जातीय तणाव भडकविण्याची तयारी

Koregaon Bhima

कोरेगाव भिमा येथील दंगलीची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. यानिमित्त वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली विद्यापीठातील सहायक प्राध्यापक आणि ज्येष्ठ स्तंभलेखक अभिनव प्रकाश यांनी ‘जागरण’ वृत्तपत्रात या विषयावर लिहिलेल्या लेखाचा हा अनुवाद.


Koregaon Bhimaही 1817 च्या उत्तरार्धातील गोष्ट आहे. तिसरे आंग्ल-मराठा युद्ध आता कोणत्याही परिस्थितीत टाळता येणार नाही, हे त्यावेळी जवळपास निश्चित झाले होते. लढाईसाठी भारतातील तेव्हापर्यंतची सर्वात मोठी ब्रिटिश सेना एकत्र आलेली होती. तीत 1,20,000 सैनिक होते. मराठा साम्राज्य ही 18व्या शतकात भारतातील सर्वात मोठी राजकीय व लष्करी शक्ती होती. भारतात वाढत्या युरोपीय हस्तक्षेपाला रोखण्यास सक्षम असणारी ती एकमेव शक्तीही होती, मात्र दुसऱ्या आंग्ल-मराठा युद्धात पराजयानंतर मराठा शक्तीचा पराभव होत राहिला. मराठ्यांची शक्ती पेशवे, शिंदे, होळकर आणि अन्य सरदारांमधील आपसातील वादामुळे आणखी कमजोर होत होती. या युद्धात पेशवा बाजीराव दुसरा याला सातत्याने पराजयाचा सामना करत पुण्यातून पलायन करावे लागले. मात्र डिसेंबरच्या अखेरीस पेशव्याने पुण्याला इंग्रजांच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी 20,000 ते 28,000 सैनिकांच्या फौजेसह कूच करणे सुरू केले. त्याची माहिती मिळताच जवळच्याच शिरूर येथून सुमारे 900 सैनिकांची ब्रिटिश तुकडी पुण्याला पाचारण करण्यात आली, मात्र ती पुण्याला पोचण्याच्या आतच पेशव्याची फौज आणि कॅप्टन फ्रान्सिस स्टँटॉनच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौज भीमा-कोरेगाव येथे अकस्मात आमने-सामने आले.

एक जानेवारी 1818 रोजी झालेल्या भीमा-कोरेगाव युद्धात ब्रिटिश फौजेने पेशव्यांच्या सुमारे 2000-3000 च्या फौजेलाही जिंकू दिले नाही. या युद्धात कोणत्याही पक्षाचा निर्णायक पराभव किंवा विजय झाला नाही आणि ब्रिटिश फौज पुन्हा शिरूरला परत गेली. पेशव्यांची फौजही जनरल जोसेफ स्मिथच्या नेतृत्वाखालील आणखी मोठी फौज येण्याच्या शंकेने मागे हटली, परंतु ब्रिटिश फौजेने खंबीरपणे ज्या प्रकारे पेशव्याच्या फौजेला जिंकू दिले नाही, ती एक प्रकारे जीतच होती. म्हणूनच नंतर इंग्रजांनी भीमा-कोरेगाव येथे एका विजयस्तंभाची स्थापना केली. या विजयस्तंभावर ब्रिटिश सेनेच्या 49 मृतांची नावेही नोंदविलेली आहेत, त्यात 22 नावे महार जातीच्या सैनिकांची आहेत.

महार ही महाराष्ट्रातील मुख्य दलित जातींपैकी एक होय. ब्रिटिश बाजूने लढलेल्या आणि मारले गेलेल्या लोकांमध्ये महार जातीच्या लोकांची संख्या खूप अधिक असल्यामुळे हे युद्ध आणि विजयस्तंभ त्यांचे कुटुंबीय, समाज आणि नंतर महार रेजिमेंटच्या सैनिकांकरता एक महत्त्वाचे स्थळ बनले. या भागातील महार आणि अन्य दलितांच्या स्मृतीत भीमा-कोरेगाव हे त्यांच्या शौर्य आणि साहसाची गाथा म्हणून आहे, ब्रिटिश साम्राज्याच्या विजयाचा उत्सव म्हणून नाही. तेथे दर वर्षी हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येतात. यात मोठ्या संख्येने भारतीय लष्करातील माजी सैनिकही असतात. सन् 1927 साली डॉ. भीमराव अंबेडकर यांच्या आगमनानंतर ते दलितांच्या जाणिवेत भूतकाळातील सरंजामशाही आणि जातिवादी व्यवस्थेशी संघर्षाचे प्रतीक म्हणून दृढ होत गेले. यंदा या युद्धाचा 200वा वर्धापनदिवस होता, मात्र आतापर्यंत दरवर्षी शांततेने व कोणताही वाद न होता होणारा हा कार्यक्रम हिंसेत पालटला. त्यानंतर या सर्व घटनेला एक वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न होत आहे.

भीमा-कोरेगावला अशा प्रकारे जातियुद्धाचा रंग देण्यात येत आहे, की यात दलितांनी ब्राह्मण पेशवा आणि जातिवादी व्यवस्थेला उध्वस्त करण्यासाठी युद्ध केले असावे. हा दावा अजब आहे, कारण वास्तविक युद्धात ब्रिटिश पक्षाकडून महार लढले असतील, तर पेशव्यांच्या आघाडीवर मुख्यत: अरब मुस्लिम योद्धे शामील होते. मग याला दलित-मुस्लिम युद्ध म्हणणे अधिक योग्य होणार नाही का? का मग त्याला ते होते तेच म्हणावे? एक आंग्ल-मराठा युद्ध ज्यात इंग्रजांकडून महार, मराठा आणि अन्य जातींचे लोक सामील होते, तर पेशव्यांच्या सेनेतही मराठा, मुस्लिम, गोसावी, महार इत्यादि आणि अगदी पोर्तुगालीही सामील होते. ब्रिटिशांच्या बाजूने महार जातीचे लोक लढल्यामुळे ही दलितांची पेशव्यांच्या विरोधात सामाजिक न्यायाची लढाई होत असेल, तर पेशव्याकडूनही मातंग, मांग आणि अन्य दलित जाती लढल्या होत्या, म्हणून ही इंग्रजांच्या विरोधात दलितांची राष्ट्रवादी लढाई ठरते का?

इतिहासाला वर्तमान राजकारणाचा रंग दिला, की अशीच तर्कहीन स्थिती निर्माण होते. पेशव्यांच्या सरंजामशाही राज्यात दलितांची स्थिती अत्यंत वाईट होती, यात कोणतीही शंका नाही. चित्पावन कुळातील पेशवे तर देशस्थ व अन्य ब्राह्मणांनाही हीन समजत असत, मात्र इंग्रजांच्या आगमनानंतर दलित आपल्या मुक्तीसाठी त्यांच्या फौजेत दाखल झाले, हे म्हणणे व्यर्थ आहे. ब्रिटिश फौजेत तर याहूनही मोठ्या संख्येने राजपूत आणि ब्राह्मण जातीचे सैनिक होते, मग ते कोणापासून मुक्ती मिळण्यासाठी गेले होते? खरे तर इंग्रजांना त्यांच्या फौजेसाठी सैनिक हवे होते, मग ते पठाण असोत, राजपूत असोत किंवा महार वा अन्य कोणी असोत. महार तर शिवाजीच्या काळापासूनच मराठा साम्राज्याच्या सेनेत मोठ्या संख्येने होते आणि नंतर पेशव्यांच्या काळातही महारांना किल्ल्यांचे नायक करण्याचे व वतन देण्याचे वर्णन आहेत.
उलट इंग्रजांनी महारांना 1857 नंतर दूर करणे सुरू केले होते आणि 1892 मध्ये दलितांच्या सेनेतील भरतीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. नंतर पहिल्या महायुद्धाच्या वेळेस ही बंदी उठविण्यात आली आणि परत घालण्यात आली. आज खोटेपणाने प्रचार होत आहे, त्या प्रमाणे इंग्रजांना दलितांना किंवा अन्य कोणत्याही सामाजिक घटकाची लढाई लडण्यात किंवा कोणाला सामाजिक न्याय देण्यात रस नव्हता. उलट ते पूर्णतः स्वतःचा स्वार्थ साधण्यात गुंतले होते. मग या वेळेस वाद आणि हिंसा का झाले? आपण पाहिले तर यात एक खास प्रकारचा संबंध आहे. हरियाणात जाट रस्त्यावर आले होते तर राजस्थानात राजपूत. गुजरातमध्ये पटेल आणि कर्नाटकात लिंगायत समुदायाला भडकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हेही पाहा.

महाराष्ट्रात मराठा मोर्चाअगोदरच आरक्षणाची मागणी करत निदर्शने करत आहे, म्हणून आता महारांबरोबर संघर्षाला महत्त्व देऊन वातावरण बिघडवण्यात येत आहे. यात महार-मराठा यांच्या दरम्यान प्रदीर्घ काळापासून चालू असलेल्या तणावाने आगीत तेल ओतण्याचे काम केले. येत्या काळात अन्य राज्यांतही याच प्रकारे एखाद्या प्रभावी जातीला भडकावून अशांततेचे वातावरण तयार केल्या जाऊ शकते. कारण आता जे होत आहे ती एक प्रकारे 2019 च्या निवडणुकांची तयारी आहे. काही राजकीय पक्षांनी जणू मान्य केले आहे, की भाजपचा सतत वाढचा विजयरथ थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशा तऱ्हेने जातियुद्ध पेटविणे, हाच आहे. याची यशस्वी चाचणी गुजरात निवडणुकीत झाली आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.

Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा