तुझ्या फॅसिझमपेक्षा माझा स्टॅलिनिझम श्रेष्ठ!

20369648_1873792646214189_7453639169954852844_oदेशात असहिष्णुतेचा हलकल्लोळ उडाला आहे…लोक (हिंदू) दुसऱ्यांच्या (मुस्लिम व तत्सम अल्पसंख्यांक) जीवावर उठले आहेत…माणसे एक दुसऱ्याचे रक्त प्यायला बसले आहेत…सरकारची या सर्व प्रकाराला फूस आहे…आता कयामतचा दिवस फार दूर नाही…

पगारी विचारवंत आणि परभृत पत्रकार यांनी उभे केलेले हे चित्र. गेल्या काही दिवसांत म्हणजे ख्रिस्ताब्द 2014 नंतर भारतात आगडोंब उसळला असून पूर्वीचे नंदनवन नाहीसे झाले आहे, असे या चित्राचे स्वरूप आहे. त्यासाठी ही मंडळी अगदी धाय मोकलून लिहित असतात. त्यांच्या या असहिष्णुतेच्या कळकळीबद्दल सहानुभूती वाटली असती, पण केव्हा? सगळ्या प्रकारच्या दंडेली आणि हिंसाचाराचा, सर्व अत्याचार आणि दडपशाहीचा त्यांनी विरोध केला असता तर. पण फक्त कुठल्या तरी चुकार भगव्या मंडळीच्या आततायीपणाविरोधात टाहो फोडायचा आणि लालभाईंच्या (किंवा भगव्याशिवाय अन्य कोणत्याही रंगाच्या) विध्वंसाबद्दल मूग गिळून बसायचे, यात या लोकांचा हातखंडा आहे. इतकेच कशाला, या विध्वंसाचे समर्थन करायलाही ते अहमिहकेने पुढे येतात.

तसे नसते तर आता केरळमधील हल्ल्याबाबत या मंडळीची दातखिळी बसली नसती. रक्तलांछित राजकारणाने बदनाम झालेल्या या राज्यातील राजकारणाने आणखी हिंसक वळण घेतले आहे. तेथे राज्य भाजपच्या कार्यालयावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जी दृश्यफीत समोर आली आहे, त्यात पोलिसांसमोरच माकपचे कार्यकर्ते तोडफोड करताना दिसतात. अर्थात नंतर या हल्ल्याच्या प्रकरणात माकपच्या नगरसेवकासहित चार जणांना नंतर अटक करण्यात आली आहे.

तिरुवनंतपुरममधील माकप नगरसेवक आय. पी. बिनू यांचा अटक करण्यात आलेल्या माकप कार्यकर्त्यांमध्ये समावेश आहे. बिनू हे कुन्नुकुशी वार्डचे नगरसेवक असून भाजपचे राज्य कार्यालय त्यांच्या प्रभागात आहे. या प्रकरणी बिनू यांच्यासह दोन कार्यकर्त्यांना माकपने निलंबित केले आहे. या घटनेनंतर माकपचे राज्य सचिव कोडियारी बालाकृष्णन यांचे पुत्र बिनेश कोडियारी यांच्या निवासस्थानावर काही जणांनी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या सहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

राज्य भाजप अध्यक्ष कुमानम राजशेखरन हे हल्ल्याच्या वेळेस कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशानेच हा हल्ला करण्यात आला, असे भाजपने म्हटले आहे. एकूण घटनाक्रम पाहता ते खोटे असल्याचे वाटत नाही. राजशेखरन हे केरळ भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

अर्थात ही घटना काही एकाएकी घडलेली घटना नाही. गेल्या दोन दिवसांपासून माकप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. मात्र त्याही पूर्वीपासून राज्यात राजकीय हिंसाचार सुरूच आहे. साम्यवादी कार्यकर्त्यांचे हे हल्ले फक्त संघ किंवा भाजपवर होतात, असे नाही. माकप वि. काँग्रेस, माकप वि. संघ, माकप वि. भाजप, माकप वि. केरळ काँग्रेस, माकप वि. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (!) आणि कधी कधी माकप वि. माकप (अन्य गट) असेही संघर्ष येथे झालेत. मात्र माकपच्या या हिंसक गोंधळामध्ये संघ आणि संघाशी संलग्न संस्था सर्वात जास्त भरडल्या गेल्या आहेत, हे वास्तव आहे. किंबहुना भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे असेल कदाचित परंतु या घटना आता चर्चिल्या जात आहेत. परत चर्चिल्या याचा अर्थ ट्वीटर किंवा फेसबुकसारख्या जनसामान्यांच्या व्यासपीठावर, जाहिरातींवर जगणाऱ्या पेप्रांच्या पानात नव्हे!

आकडेवारीच द्यायची झाली, तर केरळमध्ये आतापर्यंत 215 पेक्षा अधिक संघ कार्यकर्ते साम्यवाद्यांच्या हातून मारले गेले आहेत. एकट्या कन्नूरमध्ये 78 स्वयंसेवक मारले गेले आहेत. पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील माकप सरकार 25 मे 2016 रोजी सत्तेवर आले. तेव्हापासून माकपच्या गुंडांनी सुमारे 15 संघ कार्यकर्त्यांना ठार केले आहे.

साम्यवाद्यांचा संघ कार्यकर्त्यांवर पहिला लक्षणीय हल्ला 1948 मध्ये तिरुवनंतपुरम येथे झाला होता (त्यावेळी साम्यवाद्यांची दोन शकले झाली नव्हती). हा हल्ला महत्त्वपूर्ण ठरण्याचे कारण म्हणजे तत्कालिन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे त्या कार्यक्रमात संबोधन करणार होते. श्री गुरुजी व्यासपीठावर उपस्थित असताना हा हल्ला झाला होता. ज्येष्ठ संघ स्वयंसेवक पी. परमेश्वरन हे मुख्य शिक्षक होते. साम्यवाद्यांच्या या हल्ल्याला स्वयंसेवकांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले आणि साम्यवाद्यांनी तेथून पळ काढला. जणू काहीही झाले नाही, अशा पद्धतीने गुरुजींनी भाषण केले. त्यांच्या समोर घडलेल्या घटनेचा त्यांनी उल्लेखही केला नाही.

वडगरा येथील टी. पी. चंद्रशेखरन हे बंडखोर नेते साम्यवाद्यांच्या हातून मारले गेलेले सर्वात प्रमुख स्वपक्षीय नेते होते. त्यांना 2 मे 2012 च्या रात्री अत्यंत क्रूर पद्धतीने ठार मारण्यात आले. त्यांचे मारेकरी हे इस्लामी कट्टरपंथी होते, हे भासविण्यासाठी मारेकऱ्यांनी अरबी आयत असलेली वाहने वापरली होती, हे नंतर उघड झाले. ज्येष्ठ माकप नेते आणि माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनीही या खुनाची जाहीर निर्भर्त्सना केली होती आणि मारले गेलेल्याच्या विधवेचे सांत्वन करायला ते गेले होते. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी व मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या गटाने व्ही. एस. यांच्या या कृतीवर हल्ला चढविला होता. हे विजयन स्वतः एका खुनाचे आरोपी आहेत.

प्रश्न असा आहे, की देशद्रोही म्हटले की नाकावर राग येणाऱ्या विचारवंतांना हे कधीच का दिसत नाही? का हे जे लोक मेले त्यांचा जीव नव्हता? हे सगळे फॅसिझमचे शिपाई होते का? यातील अनेक जण शिक्षक, सरकारी कर्मचारी होते. मात्र विचार स्वातंत्र्यावर हल्ला झाला, अभिव्यक्ती धोक्यात आली म्हणून मातम करणाऱ्यांना प्रत्यक्ष माणसांचे जीव जाताना कधी शोक करावा वाटत नाही. कारण ते केरळमध्ये समतेच्या ध्वजवाहकांकडून मारले गेले आहेत. त्यांची तीच लायकी होती. एकेकाळी स्टॅलिनने लाखो लोकांना मारले तेव्हा त्यांचीही तीच लायकी होती.

केरळमधील कार्यकर्तेही स्टॅलिनिझमचे बळी आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध होणार नाही. फक्त सगळे विचारवंत आणि मुखंड आपल्या कोषाबाहेर कधी येणार आणि “तुझ्या फॅसिझमपेक्षा माझा स्टॅलिनिझम श्रेष्ठ आहे”, हे जाहीररीत्या कधी सांगणार, त्याचीच प्रतीक्षा आहे.
Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा