…अन् 400 वर्षांनी शापमुक्त झाले राजघराणे

जे जे आपणासी ठावे

yaduveer krishnadatta chamaraja wadiyar

गेली सात शतके आपले अस्तित्व आणि आब टिकवून असलेल्या म्हैसूरच्या वाडियार (ओडियार) राजघराण्याला तब्बल 400 वर्षांनी एका कथित शापातून मुक्ती मिळाली आहे. वाडियार राजघराण्यात चार शतकांनी बाळाचे रडणे ऐकू आले आहे आणि राजघराण्यात पहिल्यांदा एक मुलगा म्हणजे राजवंशाच्या वारसाचा नैसर्गिकरीत्या जन्म झाला आहे.

आजच्या म्हैसूरच्या देखणेपणाचे आणि थाटाचे सर्व श्रेय ओडियार कुटुंबाकडे जाते. राजवाडे, शाळा, इस्पितळे, धरणे, मंदिरे…अशी एक ना अनेक प्रेक्षणीय स्थळे वाडियार (ओडियार) घराण्याने निर्माण केली आहेत. ओडियार शब्दाचा अर्थ आहे चालक. खरोखर पूर्वीच्या म्हैसूर संस्थानच्या प्रदेशात अनेक नव्या कल्पना आणि कर्तृत्वांना ओडियारांनी चालना दिली आहे.

याच ओडियार घराण्यात मात्र चार शतकांपासून बाळ जन्माला येत नव्हते. त्यामुळे सध्याचे राजे यदुवीर कृष्णदत्त चामराज ओडियार यांची पत्नी त्रिशिका कुमारी यांनी बुधवारी रात्री बाळाला जन्म दिला तेव्हा अंबाविलास महालाच्या प्रांगणात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्यास नवल नाही. या राजघराण्याकडे 10 हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. सर्वच राजघराण्यात असते तशी म्हैसूरच्या महालाचा ताबा आणि यदुवीर यांचे दत्तक विधान यावरून खटलेबाजी सुरू आहे.

जून 2015 च्या सुरूवातीला म्हैसूरच्या राजघराण्याचे नवे वारस म्हणून यदुवीर वाडियार यांची निवड झाली होती. तेव्हा यदुवीर आणि त्रिशिकाचे लग्न गेल्या वर्षी जूनमध्ये झाले होते. म्हैसूरचे शेवटचे राजे जयचामराज वाडियार यांना श्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार यांच्यासह सहा मुले होती. मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे संस्थान विलीन झाल्यामुळे ते गादीवर बसू शकले नाहीत. श्रीकांतदत्त यांचा मृत्यू 2010 साली झाला. त्यांना मूल नव्हते त्यामुळे त्यांची पत्नी प्रमोदादेवी वाडियार यांनी यदुवीर यांना 23 फेब्रुवारी 2015 रोजी दत्तक घेतले होते. यदुवीर हे मूळचे अर्स घराण्यातील असून जयचामराज वाडियार यांची ज्येष्ठ कन्या गायत्रीदेवी हिचे नातू आहेत. तर त्रिशिका कुमारी या राजस्थानातील डुंगरपूर संस्थानचे राजे हर्षवर्धनसिंग यांच्या कन्या आहेत.

वाडियार घराण्याचा इतिहास तसा रंजक आहे. म्हैसूरच्या गादीवर बसणाऱ्या ओडियार घराण्याच्या राजांना निःसंतान राहण्याचा शाप असल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात, की श्रीरंगपट्टणचा सरदार श्रीरंगराय याची पत्नी अलामेलम्मा हिने वाडियार घराण्याचा निर्वंश होईल, असा शाप दिला होता. हा शाप 1610 साली देण्यात आला होता आणि तेव्हापासून खरोखर वाडियार घराण्यात एकाआड एका पिढीमध्ये राजाला अपत्य झालेले नव्हते.

या राजघराण्याला आणि त्यांच्या वारशांना घटनात्मक किंवा कायदेशीर महत्त्व नाही. मात्र कर्नाटकातील बहुतांश लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात. चामुंडी मंदिराच्या दिशेने आम्ही जात असताना आमच्या मोटार चालकाने चामुंडी टेकडीकडे निर्देश करून सांगितले, “चंदनाची झाडे पाहा. अशी इथे लाखो चंदनाची झाडे आहेत. ही सगळी राजाने लावलेली झाडे आहेत.” म्हैसूरच्या काना-कोपऱ्यात प्रत्येक नागरिकाला आपल्या राजघराण्याच्या वारशाचा अभिमान असा ओसंडून वाहत असतो. वास्तविक आम्ही गेलो तेव्हा श्रीकांतदत्ता ओडियार जाऊन काही महिने झाले होते आणि त्यांची गादी तेव्हा रिकामीच होती.

हा एवढा जिव्हाळा असण्याचे कारण म्हणजे ओडियार घराण्याने घराण्याने निर्माण केलेली अचंबित करणारी बांधकामे आणि वास्तू होत. आपण केवळ छायाचित्रांतच पाहिलेल्या राजा रविवर्मा यांच्या अस्सल कलाकृती सामावणारा जगन्मोहन पॅलेस असो किंवा एशियामधील सर्वात उंच चर्च असलेले फिलोमीना चर्च असो, ऐतिहासिक वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेले चामुंडी मंदिर असो किंवा आधुनिक विज्ञानाचा आविष्कार असलेले कृष्णराजसागर धरण असो, म्हैसूर शहरभर डोळे दिपवणाऱ्या एक एक वास्तू नि प्रासाद आपल्याला साद घालतात.

Mysore palace

मात्र या शिल्पांच्या माळेतील मेरुमणी शोभावा, असा प्रासाद म्हणजे म्हैसूरचा राजवाडा. अंबा विलास पॅलेस या नावाने ओळखला जाणारा हा राजवाडा कर्नाटकाची शान तर आहेच पण कन्नड निर्मितीक्षमतेची ओळखही आहे. राजवाडा या शब्दात वैभव आणि संपन्नतेच्या जेवढ्या छटा सामावतात, त्या सर्वांना या प्रासादाने सामावून तर घेतले आहेच पण त्याहूनही अधिक काही येथे आहे. डोळ्याचे पारणे फेडणे, हा वाक्प्रचारही थिटा पडावा, असा इथला थाट, रचना आणि सौष्ठव. अन् जीवंत वैभवाची साक्ष देत उभा असलेला हा महाल दुष्काळाच्या काळात आपल्या जनतेला रोजगार मिळावा म्हणून तत्कालीन महाराजांनी बांधावा, हा त्यातील आणखी एक विरोधाभास.

तब्बल ५ एकर परिसरात पसरलेला हा राजवाडा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने एखादा महाल पाहिल्याची भावना निर्माण होते. रंगसंगती, शिल्पकला आणि वास्तुशास्त्र यांचा अजोड नमुना म्हणजे हा राजवाडा, असेच म्हणावे लागेल. द्राविड, पौर्वात्य आणि रोमन (गॉथिक) वास्तुशास्त्राचा इथे वेगळाच संगम पाहायला मिळतो. दसरा, सरकारी सुट्टी किंवा अन्य महत्त्वाच्या प्रसंगी 97 हजार बल्ब लावून हा महाल उजळून टाकण्यात येतो तेव्हा त्याची शोभा काही निराळीच असते.
हा राजवाडा बांधला म्हैसूरचे राजे कृष्णराजा वाडियार चौथे यांनी. तब्बल 15 वर्षे म्हणजे 1897 ते 1912 असे त्याचे बांधकाम चालू होते. याच्या आधी इथे दक्षिण भारतातील पद्धतीप्रमाणे चंदनाचा राजवाडा होता. परंतु राजकन्या जयलक्ष्मण्णी हिच्या विवाहाच्या वेळेस लागलेल्या आगीत तो जळाला. त्याच्या ऐवजी हा नवा राजवाडा बांधण्यात आला. या नव्या राजवाड्याच्याच शेजारी जुन्या राजवाड्याचा काही भाग अद्याप शाबूत आहे. तेथे म्हैसूर राजघराण्याचे संग्रहालय थाटण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या भिंतीवरील पौराणिक दृश्ये पाहण्यासारखी आहेत.

कर्नाटकच्या इतिहास, लोककथा आणि साहित्यामध्ये या राजवाड्याला आणि राजाला एक वेगळे स्थान आहे. दोन वर्षी रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘लिंगा’ या चित्रपटात या महालाचे थोडेसे दर्शन घेते. यात रजनीकांत यांचा राजवाडा म्हणून दाखविण्यात आलेला महाल म्हणजे अंबा विलास पॅलेस होय. आजही कर्नाटकात एखाद्याला ‘स्वतःला मोठा समजतोस का’ असे म्हणायचे असेल तर ‘स्वतःला म्हैसूरचा महाराज समजतोस का’ असे विचारतात.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा