प्राणीदयेच्या बैलाला…

Uncategorized

Madurai Jallikattuजानेवारी महिना आला, की दर वर्षी महाराष्ट्र-गुजरातेत सक्रांत, पंजाबमध्ये लोहडी, आसाममध्ये बिहू इ. सणांची चाहूल लागते. त्याच प्रमाणे तमिळनाडूत पोंगलची चाहूल लागते. मात्र जवळपास तीन-चार वर्षे झाली, पोंगल जवळ आला, की उत्सवाची चाहूल ऐकू येण्याऐवजी वादाचे हाकारेच ऐकू येतात. याला कारण म्हणजे जल्लिकट्टू नावाच्या खेळामुळे तमिळभूमीला येत असलेले रणांगणाचे स्वरूप.

तशीही तमिळ संस्कृती पुरुषार्थाच्या प्राचीन कसोट्यांना प्रमाण मानणारी. त्यात बैल हे घोड्याखालोखाल सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पुरुषार्थाची चाचणी घेण्यासाठी बैलांना काबूत आणण्यापेक्षा आणखी मोठी परीक्षा तो कोणती असणार? म्हणूनच इसवी सनापूर्वी चौथ्या शतकापूर्वीपासून प्रचलित असलेला जल्लिकट्टू हा खेळ लोकप्रिय नसता तरच नवल!

जल्लिकट्टू म्हणजे एखाद्या खवळलेल्या बैलाला (सांडाला) काबूत आणणे. ऐरूतळुवल असेही त्याचे नाव आहे. पोंगलच्या आगेमागे तमिळनाडूत हवा असते ती याच खेळाची. पोंगलचा आदला दिवस हा माट्टू पोंगल या नावाने ओळखला जातो. (सक्रांतीचा आदला दिवस भोगी असतो त्या प्रमाणे). त्या दिवशी जल्लिकट्टूची बाजी रंगते. मदुरैच्या रस्त्यावरून फिरताना या खेळाच्या चित्रांनी रंगलेल्या भिंती सगळीकडे दिसतात. त्याला वीर विळैयाडू ‘वीरांचा खेळ’ असे नावही दिलेले असते. मदुरै जिल्ह्यातील अल्लंगनल्लूर, पालमेडु, अवनियापुरम, पेरेयुर, शिवगंगा जिल्ह्यातील सिरावय, सिंगम्पुणरी, पुदूर, अरळिप्पारै, पुदुकोट्टै जिल्ह्यातील नार्तामलै इ. गावे जल्लिकट्टूसाठी खास प्रसिद्ध आहेत. अल्लंगनल्लूरचा जल्लिकट्टूतर जगभरात प्रसिद्ध असून देश-विदेशातील पर्यटक तो पाहण्यास येत असत.

तमिळनाडूत पूर्वी प्रचलित असलेल्या सल्ली या नाण्यावरून जल्लिकट्टू शब्दाची उत्पती झाली आहे. या नाण्यांची थैली पूर्वी बैलांच्या शिंगाला बांधत असत आणि विजेत्याला ती बक्षीस म्हणून देत असत. त्यावरून हा शब्द आला आहे. वेली जल्लिकट्टू, वाडीवासल जल्लिकट्टू आणि वडम जल्लिकट्टू असे त्याचे तीन प्रकार आहेत. यातील पहिल्या प्रकारात बैलाला सरळ गर्दीमध्ये सोडून देतात. त्यात जी व्यक्ती त्या बैलाजवळ येईल त्याच्यावर तो बैल हल्ला करतो. वडम जल्लिकट्टू हा सगळ्यात सुरक्षित प्रकार होय. यात बैलाला दोरीने बांधलेले असते. वाडीवासल हा प्रकार सगळ्यात धोकादायक प्रकार मानला जातो. मदुरैजवळील अलंगनल्लूर येथे हा खासकरून खेळला जातो आणि सगळ्यात प्रसिद्ध आहे. याच प्रकारात सगळ्यात जास्त अपघात होतात आणि काही वेळेस त्यांचा मृत्यूही होतो.

या खेळासाठी खास जातीचे बैल तयार केले जातात. त्याला पुलिकुलम किंवा जेलिकट म्हणतात. या जातीचे बैल अत्यंत आक्रमक असतात. जल्लिकट्टू हा वरकरणी स्पेनमधील बुल फाईटिंगसारखाच वाटला तरी त्यात एक फरक आहे. बुल फाईटिंगचा खेळ बैलाला मारूनच संपतो. या खेळात स्पेनप्रमाणे बैलांना मारले जात नाही. उलट जल्लिकट्टूच्या बैलांचे वर्षभर पालन पोषण केले जाते. त्यांची प्रेमाने निगा राखली जाते. जल्लिकट्टूत काबू केलेले बैल नंतर शेतीच्या कामासाठी वापरले जातात.

त्यामुळेच क्रूरता क्रूरता म्हणून पेटाने या खेळावर बंदी आणली तेव्हा त्याच्या विरोधात सर्व तमिळ लोक एकत्र आले आहेत. हा प्रकार सुरू झाला 2008 पासून. तेव्हापासून विविध न्यायालयांमधून फिरत फिरत आता तो निर्णायक वळणावर आला आहे.

हा खेळ परत सुरू व्हावा, म्हणून मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. तमिळनाडूच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला जल्लिकट्टू झालाच पाहिजे, अशी मागणी करत राज्यात अनेक संघटना आंदोलन करत आहेत. रजनीकांतपासून सर्व असामींनी त्याला पाठिंबा दिला आहे. तमिळनाडूची संस्कृती खंडीत होऊ नये, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले आहे.

“तमिळनाडूच्या संस्कृतीत खंड पडता कामा नये. जे काही अडथळे असतील, ते दूर करा पण जल्लिकट्टूवर बंदी घालू नका. आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक संस्कृती निर्माण करू दिली आहे. ती आपण जपली पाहिजे. वाटल्यास काही निर्बंध घाला, परंतु जल्लिकट्टू झालाच पाहिजे,” असे ते म्हणाले.

‘जल्लीकट्टू वाईट असेल तर बिर्याणी खाण्यावर देखील बंदी घाला,’ असे विधान प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी एका वाहिनीशी बोलताना केले होते.

जल्लिकट्टूवरील बंदी उठवावी, यासाठी मरीना बीचवर निदर्शकांनी धरणे धरले आहे. अलंगनल्लूर येथे झालेल्या निदर्शनांच्या वेळेस पोलिसांनी सुमारे 200 निदर्शकांना ताब्यात घेतले. या विषयावर राष्ट्रपतींशी चर्चा करण्याची तयारी निदर्शक तरुणांनी केली आहे. राज्यातील अण्णा द्रमुक सरकारनेही त्यांच्या या तयारीला पाठिंबा दर्शवला आहे.

पुण्यातील बैलगाडा शर्यतीवर आणलेल्या बंदीनंतर जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच आज तमिळनाडूत झाली आहे. फरक एवढाच आहे, की पुण्यातील बैलगाडा चालकांनी एवढी उग्र निदर्शने कधीही केली नाहीत. तमिळनाडूत ती होत आहेत. प्राणीदयेच्या बैलाला शिंगावर घेण्याचे धैर्य कोणीतरी दाखवत आहे.

2 comments

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा