मुबारक हो, आपले आमदार अपात्र ठरले!

जे जे आपणासी ठावे

DF_hYs6UIAAc3Ddअखेर गुजरातेतील उत्कंठामय नाट्यानंतर राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. पौर्णिमेनंतर कलाकलाने क्षीण होणाऱ्या चंद्रासारखा काँग्रेस अस्त पावत होता. त्यात ही किंचित का होईना आशेची तिरीप त्याला दिसली असली तर त्या पक्षाचा हुरूप समजण्यासारखा आहे. मिश्रा बंधूंनी खूप वर्षांपूर्वी गायलेल्या ‘सूरज की गर्मी से तपते हुए मन को मिल जाए तरुवर की छाया’ या गाण्यासारखी त्या पक्षाची अवस्था झाली आहे. जीवाच्या कराराने त्या पक्षाने पराभवाच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला आहे. अर्थात अहमद पटेलसारखा ‘घराण्या’तील माणूस उमेदवार असल्यामुळे पक्षाने ही शर्थ केली. एरवी विजयाला पराभवात बदलण्याची कलाच काँग्रेसने अलीकडे आत्मसात केली आहे. उदा. गोवा, मणिपूर आणि बिहार. काँग्रेस नेतृत्वाने डेल कार्नेजीसारखे “जिंकल्यानंतरही कसे हरावे” असे एखादे पुस्तक लिहिले तर प्रचंड खपेल.

अहमद पटेलांचा विजय त्या पक्षाला दिलासादायक आहे. हा विजय होताना काँग्रेसच्या नेतृत्वाने वरिष्ठांना कशा प्रकारे कळविले असेल. “मुबारक हो, आपले आमदार अपात्र ठरले!” असे काही ते बोलले असतील का? टुकू-टुकू खेळणाऱ्या फलंदाजाला त्याच्या साथी फलंदाजाने धावचित करून कर्णधाराची शाबासकी मिळवावी, तसेच काहीसे त्यांच्या शिबिरात घडले असेल. दुसरीकडे दिल्ली व  बिहारनंतर आणखी एक नामुष्की अमित शहांच्या नावावर जमा झाली आहे.

एरवी राज्यसभेची निवडणूक ती काय आणि तिचे महत्त्व ते काय. पण गुजरातेत नवरात्राच्या दोन-तीन महिन्यांआधीच राजकीय गरबा रंगला आणि सगळी पात्रे आपापले जोडीदार बदलू लागली. मतदानाचा संपूर्ण दिवस तर राजकीय नाट्यालाच वाहिलेला होता. सकाळी मतदानापासून सुरू झालेला चित्रपट शेवटी मध्यरात्रीनंतर दिल्लीत पोचला. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची मते रद्द करण्यासाठी काँग्रेसने आकाशपाताळ एक केले. इकडे भाजपतर्फेही सहा-सहा केंद्रीय मंत्री निवडणूक आयोगाच्या दारात पोचले. शेवटी निवडणूक आयोगाने दोन बंडखोरांची मते रद्द केली आणि काँग्रेसच्या जीवात जीव आला. काँग्रेसच्या लोकसभेतील जागांएवढीच आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वयाएवढीच मते मिळवून अहमद पटेल जिंकले, हा निव्वळ योगायोग!

गुजरात पुराच्या पाण्यात बुडालेला असताना बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये मजा करणाऱ्या पक्षाला लोकशाहीचा विजय झाल्याचा साक्षात्कार झाला. आता पटेल यांच्या विजयानंतर त्या रिसॉर्टमध्ये लोकशाहीचा स्मारक स्तंभ उभारू नये म्हणजे मिळविली – पैसे पुरवायला शिवकुमार आहेतच! काँग्रेसचे एक बरे आहे. तीन डझनांपेक्षा आमदारांना कोंबून ठेवून त्यांच्याकडून मतदान करून घेतल्यानंतर विजय झाला तरी पक्षाच्या दृष्टीने तो नैतिक विजय असतो. एवढे करूनही त्यांचा उमेदवार जेमतेम निवडून आला तरच तो लोकशाही जीवंत असल्याचा पुरावा असतो. अन्यथा मतदान यंत्रे खराब असतात किंवा लोकशाही धोक्यात असते.

खरी मजा तर पुढेच आहे. कार्यकर्त्यांनी भले पक्ष कार्यालयाबाहेर कितीही फटाके फोडले, तरी काँग्रेसची लोकशाही अद्याप रुग्णशय्येवरच असल्याचे हे निकालावरून दिसून येते. गुजरात विधानसभेत एकूण 182 आमदार आहेत. काँग्रेसचे विधानसभेत 57 आमदार होते. त्यातील शंकरसिंह वाघेला व अन्य सहा जणांनी राजीनामा दिला. त्यामुळे त्या पक्षाकडे 51 आमदार उरले होते. मात्र पटेल यांना पक्षाची मते मिळाली 42 आणि अन्य दोन पक्षांची दोन मते मिळाली. त्यामुळे कसेबसे 44 मते मिळवून ते तरले. या दोनपैकी एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचे होते. उमरेठच्या जयंत बोस्की पटेल यांनी अहमद पटेल यांना साथ दिली, तर कुतियाणाच्या आमदाराने भाजपला मत दिले.

वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसवर पटेल यांची आधीपासून भिस्त होती. मात्र मतदानाच्या ऐन आदल्या दिवशी त्या पक्षाने टोपी फिरवून भाजपच्या पारड्यात मत टाकले. अन् अशी टोपी फिरविणारा हा एकमेव पक्ष नव्हता. “मी काँग्रेसमधून मुक्त झाले असलो तरी माझे मित्र अहमद पटेल यांनाच मी मत देणार,” असा छातीठोक दावा मतदानाच्या दोनदिवस आधीपर्यंत शंकरसिंह वाघेला करत होते. पण मतदान करून बाहेर आल्यानंतर त्यांनी जाहीर केले, की अहमद पटेल यांचा पराभव निश्चित आहे, त्यामुळे माझे मत वाया घालवायचे नव्हते म्हणून मी त्यांना मत दिले नाही. शंकरसिंह वाघेलांचे चिरंजीव महेंद्रसिंह वाघेला हे अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. ते आमदार आहेत आणि कालच्या निवडणुकीत त्यांनी मतदानही केले. मत द्यायला आले तेव्हा ते आधी अमित शाह यांच्या पाया पडले आणि मग मतदान केले!

गुजरातेत राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होती. त्यात अमित शाह आणि स्मृति इराणी यांचा विजय निश्चितच होता. प्रश्न होता तो बलवंतसिंह राजपूत यांचा. ते काँग्रेसचेच माजी प्रतोद. त्यामुळे काँग्रेसला सर्व जोर लावावा लागला. म्हणजे शाह किंवा इराणींना पराभूत करायचे किंवा त्यांच्यासाठी निवडणूक अवघड करायची सोडून काँग्रेसला सर्व शक्ती एका जागेसाठी लावावी लागली! ही निवडणूक किती नेटाने लढविली याचा प्रत्यय पटेल यांच्या ट्वीटर खात्याकडे पाहिले तरी येते. सातत्याने ट्वीट करणाऱ्या पटेल यांनी 4 ऑगस्टनंतर थेट काल जिंकल्यावरच ट्वीट केले. यावरून ते या लढाईत किती गुंतले होते, हे दिसून येते.

हा विजय मिळाला खरा, पण काँग्रेसच्या आमदारांवरील नेतृत्वाचा उडालेला विश्वास आणि लोकांचा आदर कुठून आणणार? विधानसभेतील आमदार निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरविता येतीलही, पण विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना कोणाकडून अपात्र ठरविणार? त्यामुळेच रेणुका चौधरी म्हणतात तसे हा विजय झाला असला, तरी काँग्रेसला खूप आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा