ही तर विनोदबुद्धीची शोकांतिका!

ज्येष्ठ व्यंगचित्रकार व विचारवंत मंगेश तेंडुलकर नुकतेच गेले. आजूबाजूला खेळकरपणाचे वातावरण कलाकलाने नष्ट होत असतानाच या सदाबहार आणि खऱ्या अर्थाने नटखट कलावंताचे जाणे समयोचितच म्हणावे लागेल. कै. तेंडुलकर यांच्यावर मी आधी लिहिले होते. त्याचा दुवा परवा दिला होता.

तुम्ही म्हातारे होऊ नका!

गेल्या दिवाळीत कलासंस्कृती या दिवाळी अंकासाठी मी एक लिहिला होता. त्याही लेखाची आठवण या निमित्ताने झाली. महाराष्ट्रातील व्यंगचित्रे व व्यंगचित्रकार ही आता दुर्मिळ प्रजाती का होतेय, याची चाचपणी या लेखात केली आहे. तो लेख येथे देत आहे.
……………

cartoon tragedyदोन वर्षांपूर्वीची घटना. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांची संघटना असलेल्या ‘कार्टूनिस्ट कंबाईन’चे वार्षिक संमेलन नांदेड येथे भरले होते. त्यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांनी वृत्तपत्रांतून नाहीशा होणाऱ्या राजकीय व्यंगचित्रांबाबत चिंता व्यक्त केली होती. एकेकाळी रविवारचे आकर्षण असणारे पहिल्या पानावरचे मोठे व्यंगचित्र आधी आतल्या पानांमध्ये आणि नंतर दिसेनासे झाले. यामागे वृत्तपत्रांच्या बदलत्या व्यापारी दृष्टिकोनासोबतच विविध सामाजिक गटांकडून होणारी मुस्कटदाबी हेही कारण असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दररोज चहासोबत हातात घेतल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांचा महत्त्वाचा भाग असलेल्या व्यंगचित्रांबाबत मेहेत्रे यांचे हे निरीक्षण अरण्यरूदनच ठरले. जगाच्या घडामोडींच्या रूक्ष वर्णनात एक खुसखुशीतपणा आणि मार्मिकता आणणाऱ्या व्यंगचित्रांचा मराठी संस्कृतीतील ऱ्हास सुरूच राहीला. आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये एक किरकोळ व्यंगचित्र प्रकाशित झाले आणि त्यावरून गदारोळ झाला. त्यातून ‘सामना’च्या कार्यालयावर दगडफेक झाली. मग आधी खुद्द व्यंगचित्रकार, मग संघटनाप्रमुख आणि नंतर कार्यकारी संपादक अशा काहीशा विचित्र क्रमाने दिलगिऱ्यामागून दिलगिऱ्या आल्या. सरतेशेवटी त्या वृत्तपत्राच्या पुरवणीतून व्यंगचित्राचे हे सदर गाळण्यातच आले. या निमित्ताने दांडगाईने अभिव्यक्तीवर मात करण्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले!

ही माफी शिवसेनेकडून आली, हे खूप काव्यगत आहे. याचे कारण त्या संघटनेच्या पार्श्वभूमीत दडले आहे. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर काही दिवसांतच बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य अत्रे यांच्यात वाद सुरू झाला. ठाकरे हे अद्याप शिवसेनाप्रमुख व्हायचे होते. मात्र अत्रे यांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील दिग्गज म्हणून पूरेपूर मान्यता होती. बाळासाहेब कुंचल्याचे बादशहा तर अत्रे लेखणीचे! रंगाचे फटकारे हे बाळासाहेबांचे शस्त्र होते तर बोचरे शब्द हे अत्र्यांचे. त्यावेळी बाळासाहेबांनी आपल्या कुंचल्याचे कौशल्य पणाला लावून अत्र्यांचा चेहरा आणि डुकराचे शरीर असलेले व्यंगचित्र चितारले. त्याला वरळीचा डुक्कर असे भाष्यही जोडण्यात आले. मार्मिकमध्ये ते प्रकाशित झाले तेव्हा अत्र्यांच्या ते जिव्हारी लागले नसते तरच नवल! याचे कारण म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात अत्र्यांच्या ‘मराठा’मध्येच बाळासाहेबांची व्यंगचित्रे छापून येत असत!

त्यानंतर ‘मार्मिक’च्या पानांवर बाळासाहेबांनी समस्त प्राणी जगत चितारून भल्या-भल्यांची भंबेरी उडवली. त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी पुढे त्यांचा वारसा अनेक वर्षे चालविला. व्यंगचित्र साप्ताहिक हे बिरूद मानाने मिरविणाऱ्या ‘मार्मिक’पासून प्रेरणा घेत मराठी व्यंगचित्रकारांच्या दोन-तीन पिढ्या पुढे आल्या. एवढे, की ‘मार्मिक’मध्ये व्यंगचित्र प्रकाशित झाले नसले तर तो व्यंगचित्रकारच नाही, असा रिवाज बनला. त्याच मार्मिकच्या भगिनी प्रकाशन असलेल्या सामनाने, पर्यायाने शिवसेनेसारख्या लढाऊ संघटनेने शरणागती पत्करावी, हे निश्चितच एक आक्रीत होते.

महाराष्ट्राच्या दृष्टीने हा गदारोळ, त्यातून उद्भवलेली हिंसा यात पहिलेपणाची नवलाई बिलकुल नव्हती. या घटनेच्या बरोबर पाच वर्षांपूर्वी अशाच एका व्यंगचित्रावरून वाद निर्माण झाला होता. त्याही वेळी जातीच्या अंगानेच त्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला होता. फक्त लक्ष्य वेगळे होते. पुणे विद्यापीठातील प्राध्यापक सुहास पळशीकर या प्रसिद्ध विचारवंताला शाई फासण्यापर्यंत त्यावेळी प्रकरण गेले होते. त्यावेळी प्रक्षोभ झाला होता तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पन्नास वर्षांपूर्वी (म्हणजे बाबासाहेबांच्या हयातीतच) प्रकाशित झालेले एक व्यंगचित्र पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यावरून.

त्याच्याही पूर्वी असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकाराच्या कृतीमुळे तर त्याच्यावर थेट देशद्रोहाचा खटला भरला गेला. त्रिवेदीने संसदेचे चित्रण एका शौचालयाच्या स्वरूपात केल्यामुळे त्याच्यावर हे गंडांतर आले होते. मुंबई उच्च न्यायालयानेच जेव्हा सदरचे व्यंगचित्र हे देशद्रोही नसल्याचे स्पष्ट केले, तेव्हा त्याची सुटका झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढल्याबद्दल एका प्राध्यापकाला नोकरी गमवावी लोगली होती.

असे का होते?

व्यंगचित्र ही एक संकेतात्मक कला आहे. त्यात वस्तूचे आहे तसे चित्रण न करता त्याचे प्रतिनिधित्व केलेले असते. विडंबन, अतिशयोक्ती, उपहास ही त्याची अपरिहार्य अंग आहेत. त्यामुळे समजा एखादी गोष्ट आहे तशी न असता वेगळ्या प्रकारे असती, तर काय झाले असते हे मांडण्याचा हक्क व्यंगचित्रकाराला असतोच असतो. एखाद्या कसलेल्या विनोदी – खासकरून उपहासात्मक – लेखकाच्या शब्दांना ते शब्दरूपच दिलेले असते, असे म्हटले तरी चालले असते. ‘आमच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी माझ्या चित्रांशी जुळवून घेतले असते तर मी बऱ्यापैकी व्यंगचित्रकार झालो असतो’ असे स्व. पु. ल. देशपांडे यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, हे येथे उल्लेखनीय ठरेल. मात्र लेखकाने लिहिलेले वाचणार कोण आणि ते समजून त्यावर प्रतिक्रिया तरी देणार किती?

गफलत अशी झालीय, की व्यंगचित्र हे चित्रात्मक असल्यामुळे ते तपशीलात वाचण्याची गरज नसते. दिसते तसे नसते म्हणून जग फसते, असे आपण भले कितीही म्हणू. लोक तर जे दिसते त्यावरच विश्वास ठेवतात. आणि जे डोळ्यांना दिसतेय त्या मागचा निहीत अर्थ समजून न घेता, त्यातील विनोदबुद्धी समजून न घेता प्रत्येक जण त्यावर प्रतिक्रिया द्यायला लागतात. चित्र ही जगातील सर्वात सोपी लिपी आहे. त्यामुळे अगदी बालबुद्धीच्या माणसालाही चित्रात्मक संदेश समजतो आणि चित्रातून काही सांगितले असले तर आपल्याला संपूर्ण समजले आहे, असा त्याचा समजही होतो. आज काल प्रत्येक ऐतिहासिक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या आगे-मागे निदर्शनांचे मोहोळ उठतात, मात्र त्याच ऐतिहासिक गोष्टींच्या छापील पुस्तकांची विक्री सुखेनैव चालू असते. त्यातलाच हा वर म्हटलेला प्रकार होय. म्हणून मग चित्रात साधू दिसला की साधूंचे अपचित्रण झाले, डॉक्टर दिसला की डॉक्टरांची टिंगल उडवली अशी ओरड सुरू होते.

अन् हे फक्त राजकीय व्यंगचित्रांबाबतच होते, असे नाही. मिकी माऊस आणि डोनाल्ड डक या अजरामर पात्रांनी जगभरातील अनेक बालकांचे भावविश्व समृद्ध केले आहे. या निरागस मिकी माऊसला सुद्धा अशा प्रकारच्या निर्बंधातून जावे लागले आहे. ‘मिकीज मेलरड्रॅमर’ नावाचा लघुपट हे याचे उत्तम उदाहरण होय. पूर्वीच्या सोव्हियत संघातील साम्यवादी राजवटीने तेथील व्यंगचित्रकारांवर अनेक निर्बंध लादले होते. त्यामुळेच त्यांनी चित्रांसोबत शाब्दिक भाष्य देणे बंद करून मूकचित्रे काढण्यास सुरूवात केली. यातून एका नव्या कलाप्रकाराचा जन्म झाला.

यातून एकूणच व्यंगचित्रे समजून घेण्यातील आपली अक्षमता सिद्ध होते. एक कला म्हणून व्यंगचित्रांकडे पाहण्याची निकोप दृष्टीचे आपल्याकडे विकसित झालेलीच नाही. दिवंगत आर. के. लक्ष्मण यांनी ‘टनेल ऑफ टाईम’ या आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे, “आपल्याला हसविणारा एक व्यंगचित्रकार म्हणूनच वाचक माझ्याकडे पाहत नव्हते, तर त्यांच्या दृष्टीने मी एक तत्त्वचिंतक, समाज सुधारक, राजकीय तज्ज्ञ इ. प्रकारेही माझ्याकडे पाहत होते…एका वाचकाने एक विशिष्ट रेल्वे गाडी त्याच्या गावाच्या स्थानकावर थांबविण्यासाठीही मला पत्र लिहिले होते.” यातून व्यंगचित्रकाराकडे आपला समाज कोणत्या नजरेने पाहतो, याची कल्पना येईल.

आता आपण परत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येऊ. मार्मिकमधील व्यंगचित्रांनी हळूहळू मुंबईतील मराठी माणसावर गारूड निर्माण केले आणि त्या व्यंगचित्रांच्या कर्त्याला, म्हणजे बाळासाहेबांना अनेक गुण येऊन चिकटू लागले. व्यंगचित्रातून सरकार आणि दक्षिण भारतीयांना धडकी भरवणारे शिवसेनाप्रमुख काहीही घडवून आणू शकतात, हे सगळ्यांच्या मनात भरायला फारसा उशीर लागला नाही. लक्ष्मण यांना पत्र लिहून माणसे ज्या तक्रारी मांडत होती, त्याच तक्रारी ते बाळासाहेबांसमोर मांडत होते. फ्री प्रेस जर्नलमधून प्रवास सुरू केलेल्या या दोन मित्रांपैकी एकाने तो मार्ग नाकारला, दुसरा त्या वळणावर पुढे, खूप पुढे गेला. अन् ज्या व्यंगचित्रांमुळे हा प्रवास सुरू झाला ते केव्हाच मागे पडले.

व्यंगचित्रे कशी वाचायची, त्यांचा आस्वाद कसा घ्यायचा हे लोकांना कोणीच शिकवले नाही.खुद्द बाळासाहेब श्रेष्ठ व्यंगचित्रकार असले, तरी व्यंगचित्र संस्कृती रूजविण्यासाठी त्यांनी फारसे प्रयत्न केलेच नाहीत. त्यांच्या आवडत्या शैलीपेक्षा वेगळ्या शैलीतील व्यंगचित्रांनाही त्यांनी कधी प्रोत्साहन दिल्याचे दिसले नाही. बाळासाहेब हेच सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेत, असे म्हणणाऱ्यांचा गोतावळा त्यांनी उभा केला. म्हणूनच राजकीय व्यंगचित्रांपलीकडे मराठी व्यंगचित्रकारांची धाव कधी गेली नाही (अपवाद चिंटूचा). शि. द. फडणीस यांच्यासारख्यांनी वेगळी वाट चोखाळली, मात्र त्याला संस्थात्मक स्वरूप आले नाही. ते प्रयत्न एकांड्या शिलेदारासारखे राहिले. ही महाराष्ट्रातीलच काय, भारतातील विनोदबुद्धीची शोकांतिका आहे.

‘ब्लाँडी’, ‘ब्रिंगिग अप फादर’, ‘काल्विन अँड हॉब्ज’, ‘गारफील्ड’, ‘बी. सी.’, ‘अॅनिमल क्रॅकर्स’ अशा दर्जेदार सामाजिक व्यंगचित्रांसाठी म्हणूनच इंग्रजीवर अवलंबून राहावे लागते. गेला बाजार स्व. प्राण यांनी निर्माण केलेली चाचा चौधरी, ताऊजी, बिल्लू किंवा पिंकी अशी पात्रेही मराठीत निर्माण झाली नाहीत. गुंडगिरी आणि व्यापारीकरणाच्या अडकित्यात सापडलेल्या वृत्तपत्रांना म्हणूनच व्यंगचित्रांशी फारकत घेणे सोपे गेले. जातीय व राजकीय जाणीवा टोकदार झालेल्या, म्हणजेच टीका काय, अगदी किरकोळ विनोदही सहन न होणाऱ्या समाजालाही त्यांचा अभाव खटकणारा नव्हता.

मोरारजी देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या तिरसटपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध झाले. लक्ष्मण यांनी या विषयावर व्यंगचित्र काढले तेव्हा मोरारजींनी मंत्रिमंडळाची एक खास बैठक बोलाविली. सरकार, राजकारणी आणि मंत्र्यांची खिल्ली उडविण्यावर बंदी कशी घालावी, हा त्या बैठकीचा विषय होता! घटनेतील तरतुदींनुसार असे करता येणार नाही, हे त्यांना सांगण्यात आले तेव्हा तो विषय मागे पडला. मोरारजी द्विभाषक राज्याचे मुख्यमंत्री असले, तरी एक भाषक महाराष्ट्रानेही त्यांची परंपरा खंडीत केलेली नाही, इतकेच आपण म्हणू शकतो!
Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा