मोदींनी मुस्लिमांचे जोखड काढले!

Narendra Modi Netynahu

पश्चिम आशियातील एका चिंचोळ्या पट्ट्यात वसलेल्या इस्राएलला अस्तित्वात येऊन पुढील वर्षे 70 वर्षे पूर्ण होतील. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून विखंडीत होऊन का होईना पण मोकळ्या झालेल्या भारताच्या स्वातंत्र्याला येत्या ऑगस्टमध्ये 70 वर्षे पूर्ण होतील. म्हणजे ही एकापाठोपाठ अस्तित्वात आलेली भावंडे. तरीही या कालावधीमध्ये भारताला इस्राएल नावाच्या देशाकडे ढुंकून पाहण्याची फुरसत मिळाली नाही, कारण भय! मुसलमानांना आपल्या देशापेक्षा त्यांचा धर्म प्रिय आहे, ही समजूत धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या काँग्रेसी जनांनी करून घेतली, इतरांची करून दिली आणि त्या प्रमाणे वर्तनही केले. राज्य कारभाराचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांनीही तीच री ओढली आणि एका देशाला वाळीत टाकले. अन् हीच मंडळी भारत वर्णद्वेषविरोधी असल्याचे, सहिष्णू असल्याचे थोतांड जगापुढे मांडत होते!

इस्राएलचे भांडण पॅलेस्टाईनशी होते आणि पॅलेस्टाईन म्हणजे मुस्लिम हे समीकरण आम्ही घट्ट करून ठेवले होते. इस्राएल आणि पॅलेस्टाईन हे एकमेकांशी अविभाज्यपणे जोडले गेले असतीलही. पण म्हणून भारतीय मुसलमान आणि पॅलेस्टाईन मुसलमान हे एकमेकांशी जोडले गेले आहेत, हा विचार चुकीचा आहे. त्या उप्परही पॅलेस्टाईन म्हणजे मुस्लिम नव्हे, तर तेथेही ख्रिस्ती आहेत. परंतु १९४८ पासून नेहरूवादी विचारसरणीने हा समज रूजविला आणि मुसलमानांना भारतापासून तोडण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मुसलमानांना भारतीय ओळख न मिळता पाकिस्तानी किंवा अरबी ओळख देण्यातच या लोकांनी धन्यता मानली. त्यामुळेच पॅलेस्टिनी लोकांचा शत्रु तो आपला शत्रू अशी चुकीची धारणा रुजविण्यात आली.

यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम हे तिन्ही धर्म अब्राहम कुळाचे (अब्राहमिक) पंथ. त्यांच्यातील भांडण हे तीन सख्ख्या भावांतील भांडण होते. त्यात पडण्याचे नवजात भारताला काहीही कारण नव्हते. पण भारतीय मुसलमांना भारतीय म्हणून न पाहण्याची परिणती त्या भांडणात एका भावाची बाजू घेण्यात झाले. याची हद्द झाली ती यासेर अराफातसारख्या दहशतवाद्याला पाठिंबा देऊन. जगात विमान अपहरणाचे तंत्र अंमलात आणणारा हा पहिला दहशतवादी. त्याच्या स्वतंत्र पॅलेस्टाईन सरकारला सौदी अरेबिया आणि इजिप्तच्याही आधी पाठिंबा देणारे सरकार होते इंदिरा गांधींचे. याच अराफातने मुस्लिम राष्ट्रांच्या संघटनेत काश्मीर प्रश्नावर भारताला तोंडघशी पाडले – एकदा नव्हे अनेकदा! त्याची परतफेड त्याला नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या नावाचे पुरस्कार देऊन करण्यात आली.

याचा अर्थच असा, की भारतातल्या मुस्लिमांना नको असतानाही त्यांना तुम्ही पॅलेस्टाईनवाले, तुम्ही सौदी अरेबियावाले असे सांगण्यात आले. त्यांच्या मानेवर ‘कौमी इत्तेहाद’चे (धार्मिक एकता) जोखड लादण्यात आले. इस्राएल हा त्यांचा नैसर्गिक शत्रू असल्याचे बिंबवण्यात आले. त्यांची स्वदेशी धारणा एवढी पोकळ करण्यात आली, की कोण कुठल्या म्यानमारमध्ये कत्तल झालेल्या लोकांसाठी ते मुंबईत हैदोस घालू लागले.

त्यामुळे इस्राएलशी संबंध नको रे बाबा, अशी भूमिका घेण्यात आली. पंतप्रधानांनी त्या देशाचा दौरा करणे हे तर फारच दूर. इस्राएलशी आपले राजनयिक संंबंधच निर्माण झाले 1992 साली. कारण इस्राएलचा विषय काढला, की मुस्लिम मतदार सरकारवर नाराज होतील ही बागुलबोवा नेहमीच निर्माण करण्यात आला. शिवाय बाकीचे अरब देशही नाराज होतील, हा भयगंडही होताच. त्यांची नाराजी विकत घेण्याजोगी नव्हती, कारण एकजात सगळे देश इस्लामी देश तर होतेच शिवाय भारताचे मोठे ग्राहकसुध्दा होते. धान्य, भाज्या, फळे असा मोठा माल भारतातून तिकडे जात होता. पर्यायी बाजारपेठेचा शोध घेण्याची गरजही वाटत नव्हती.

आज परिस्थिती बदलली आहे. गेल्या 25 वर्षांत इस्राएलने आपली उपयुक्तता वारंवार सिद्ध केली आहे. सिंचन हा भ्रष्टाचाराचा नाही तर विकासाचा विषय आहे, हे एकट्या महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहून आले आहेत. शिवाय भारताला भेडसावणाऱ्या दहशतवादाच्या समस्येवर इस्राएल खांद्याला खांदा देऊन उभा आहे.

“भारत आणि इस्राएल दहशतवादाच्या दुष्ट शक्तींशी समान संघर्ष करत आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तानात निर्माण होणाऱ्या दहशतवादविरोधी लढाईत भारताच्या बाजूने इस्राएल ठामपणे उभा आहे,” असे इस्राएलच्या परराष्ट्र खात्याचे उप महासचिव मार्क सोफर यांनी काल सांगितले.
“दहशतवादाच्या प्रश्नावर इस्राएलचा भारताला पूर्ण पाठिंबा आहे, ही वस्तुस्थिती त्याने कधीच लपवली नाही. लश्कर ए तैयबा आणि हमास अशा दहशतवादी संघटनांमध्ये काहीही फरक नाही. तसेच भारत व इस्राएल यांना स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. ,” असे ते म्हणाले.
सोफर यांनी यापूर्वी भारतातील इस्राएलचे राजदूत म्हणून काम केले आहे. ते म्हणतात, “इस्राएलला जसा दहशतवाद्यांच्या विरोधात स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे तसाच भारताला दहशतवादापासून स्वसंरक्षण करण्याचा अधिकार आहे. आम्ही एकसमान संकटाचा सामना करत आहोत,” असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचे मोठेपण हे की आपल्या पूर्वसुरींच्या या ओझ्याखाली ते दबलेले नाहीत. “भारतीय पंतप्रधानांनी इस्राएलला भेट देणे म्हणजे पाप, पॅलेस्टाईनसहीत सर्व मुस्लीम राष्ट्रांची खप्पामर्जी ओढवून घेणे,” या विचारांना त्यांच्याकडे थारा नाही. म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यापासून इस्राएलला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. खरे म्हणजे या दौऱ्यातून जे करारमदार ते करतील ते वेगळे, परंतु त्यांचे सर्वात मोठे योगदान वेगळेच ठरेल. भारतीय मुसलमांवरील एक जोखड त्यांनी काढून टाकले आहे. भारतीय मुसलमान हा आधी भारतीय आहे, पॅलेस्टाईन किंवा कतारमध्ये काय होतेय, याच्याशी त्याचा संबंध नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.

आज इस्राएलमध्ये मोदींचे जे स्वागत होत आहे, त्यावरून आपण एका मित्राची किती वंचना केली आहे हे आपल्याला कळून येईल. “पुढच्या आठवड्यात माझे मित्र, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे इस्राएलमध्ये येणार आहेत. ही इस्राएलला ऐतिहासिक भेट आहे. आपल्या देशाच्या 70 वर्षांच्या अस्तित्वकाळात कोणाही भारतीय पंतप्रधानाने भेट दिलेली नाही. इस्राएलच्या सैनिक, आर्थिक आणि राजनयिक ताकदीची ही चुणूक आहे,”असे नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या नऊ दिवस आधी केलेले वक्तव्य आहे.

“या दोन देशांतील संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत लक्षणीय पाऊल आहे. भारत-इस्राएल दरम्यान शेती व जलक्षेत्रात सध्या असलेले नाते आणखी मजबूत करणारे निर्णय आमचे सरकार लवकरच घेणार आहे,” असेही नेतन्याहू यांनी सांगितले.

इस्राएलमधील माध्यमांनीही या भेटीला खूप महत्त्व दिले आहे. ‘द मार्कर’ या वृत्तपत्राने मोदी यांना जगातील सर्वात महत्त्वाचा पंतप्रधान म्हटले आहे. ‘द येरुशलम पोस्ट’ ने पहिल्या पानावर नमस्ते मोदी असे शीर्षक दिले आहे. ‘इस्राएल हॅलोम’ या हिब्रू वृत्तपत्राने चक्क देवनागरी भाषेत नमस्ते असे शीर्षक छापले आहे.

त्यामुळे इस्राएल भारताचा किती मित्र आहे किंवा यामुळे भारताला काय मिळणार आहे, या पलीकडेही या भेटीचे महत्त्व आहे ते या दृष्टीने!

2 Comments

  1. फार छान माहिती मिळाली,राजकीय तर आहे पण अजून बरीच कळली

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा