मनसे – फसलेल्या क्रांतीची फसफस

जे जे आपणासी ठावे
Raj Thackeray
Raj Thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन दहा वर्षे होऊन गेली. या दरम्यान एक समर्थ राजकीय पक्ष म्हणून मनसेकडे पाहण्यासारखी परिस्थिती अगदीच थोडा काळ निर्माण झाली होती. नव्या दमाचा आणि धडाडीचा पक्ष म्हणून मनसेने थोड्या वेळापुरते आकर्षित केले होते, हे मान्य करावेच लागेल. दुर्दैवाने मनसे उर्फ राज ठाकरे या पक्षाला लोकांच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा कळल्याच नाहीत. त्यामुळे चळवळ-कम-पक्ष होऊ शकणाऱ्या त्या पक्षाची भरती एखाद्या स्वप्नासारखी झटक्यात ओहोटीत बदलून गेली.

स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून मनसेने स्वतःला महाराष्ट्रकेंद्रीत पक्ष म्हणूनच स्वतःला पुढे आणले होते. “महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे” हे या पक्षाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले जाते. त्या ध्येयाचा पतंग वेगवेगळ्या राजकीय वाऱ्यांवर कुठल्या कुठे भरकटत गेला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी लाठ्या झेलल्या, अनेक जण तुरुंगात गेले आणि बहुतेकांनी निराश होऊन दुसऱ्या पक्षांच्या तंबूत डेरा केला. मुळात पक्षाचा वसा असा काही नव्हताच, त्यामुळे तो वसा सोडण्याचा प्रश्नच नव्हता. क्षणिक मुद्द्यांवर, त्या त्या वेळच्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यातून पक्ष आधी वाढला, मग आक्रसला.

“जीन्स घालून आणि ट्रॅक्टरवर बसून शेती करणारा शेतकरी हे माझे स्वप्न आहे,” या एका वाक्यावर राज यांनी आपल्या पहिल्याच सभेत टाळ्या मिळविल्या होत्या. तेव्हा पक्षाच्या नावाप्रमाणे क्रांती करणारा पक्ष आला, म्हणून मराठी जनता कोण हरखली होती! आज दहा वर्षांनंतर ती क्रांती तर राहिली बाजूला, पण खुद्द पक्षच विदीर्णावस्थेत दिसतोय.

म्हणूनच मग आज जेव्हा सिंहगर्जना केल्याच्या थाटात राज ठाकरे मोदींना आव्हान देतात, तेव्हा ते दृश्य केविलवाणे वाटते. मॅट्रिक पास न झालेल्या विद्यार्थ्याने पीएचडीसाठी कुठला विषय चांगला राहील, याचा खल करावा, तशी त्यांची भूमिका आहे. मराठी जनांच्या हिताची बात करणारा पक्ष म्हणून नाशिककरांनी देवदुर्लभ बहुमताचे दान मनसेच्या पदरात टाकले होते. त्याचे काय झाले? पुणेकरांनी विरोधी पक्ष म्हणून मनसेवर भरवसा टाकला होता. तिथेही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात मनसेला अपयश आले. मग त्या निवडणुकांत अपयश आल्यावर चमत्काराचे वायदे झाले. तो चमत्कार तर दिसला नाही, पण आता थेट मोदींवर शरसंधान चालू आहे. म्हणजे महापालिका पातळीवर नाकाम ठरल्यावर डायरेक्ट केंद्र पातळीवरील सत्तेवर तोफा डागण्याचा हा प्रकार अचाटच म्हणायला पाहिजे.

एकीकडे “मला केवळ महाराष्ट्राची काळजी आहे,” असे म्हणायचे आणि दुसरीकडे पंतप्रधानांच्या नावाने बोटे मोडायची, ही काही सुसंगती म्हणता येणार नाही. राज ठाकरे स्वतः उत्तम व्यंगचित्रकार आहेत. त्यांना स्वतःच्या भूमिकेतील ही विसंगती कळत नसेल काय? तुम्हाला महाराष्ट्राच्या भवितव्याची एवढीच काळजी आहे, तर तुम्ही महाराष्ट्राचे बोला ना! त्या विषयावर राज ठाकरे काही बोलायला तयार नाहीत.

आज राज ठाकरे यांच्यावर काहीही जबाबदारी नाही (वैधानिक या अर्थाने. त्यांच्या पक्षाची जबाबदारी पहिल्या दिवसापासून त्यांच्यावरच होती. त्या जबाबदारीला त्यांनी कितपत न्याय दिला, हे विविध निवडणूक निकालांनी दाखवून दिलेच आहे). त्यामुळे भाजपने जे पेरले ते त्यांच्यावर उलटतेय, असे ते म्हणू शकतात. उद्या देव न करो पण कोणी कृष्णकुंज किंवा मनसेच्या कार्यालयाची मोडतोड केली, अन् विरोधकांनी ‘मनसेने जे पेरले ते त्यांच्यावर उलटतेय,’ असे म्हटले तर राजना ते चालणार आहे का?

सर्वात गंभीर बाब म्हणजे राजकीय कोलांटउड्या मारताना राज हे वैचारिक सूरपारंब्या खेळतानाही दिसतात. एरवी मनसेच्या फेसबुक पेजचे उद्घाटन करताना दिलेल्या मुलाखतीत “भारताची स्थिती युरोपसारखी आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले नसते. त्यांचे हे विधान तद्दन दिशाभूल करणारे आहे. उत्तम वाचन असणारा नेता म्हणून राज ठाकरे यांना ओळखले जाते. अनेक विद्वानांना त्यांनी आपल्या संगतीत बाळगले आहे. त्यामुळे अन्. नेत्यांप्रमाणे त्यांनी हे वक्तव्य केवळ अज्ञानातून केले आहे, असे म्हणता येत नाही.

युरोपमध्ये अनेक भाषा आहेत आणि अनेक जनसमूह आहेत, हा एकमेव धागा सोडला तर भारत आणि युरोपमध्ये काहीही समानता नाही. सतराव्या-अठराव्या शतकात भारताची नव्यानेच ओळख झालेल्या युरोपीय विचारवंतांना व विद्वानांना भारताचे स्वरूपच कळत नव्हते. त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व व्याख्या, श्रद्धांना धक्का देणारे असे भारताचे स्वरूप होते. त्यावेळी त्यांनी युरोपच्या भाषा वैविध्याशी येथील भाषा वैविध्याची तुलना करून या दोघांना एका तराजूत आणून ठेवले. आता मोडीत निघालेल्या परंतु पुरोगाम्यांच्या उदरनिर्वाहाचा आजही आधार असलेला आर्य-द्रविड सिद्धांत याच भाषिक वैविध्यातून व अज्ञान/गैरसमज/कुहेतूतून जन्मलेला!

युरोप हा खंड म्हणजे राजकीय धारणेतून आकारास आलेली एक भू-राजकीय धारणा आहे. याच्या उलट भारत हा स्वयंस्फूर्त सांस्कृतिक प्रवाह आहे. युरोपीय देशांमधून राजकीय धागा काढून टाका, तर त्यांच्यात काहीही उरत नाही. या उलट कुठलाही राजकीय आधार नसताना भारतीय जनतेने शतकानुशतके एकत्र काढली आहेत आणि तरीही त्यांच्यातील एकजिनसीपणा हरवलेला नाही. वाराणसीची गंगा रामेश्वरमच्या सेतूमध्ये आणि रामेश्वरच्या समुद्राचे पाणी गंगेमध्ये मिसळणे, हे व्रत गेली हजारो वर्षे भारतीय नागरिकांनी प्राणपणाने पाळले आहे. त्यात त्यांना कुठल्याही राजवटीने अडथळा केलेला नाही. विविधतेत एकता हे ब्रीद भारताच्या माथी एखाद्या तप्त मुद्रेप्रमाणे गेली 70 वर्षे कोरण्यात आले आहे. नेहरूवादी युरोपभृत मानसिकता हे त्याचे मुख्य कारण आहे. वास्तविक भारताचे ब्रीद एकोऽहं बहुस्यात् (मी एक आहे आणि विविध रूपांत प्रकटावे) हे आहे. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत, रंगूनपासून मुंबईपर्यंत आणि मथुरेपासून मदुरैपर्यंत एकच अनादी आत्मा भारतभूमीच्या कुडीत वावरत आहे.
दोन-चार नगरसेवक निवडून न आल्यामुळे वैतागलेल्या राज ठाकरेंनी या मूळ एकात्मतेलाच सुरूंग लावायचा प्रयत्न करावा, हे त्यांना तर लांच्छनास्पद आहेच. पण ‘महाराष्ट्राविना राष्ट्राचा गाडा न चाले,’ असे म्हणणाऱ्या सेनापती बापट यांच्या महाराष्ट्रालाही लांच्छनास्पद आहे.

तो ट्रॅक्टर, तो शेतकरी, तो चमत्कार, तो विकास हे सगळे दूरचे दिवे ठरले. शिवाजी पार्कवर ग्वाही दिलेली क्रांती केव्हाच फसली. आता त्या फसलेल्या क्रांतीची फसफस दिसून येत आहे, एवढेच!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा