धटासी हवे धट, उद्धवासी उद्धव

जे जे आपणासी ठावे

शिवसेनेची सध्याची गत कशी झाली आहे? तर वर्षभर अभ्यास करून एखादा विद्यार्थी परीक्षेत पहिला यावा आणि कॉलेजच्या गदरिंगमध्ये गाणे म्हणणारा पोरगा सगळीकडे भाव खाऊन जावा, तशी.

“मुंबईत महापौर, उपमहापौर अशी कोणतीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा करून आणखी एक डाव टाकला आहे. आधी तर 84 नगरसेवक निवडून आणूनही विजयाचा निखळ आनंद मिळवता आला नाही. त्यावर कडी म्हणजे दुश्मन दुश्मन म्हणून ज्याला जाहीर केले, तो लढायलाच तयार नाही. या परिस्थितीला समर्पक शिवकालीन दाखला देण्यासाठी मर्दांना खूप म्हणजे खूपच अभ्यास करावा लागेल. शक्तीने मिळालेले राज्य युक्तीने करायचा कानमंत्रच त्यांनी जपला आहे.

मुंबई पालिकेतील निवडणुका न लढविण्याचा भाजपचा पवित्रा अजब आहे. वरकरणी तो बुचकळ्यात पाडणारा आहे. काहींनी त्याला मास्टर स्ट्रोक म्हटले आहे, तर काहींनी भाजपची हार. हा निर्णय म्हणजे “भाजपच्या पायाखालील वाळू सरकायला लागल्याचे चिन्ह आहे,” असे ज्यांना वाटते त्यांचा भाजपने सत्कार करायला हवा. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी ३२ पत्रकारांना हवाई वऱ्हाडी बनवून मुंबईहून जालन्याला नेले. त्यापेक्षाही जास्त बडदास्त या लोकांची ठेवायला हवी.कारण अशा लोकांमुळे भाजप नक्की काय करत आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाहीये. त्यांच्या गाफीलपणातच भाजपचे अर्धे यश सामावलेले आहे.

‘गेली अडीच वर्षे शिवसेना उर्फ उद्धव ठाकरे यांनी जे जे केले, ते यापुढे करू नये. केलेच तर ती प्रत्येक गोष्ट मुंबई पालिकेत म्हणजेच शिवसेनेच्या संस्थानात करण्यात येईल,’ हा संदेश मुख्यमंत्र्यांनी यातून दिला गेला आहे. हे एक प्रकारचे साटेलोटे आहे. केवळ भाजपला कमळाबाई असे हिणवून आता चालणार नाही. तुमचीही मुलगी आमच्या घरात नांदणार आहे, असा हा सांगावा आहे. ती सुखाने राहायची असेल, तर कमळाबाईला गुणाने राहू द्या. शिवसेनेचे राजकारण आम्हीही करू शकतो, हे सांगणारा हा निर्णय आहे. नियतीचे जे दान पदरात पडले त्याचा असा उपयोग भाजपने करून घेतला आहे.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. याचा अर्थ मुंबईची गादी शिवसेनेला बहाल करण्याची खेळी दिल्लीतून खेळलेली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या नेहमीच्या शैलीत ती अर्थातच दीर्घकालीन दृष्टीची आहे.

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्वच पातळ्यांवरील निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड मोठे यश मिळाले. मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेच्या घशात आवंढा आणला होता. पक्षाने तेथे 32 वरून 82 जागांवर हनुमान उडी घेतली. त्यामुळे आशिष शेलार, किरीट सोमैय्यां यांच्यासारख्यांचे बाहुही न फुरफुरते तर नवलच. परंतु मुंबईचा गढ आज नाही आणखी पाच वर्षांनी मिळवता येईल. तोपर्यंत उर्वरित महाराष्ट्रात आपले खुंटे बळकट करून घ्यावे, यासाठी भाजपला गरज होती ती उंसतीची. सततच्या निवडणुका आणि शिवसेनेची पिरपिर यांमधून नेमकी हीच उसंत मिळत नव्हती.

SS-BJPस्थायी समिती अध्यक्षपद, सुधार समिती किंवा अन्य कुठल्याही समितीची निवडणूक आम्ही लढविणार नाही. विरोधी पक्षनेतेपदही आम्ही घेणार नाही, असे सांगून भाजपच्या मुखंडांनी ती उसंत विकत घेतली आहे. वर “आम्हाला पारदर्शितेच्या आधारावर जनादेश प्राप्त झाला आहे आणि त्या जनादेशाचा आदर करताना पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमचे सर्व नगरसेवक हे मुंबई महापालिकेत पारदर्शितेचे पहारेकरी म्हणून काम पाहतील,” अशी मखलाशी. म्हणजे आमचा रथ तुमच्या गढीबाहेर बांधतो, पण तुमच्या वतीने लढायला आम्ही येणार नाही. उलट तुमच्या दुस्साहला वेसणच आम्ही घालू.

आता धड मित्रही नाही आणि धड शत्रूही नाही, अशा दुभंग अवस्थेत भाजप शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. थोडक्यात म्हणजे शिवसेनेच्या स्किझोफ्रेनिक राजकारणाची छायाप्रत आपण मुंबईत काढणार आहोत, हे मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या शब्दांत सांगितले आहे. त्याच वेळी भाजप आणि शिवसेना हेच राजकीय रंगमंचावरील मुख्य पात्रे असतील. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशा भूमिका संपलेल्या पात्रांची लुडबूड आता नकोय, हेही स्वच्छ करून टाकले आहे.

ही मात्रा लागू पडल्याची लक्षणे दिसूही लागली आहेत. एकीकडे संजय राऊत सामनातून वर्षा बंगल्यावर उपलोकायुक्त नेमण्याच्या गोष्टी करतात आणि दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करतात. कुठलाही अनमान न करता त्यांच्या चहापानाचा आस्वाद घेतात. पडलेल्या चेहऱ्यानेच का होईना अनिल परब आणि दिवाकर रावते या निर्णयाचे स्वागत करतात. ‘धटासी हवे धट, उद्धटासी उद्धट’ असे रामदास स्वामींनी सांगितले होतेच. आता देवेंद्र फडणवीसांनी त्याता किंचित बदल करून ‘धटासी हवे धट, उद्धवासी उद्धव’ असे केले, असेच म्हणावे लागेल.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा