तमिळ राजकारणातील नवा तारा?

जे जे आपणासी ठावे

C-00PS3W0AAVqTTअण्णा द्रमुकच्या महाराज्ञी जयललिता यांच्या जाण्यानंतर तमिळनाडूत भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचा चंग बांधून तिहेरी डावपेच चालू असतानाच आणखी एका खेळाडूने मुसंडी मारली आहे. बुद्धिबळाच्या खेळात सर्व लक्ष राजा आणि प्रधानावर केंद्रीत झाले असताना अचानक अडीच घरे चाललेला घोडा येतो आणि संपूर्ण डाव होता-नव्हता करतो. तसाच काहीसा प्रकार चोळ-चेर-पांड्य राजांच्या भूमीत चालू आहे. अण्णा द्रमुकचा प्रतिस्पर्धी या नात्याने नैसर्गिक दावेदार असलेला द्रामुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. दुसरीकडे सत्ताधारी अण्णा द्रमुकच्या चार गटांना लेकरूवाळेपणाने सांभाळणारा भाजप आहे. अन् सुपरस्टार रजनीकांतच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेवर रूमाल टाकलेलाही भाजपच आहे. आता सरशी कोणाची होणार, ही उत्सुकता ताणलेली असतानाच कमल हासन नावाच्या गूढ घोड्याने (डार्क हॉर्स) सगळा डाव उधळायचा बेत केलेला दिसतो.

मुळात अभिनय आणि नाच यातील अफाट कौशल्यामुळे कमल हासनची सगळ्यांना ओळख आहे. काळाच्या पुढचे व चाकोरीबाहेरचे विषय असलेले चित्रपट हा त्याचा हातोटा. अभिनेता आणि नाविन्यपूर्ण दिग्दर्शक म्हणून त्याने स्वतःला सुस्थापित केले. मात्र ‘अपूर्व सगोदरगळ’ (अप्पू राजा) नंतर आपण काहीच्या काही करू शकतो, हा गंड त्याच्यात निर्माण झाला. नंतर दिवसेंदिवस कमल हासनची कलाकारी स्वयंमग्नतेत (नार्सिसिझम) बदलत गेली.

गेल्या डिसेंबरमध्ये जयललितांचा गूढ आणि दुर्दैवी अस्त झाल्यापासून कमलरावांनी वाग्बाणांची सरबत्ती सुरू केली. वर्तमान परिस्थितीबद्दल त्यांनी वेळोवेळी भाष्य केले आहे. ‘विश्वरूपम’च्या वेळेस ‘माझा तर बाबा राजकारणाशी काय संबंध’ हा घातलेला मुखवटा आता त्यांनी काढून फेकला आहे. अन् त्यामुळेच तमिळनाडूतील सत्ताधारी आणि भाजपनेही त्याच्यावर तोंडसुख घेतले आहे.

“कमल हासन हे श्रेष्ठ अभिनेते आहेत. मात्र त्यांना राजकारण कळत नाही,” असे मुख्यमंत्री ई. पळनीस्वामी म्हणाले. त्याही आधी त्यांचे सहकारी व राज्याचे कायदा मंत्री सी. व्ही. षण्मुगम यांनी तर कमल हासनची लायकीच काढली. “कमल हासन हे तिसऱ्या दर्जाचे अभिनेते आहेत. आमचे सरकार किंवा या देशातील लोकांबद्दल बोलण्याचा त्यांना काही नैतिक अधिकार नाही,” असा थेट हल्ला त्यांनी केला. पैशासाठी कमल हासन काहीही करू शकतात, असा आरोपही त्यांनी केला. नागरी प्रशासन खात्याचे मंत्री एस. पी. वेलुमणी आणि माहिती मंत्री कंदबूर राजू यांनीही कमल हासन यांना कारवाईची धमकी दिली होती. पळनीस्वामी यांनी तर हिंमत असेल तर राजकारणात यावे, असे आव्हानही कमलला दिले.

भारतीय जनता पक्षाच्या राज्य अध्यक्ष तमिळीसै सौंदरराजन यांनीही हासन यांच्यावर कडाडून टीका केली. हासन यांनी लोकांसाठी आतापर्यंत काय केले, असा सवाल सौंदरराजन यांनी केला. “कमल हासन राजकारणात येण्यासाठी का धडपडत आहेत, लोकांच्या किती प्रश्नांबद्दल त्यांनी आवाज उठवला आहे, असे प्रश्न सौंदरराजन यांनी केले आहेत. कमल हासन आतापर्यंत कुठे होते, त्यांनी लोकांसाठी किती संघर्ष केला,” असे एका मागोमाग एक प्रश्न सौंदरराजन यांनी विचारले. त्याच सोबत “रजनीकांत हे पहिल्यापासून सार्वजनिक प्रश्नांबद्दल बोलत आहेत,” अशी पुस्तीही त्यांनी जोडली, हे नोंदण्याजोगे.

यात आणखी एक गंमत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेचे प्रमुखपद कमल हासनकडे आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यातील त्याच्या शरसंधानात त्याने केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध एक अवाक्षरही काढले नाही. अगदी नुकतेच त्याने हिंदी लादण्याच्या विरोधात भूमिका घेतली तेव्हाही नाही. त्यात भर म्हणजे शेजारच्या पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी कमल हासनच्या बाजूने मतप्रदर्शन केले आहे. “भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्या कोणाचेही रक्षण केलेच पाहिजे. शेवटी हे मंत्री लोकांचे पैसेच लुबाडत आहेत,” असे त्या म्हणाल्या.

पळनीस्वामी यांची पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून मग कमलनेही जाहीर केले, की मी राजकारणात अगोदरच प्रवेश केला आहे. ज्या दिवशी मी भ्रष्टाचाराविरुद्ध बोललो, त्याच दिवशी मी राजकारणात प्रवेश केला, असे त्याने म्हटले आहे.

या सगळ्याला कारणीभूत ठरले ते कमल हासन यांचे एक वक्तव्य. राज्यातील प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार माजला असून राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका नुकतीच कमल हासन यांनी केली होती. त्यामुळे सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्ष त्यांच्यावर नाराज आहे. अर्थात या दोन बाजूंमध्ये खडाखडी होण्याची ही पहिली वेळ नाही. मार्च महिन्यातसुद्धा त्यांच्यात वादाला तोंड फुटले होते! त्यावेळी कमल हासनने ट्विटरवरून अनेक राजकीय विधाने केली होती. जयललिता यांच्या सहकारी शशिकला यांनी अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस होण्याच्या प्रयत्नालाही त्याने विरोध केला होता. त्यावेळी ‘विश्वरूपम’च्या प्रदर्शनाच्या वेळेस त्याने केलेल्या वक्तव्याची आठवण अण्णा द्रमुकच्या नेत्यांनी करून दिली होती. विश्वरूपम हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्याच्या प्रदर्शनाला मनाई करण्यात आली होती. तेव्हा त्याच्या निषेधार्थ ‘मी हा देश सोडून जाईन’ असे वक्तव्य कमल हासन याने केले होते.

“मी देश सोडून जाईन” असे म्हणणारे लोक आता राज्यातील प्रश्नावर मतप्रदर्शन करत आहेत, अशी टीका अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्याला “मी राज्य (तमिळनाडू) सोडून गेल्यास तुमचीच लाज निघेल” अशा शब्दांत त्याने प्रत्युत्तर दिले होते.

एकीकडे राजकारणात प्रवेश करणार का नाही, याबाबत रजनीकांत अद्याप दोलायमान असताना कमल हासनने घेतलेली ही आघाडी अचंबित करणारी आहे. कमी तेथे आम्ही या न्यायाने आज चेन्नईच्या सिंहासनावर जाणवणारे रिकामेपण दूर करण्यासाठी कमल हासन पुढे येणार का, हाच आता खरा सवाल आहे.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा