सूत्रांनी दिलेल्या अफवेनुसार…

जे जे आपणासी ठावे, वेबकारिता

IMG-20170719-WA0010_1पु. ल. देशपांडे यांचा एक प्रसिद्ध विनोद आहे. “अलीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं बातम्यांमध्ये वारंवार छापून येतं. ‘अॅकॅार्डिंग टू सोर्सेस’चे हे मराठी भाषांतर होय. आता उद्या बायकोने काही सांगितले तर मंगळसूत्राने दिलेल्या माहितीनुसार असं म्हणणार का,” अशी कोटी त्यांनी केली होती. पुलं ज्या काळात राहत होते, त्यावेळी सूत्र असो वा मंगळसूत्र, ते काही तरी खरे सांगायचे. आज या सूत्रांनी एवढा उच्छाद मांडला आहे, की त्यांचा हवाला देऊन बातमीपेक्षा बाताच जास्त येत आहेत.

विश्वास नसेल तर गेल्या काही महिन्यांतील बातम्या चाळून पाहा. ‘होणार’, ‘येणार’, ‘करणार’ अशा एखाद्या होराभूषणालाच शोभतील अशा बाजारगप्पा कशा छापून आल्यात याचा एक कोलाजच दिसेल. खासकरून 2014 सालानंतर या प्रकाराला एकदम सुगीच आली. कधी नव्हे एवढी भीती वाटण्याचा, कधी नव्हे एवढा द्वेष जाणवायचा, कधी नव्हे एवढी हिंसा दिसायचा हा काळ. याच काळात छातीठोकपणे हे होणार, ते होणार अशा बातम्या दिसायल्या लागल्या. आता ‘होणार बीट’च्या या बातम्यांवरून जे कधी घडलेच नाही तेही छापण्याएवढे निर्ढावलेपण पेपरवाल्यांकडे आले आहे.

या तीन वर्षांच्या काळात आपण दिलेल्या बातम्यांवरून त्या त्या बीटच्या वार्ताहराने नजर टिकली, तर आपण दररोज एक हूल उठविण्याशिवाय काहीही केलेले नाही, हे त्यांच्या लक्षात येईल. अन् या प्रत्येक हूलीमागे एखादा ‘सूत्र’ लपलेला दिसेल. अगदीच रंगत आणायची असेल तर ‘सूत्रा’च्या जागी ‘उच्चपदस्थ सूत्र’ दिसेल.

बरे यावर कोणी आक्षेप घेऊन ‘तुम्ही कर्तव्याला चुकत आहात’ असे कोणी म्हणण्याची खोटी, माध्यम नामक मखरात बसलेल्या देवाचा कोप झालाच म्हणून समजा. लगेच यांच्या नाकाला मिरच्या झोंबतात. ‘आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला, घाला’ असे ओरडत ही मंडळी गावगन्ना फिरत जातात. इसापच्या ‘लांडगा आला रे आला‘ची आठवण करून देणाराच हा प्रसंग असतो.

कावीळ झालेल्याला सगळीकडे पिवळेच दिसते, तसे बातमीच्या धंद्याच्या मुखंडांना प्रत्येक गोष्टीमागे सोशल मीडियाचा हात दिसतो. विशेषतः भारतात नरेंद्र मोदी आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी धोबीपछाड दिल्यानंतर सोशल मीडियाच्या नावाने ठणाणा करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. पावसाळ्यात बेडकांची संख्या वाढते तशी!

झाले काय, की या मंडळीकडे आतापर्यंत काय छापायचे आणि काय नाही छापायचे याचा निर्णय असायचा. म्हणजेच चांगले काय आणि वाईट काय, हे ठरविण्याचा एकाधिकार त्यांच्याकडे होता. खरे काय आणि खोटे काय, हे त्यांच्याच हातात होते. फेसबुक व ट्वीटरसारख्या संकेतस्थळांमुळे या ढुढ्ढाचार्यांचा एकाधिकारच संपुष्टात आला आहे. इतकेच नाही, तर त्यांची लबाडी व खोटेपणाही उघड झाला आहे.

फेसबुक नसते तर कालची लालकृष्ण अडवानी यांची बातमी खोटी आहे, हे उघड झाले असते का? एवढी हिंमत संपादक आणि प्रकाशकांमध्ये आहे का? सोशल मीडिया हा खऱ्या अर्थाने लोकशाही पद्धतीचा असल्यामुळे तेथे संघटीतपणा नाही. त्यामुळे त्यांना बोल लावणे सोपे आहे. पण वृत्तपत्रे, वाहिन्या व वृत्तसंस्थांनी खोट्या बातम्या देऊन वाचकांची केलेली फसवणूक क्षम्य कसे ठरते? एकट्या पीटीआय या वृत्तसंस्थेने या एका महिन्यात दोन बातम्या खोट्या दिल्या. एक मध्य प्रदेशात डॉक्टरांसोबत ज्योतिषीही सल्ला देणार ही आणि दुसरी उत्तर प्रदेशात योगी सरकारने अंदाजपत्रकात खर्चात कपात केल्याची. बेशरमी एवढी, की आपण खोट्या बातम्या दिल्याचे ना या वृत्तसंस्थेने सांगितले ना ती छापणाऱ्या प्रकाशनांनी.

अर्थात, सोशल मीडिया हा मानवाच्या वास्तविक जीवनाचाच आविष्कार आहे. त्यामुळे माणसाच्या वास्तविक आयुष्यातील गुण-दोष तेथे प्रकटणारच. त्यामुळे भांडखोरपणा, खोटारडेपणा, शिवीगाळ या प्रत्यक्ष जीवनातील गोष्टी तिथे दिसणारच. शिवाय इंटरनेटवर व्यक्ती प्रत्यक्ष हजर नसल्यामुळे ती कोण आहे, याचा पत्ता लागू शकत नाही. त्यामुळे हे सर्व दोष आणखी जास्त प्रमाणात प्रकट होतात. कुठलाही अभ्यास न करता मत प्रदर्शन करणाऱ्यांची येथे चलती असते. परंतु त्यामुळेच ज्यांना ‘शिंपले आणि मोती’ वेगळे करायचे आहेत, त्यांच्यावर जास्त जबाबदारी येते.

खपाऊ बातमीसाठी हपापलेली प्रकाशने आणि केआरएग्रस्त वार्ताहर ही आजच्या माध्यमांची वस्तुस्थिती आहे. हे लोक कोणावर विसंबून निर्धास्तपणे कळफलक बडवतात किंवा बायटा खर्ची घालतात हे मुरब्बी राजकारणी व थैलीशहांना माहीत असते. या सोर्स (सूत्र) नामक बैलाच्या शिंगावर पेटते पलिते लावून वृत्त-बुभुक्षितांचा कात्रज करण्यात येत आहे. वाचक-प्रेक्षक नावाचे मासे सूत्रांच्या गळाला अडकविण्यात येत आहेत. अन् कळसूत्री बनलेले पत्रकार त्यांच्या तालावर नाचत आहेत. येथून पुढे सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार ऐवजी सूत्रांनी दिलेल्या अफवेनुसार असे वाचण्या-ऐकण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा