटेल किस झाड़ की पत्ती? आता उद्या कन्हैया कुमार आणि गँगलाही बोलवा आणि उरलासुरला न्याय्य हक्कही मागून टाका.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखादेखी एकेकाळी इंग्रजी पाट्यांवर काळे फासणाऱ्या शिवसेनेने #DidYouKnow पर्यंत उडी मारली ते समजून घेता येईल. तरुणांपर्यंत पोचायचे झाले, तर मराठीची कास सोडावीच लागते. महाराष्ट्रातील बहुतेक वृत्तपत्रांनी हे त्रिकालाबाधित सत्य असल्याची समजूत करून घेऊन स्वतःचे ‘ब्युटी पार्लरिंग’ करून घेतले नाही का?
मात्र आपली जातकुळी काय, आपला अभिनिवेश काय आणि आपण करतोय का, याचे भान ऐन गद्धे पंचविशीतील तरुणही सोडत नाही. मग पन्नाशीला पोचलेल्या शिवसेनेला ही अवदसा का सुचावी? का स्वतःचे नाक कापून दुसऱ्यांना अपशकुन करणे, यालाच जिगर म्हणतात? शिवसेनेची जिगर ऐसी खाशी, की गुजरात निवडणुकीत उतरल्यास हार्दिक पटेल हाच आमचा नेता असेल, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. धन्य आहेत ते धगधगते अंगार आणि धन्य आहेत ती मनगटे!
आता खरोखर हा पटेल शिवसेनेच्या मदतीला धावून आला काय का स्वतःची घालवलेली पत सावरायला आलाय, हा एक नवा प्रश्न आहे. एरवी शिवसेनेने कधी गुजरातबद्दल आपलेपणा दाखवल्याचे आठवत नाही. उलट नरेंद्र मोदी हेच एकदा मुंबईत आले असताना बाळासाहेब ठाकरेंनी गुजराती आणि मराठी माणसे एकसारखीच असल्याचे सांगितल्याचे आठवते. “मराठी स्त्रीने आरशात पाहिले की ती गुजराती स्त्रीसारखी दिसते,” असे काहीसे ते म्हणाले होते. त्यांच्या या वाक्याला मोदींसहित सर्वांनी दाद दिल्याचेही ‘सामना’ने कौतुकाने छापल्याचे आठवते. अन् तेच शिवसेनेचे चेहरे बाळासाहेबांच्या तसबिरीच्या साक्षीने हार्दिक गळाभेट घेताना दिसते. मग सगळेच चित्र उलटे झाल्यासारखे वाटले तर नवल काय?
एखादा पदार्थ सडल्यानंतर विघटन ही त्याची अपरिहार्य परिणती असते. भाजपच्या चिखलात पंचवीस वर्षे सडल्यानंतर आता शिवसेनेची वाटचाल त्याच दिशेने सुरू झाली काय, असे वाटण्याजोगेच वर्तन झाले हे!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा