हिंदूंच्या भावनांचा स्वीकार केल्याशिवाय बहुमत नाहीच

जे जे आपणासी ठावे

गुजरातमध्ये काँग्रेसने मिळविलेल्या यशामागे जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर व हार्दिक पटेल या जातीय नेत्यांचा जसा हात आहे, तसाच राहुल गांधी यांनी दिलेल्या वेगवेगळ्या मंदिरांचाही हातभार त्याला लागला आहे. याचा उहापोह करणारा लेख विनीत नारायण यांनी संदेश या वृत्तपत्राच्या 20 डिसेंबरच्या अंकात लिहिला आहे. या लेखाचा हा अनुवाद…


गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर एक गोष्ट आता स्पष्ट आहे, की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला पहिल्यांदाच हे कळाले आहे, की हिंदूंच्या धार्मिक भावनांचा जाहीर स्वीकार केल्याशिवाय बहुसंख्यक हिंदू समाजात त्याला स्वीकृती मिळणार नाही. कारण हे, की राहुल गांधींनी यावेळी आपल्या निवडणूक प्रचारात गुजरातच्या प्रत्येक मंदिरात जाऊन देवदर्शन केले. आपण प्रभूला प्रार्थना करू, की काँग्रेसच्या या युवा अध्यक्षावर आणि संपूर्ण पक्षावर ईश्वराची कृपा व्हावी आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्मवादाला सोडण्याची त्यांना सद्बुद्धी द्यावी.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत काँग्रेस आणि अन्य विरोध पक्षांनी अल्पसंख्यकांना आवश्यकतेपेक्षा अधिक महत्त्व देऊन हिंदूंच्या मनात घृणा निर्माण केली आहे. काँग्रेसने हिंदूंकडे लक्ष दिले नाही, असे मी म्हणत नाही. मी तर म्हणतो, की गेल्या 70 वर्षांत हिंदू धर्मस्थळांचा जीर्णोद्धार आणि राममंदिरासारख्या हिंदूंच्या अनेक कामांमध्ये काँग्रेसने चांगला पुढाकार घेतला आहे. पण हिंदूत्वाचा जाहीररीत्या स्वीकार करण्याचा संबंध येतो, तेव्हा काँग्रेस व तिचे नेते त्यापासून दूर पळतात. दुसरीकडे अल्पसंख्यकांसाठी अत्यंत उत्साहाने पुढे येत राहतात, मग ते इफ्तारचे आयोजन असो का हजची सब्सिडी असो किंवा ईदच्या दिवशी जाळीदार टोपी घालून स्वतःचे मुस्लिमप्रेम जाहीर करणे असो. जे काही क्रियाकलाप घडले त्यामुळे असे वाटायला लागले, की मुस्लिम हे काँग्रेसचे जावई आहेत.

आता गुजरातेत तिच्या अध्यक्षाला स्वतःलाच हिंदू धर्माचे महत्त्व पटले आहे आणि ते मंदिरा-मंदिरात जाऊन संतांचे आशीर्वाद घेत आहेत. तेव्हा गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये राजकारणात तिने सर्व धर्मांबाबत समभाव राखावा, याबाबत आत्ममंथन व्हायला हवा. समभाव राखण्याचा अर्थ असा नाही, की बहुसंख्यकांच्या भावनांची उपेक्षा करावी किंवा त्यांना दाबून ठेवावे किंवा त्यांचा जाहीर स्वीकार करण्यापासून दूर राहावे. उलट घडले असे पाहिजे, की भविष्यात प्रायश्चित करण्यासाठी काँग्रेसने गुजरातेतील आपल्या अनुभवांची पुनरावृत्ती करून जाहीर मंचांवरून आपल्या मागील चुकांची भरपाई केली पाहिजे.

गुजरातेतील अनुभव लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही हिंदू धर्माच्या उत्सवांमध्ये उत्साहाने भाग घेतला पाहिजे. त्याच प्रमाणे दिवाळी अने नवरात्री यांसारख्या उत्सवांमध्ये भोजन समारंभांचे आयोजन करून हिंदूंबाबत वाटत असलेला आपला आदर जाहीररीत्या व्यक्त केला पाहिजे. यात नवीन काही नाही. मध्ययुगापासून भारतात ही परंपरा राहिली आहे, की हिंदू राजा मुस्लिमांच्या सणा-उत्सवांमध्ये व मुस्लिम बादशहा हिंदूंच्या सणा-उत्सवांमध्ये खुलेपणाने भाग घेत होते. सर्वधर्म समभावाचा अर्थही हाच आहे.

दुसरीकडे मुस्लिम नेत्यांनीही विचार केला पाहिजे, की त्यांच्या वागणुकीत काय चूक आहे. एकीकडे ते भाजपला धर्मवादी म्हणतात आणि दुसरीकडे आपल्या समुदायाला राज्यघटनेच्या भावनेशी विपरीत परंपरागत कायद्यांनी नियंत्रित करून त्यांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखतात. यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नेहमीच दरी कायम राहते. मुस्लिम नेता जोपर्यंत स्वतःच्या समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडणार नाहीत, तोपर्यंत धर्मवाद संपणार नाही.

Rahul Gandhi temple visitराहुल गांधींनी अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात दावा केला आहे, की ते समाजाला जोडण्याचे काम करतील, तोडण्याचे नाही. राहुल गांधी व त्यांच्या पक्षाने वास्तवात असा प्रयत्न केला, अन्य तमाम धर्मांशी समान व्यवहार करून त्यांना आदर दिला, तर त्याचे दूरगामी परिणाम होतील. भारतीय समाजात सर्व पक्ष एकमेकांशी इतके सरमिसळ झाले आहेत, की कोणा एकाचे दुसऱ्यावर वर्चस्व राहू शकत नाही. पण ही गोष्टही खरी आहे, की काँग्रेस व अन्य विरोधपक्ष मुस्लिमांच्या मोहातून मुक्त झाले आहेत, हा विश्वास जोपर्यंत बहुसंख्यकांच्या मनात निर्माण होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष मजबूत होऊ शकत नाही. तसेही धर्म आणि संस्कृती या गोष्टी समाजाच्या विवेकावर सोडायला हव्यात आणि सरकारचे लक्ष कायदा व सुव्यवस्था, रोजगार निर्मिती, मुलभूत सोईसुविधांचा विस्तार यांच्यावर असायला हवे.

कोणत्याही लोकशाही देशाकरिता किमान दोन राजकीय पक्ष शक्तिशाली असणे गरजेचे असते. मी हे नेहमी म्हणतो, की मूळ चरित्राच्या बाबतीत कोणताही राजकीय पक्ष अपवादरूप नाही. भ्रष्टाचार आणि अनैतिकता ही सर्व पक्षांच्या नेत्यांचे भूषण आहे. ही गोष्ट कोणाला चांगली वाटो की वाईट, परंतु याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. उरली गोष्ट विचारसरणीची तर शरद पवार, अखिलेश यादव, मायावती, रामविलास पासवान, नीतीशकुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, प्रकाशसिंह बादल, फारूक अबदुल्ला यांसारख्या अनेक नेत्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन करून ठेवले आहेत. पण त्यांची जाहीर विचारसरणी आणि आचरण यात काय फरक आहे, हे कोणी सांगू शकेल का? या सगळ्यांचे वर्तन सारखेच आहे आणि ते जनतेला एकच स्वप्न दाखवत आहेत, मग ते एक का नाही होत? तसे झाले, तर भाजप आणि काँग्रेस हे दोन मुख्य पक्ष आमनेसामने असतील. तेव्हा जनतेचा आवाज अधिक ऐकू येईल. संसाधनांची उधळपट्टी कमी होईल, तसेच एकमेकांच्या वर्तनावर ‘चेक अँड बॅलेन्स’चे कामही चालू राहील. तेव्हा गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही येवो, काँग्रेसची शक्ती म्हणून आपल्या पहिल्या भाषणात ज्या लक्ष्यांचा उल्लेख केला होते, ते साध्य करणे हे राहुल गांधींसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच मंदिरांत जाणे, पूजा-अर्चना करणे आणि मस्तकावर टिळा लावणे असे गुजरातप्रमाणे उपक्रम चालू ठेवले तर त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील.

विनीत नारायण

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा