याचसाठी होता अट्टाहास…शेवटचा दिस खोटा व्हावा

जे जे आपणासी ठावे

DG32e9LUQAAFTRJमावळते उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी केलेल्या वक्तव्याने ज्यांना आश्चर्य वाटले, ते गेले काही दिवस शीतनिद्रेत होते आणि अचानकच काल जागे असे म्हणायला पाहिजे. तब्बल10 वर्षे भारताचे उपराष्ट्रपती असलेल्या अन्सारी यांनी या काळात आणखी काय काम केले होते? सातत्याने सरकारला अपशकुन करणे आणि विसंवादी सूर काढणे, यातच त्यांची गेली तीन वर्षे गेली. उलट त्या पदाच्या जबाबदारीमुळे त्यांच्यावर बंधने असल्यामुळे त्यांचा आवाज दबलेला होता. तो आता मोकळा होण्याची वेळ आली. त्यामुळे जाता-जाता ते आणखी काही तरी बिब्बा घालणार, याचा अंदाज होताच आणि तो त्यांनी पूर्ण केला.

“देशाच्या मुस्लीम समाजामध्ये आज असुरक्षितता आणि भीतीची भावना आहे. देशाच्या विविध भागांमधून मला अशा अनेक घटना ऐकायला मिळाल्या आहेत. भारतीय समाज वर्षानुवर्ष विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. नागरिकांच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित करण्याची प्रवृती अतिशय चिंताजनक आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमधून जे ऐकायला मिळत आहे त्यावरुन तुमचा अंदाज योग्य आहे. मी बंगळुरुत ही गोष्ट ऐकली होती. देशातील अन्य भागांमध्येही ऐकलं आहे. उत्तर भारतात या गोष्टी जास्त प्रमाणात ऐकायला मिळतात. अस्वस्थतेची जाणीव आणि असुरक्षिततेची भावना मनात घर करत आहे”, असं अन्सारी म्हणाल्याचे दिसते.

अन्सारी यांना मुलाखतीत हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्याला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले, हा त्यांचा बचाव होऊ शकतो. मात्र ज्या वाहिनीवर त्यांनी मुलाखत दिली, ती राज्यसभा टीव्ही ही वाहिनी राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांच्या अखत्यारित येते. त्यामुळे ही मुलाखत व हा प्रश्न त्यांच्याच सांगण्यावरून आला असावा, हे उघड आहे. ही वाहिनी नरेंद्र मोदी व सरकारच्या विरोधात वापरण्यात त्यांनी तीन वर्षांत काहीही कसूर ठेवली नाही, हे ही वाहिनी पाहणाऱ्यांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही.

उपराष्ट्रपती पदावरील व्यक्ती म्हणून अन्सारी यांना देशाने द्यायचा तो मान दिला. तिरंग्याला सलाम न करणे, वंदे मातरम् न म्हणणे अशा त्यांच्या अनेक कृतीही समजून घेतल्या. एरवी वाद-विवादाशिवाय त्यांची उपस्थितीही न जाणवण्याजोगीच! तेही खपवून घेतले. तरीही सर्व भारतीयांचे उपराष्ट्रपती होण्याची त्यांची मानसिक तयारीच नव्हती, असे दिसते. अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलुगुरू या भूमिकेतून ते कधीही बाहेर आले की नाही, हा प्रश्नच आहे. बरे, मखलाशी एवढी, की मुस्लिम भीतीच्या सावटाखाली आहेत, हे तोंडाने म्हणण्याचीही त्यांची हिंमत नाही. मला लोक सांगतात, असे ते म्हणतात. दिल्लीत 1984 साली शिरकाण झाले तेव्हा ग्यानी झैलसिंग हे भारताचे राष्ट्रपती होते. त्यामुळे ते विद्ध झाले होते, परंतु राष्ट्रासमोर बोलताना त्यांनी ते कधीही उघड केले नाही.

आज भारतातील मुस्लिम दडपणाखाली आहेत, हे खरे आहे. पण त्यासाठी लिबरल विचारवंतांनी आणि माध्यममुखंडांनी तयार केलेले विखारी वातावरण कारणीभूत आहे. गोमांसावरून अखलाक मारला जातो, त्याच वेळेस गोतस्करांनी प्रशांत पुजारीला मारलेले असते. पुण्यात हडपसरमध्ये मोहसिन शेखला मारलेले असते, तेव्हा कसबा पेठेत हिंदू असल्यामुळे राठोड नावाच्या पोरालाही मारलेले असते. परंतु मेलेली व्यक्ती हिंदू आहे का मुसलमान, यावरून मातम करण्याचा निर्णय घेणाऱ्यांचे लक्ष फक्त शेख व अखलाकवरच असते. कावळ्याप्रमाणे एकाक्ष असलेली ही मंडळी कावळ्याप्रमाणे काव-काव करून भाईबंदांना गोळा करण्यातही वागबगार! त्यामुळे त्यांचा आवाज अन्सारींपर्यंत पोचतो, पण पुजारी आणि राठोडांचे रडणे कसे पोचणार!

असे म्हणतात की भारतीयांचे देशप्रेम फक्त क्रिकेटच्या मैदानावर (पाकिस्तानविरुद्ध) आणि चित्रपटगृहांत दिसते. यातील क्रिकेटच्या मैदानावर मोहम्मद कैफ, मोहम्मद शमी, इरफान व युसुफ हे पठाण बंधू त्यांच्या कर्तृत्वाने तळपले आहेत. यातील प्रत्येक क्रिकेटपटूला त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल कट्टरवाद्यांकडून धमक्या व शिवीगाळीचा सामना करावा लागला आहे. या भीतीच्या सावटाबद्दल अन्सारी कधी तोंड उघडणार आहेत की नाही? या उमद्या मुस्लिम तरुणांना (यातील युसुफ पठाण हा त्याच्या दाढीसकट) धमक्या देणारे कोण आहेत – हिंदू गेस्टापो? अन्सारी आपल्या चिंताग्रस्त बांधवांना या धमक्या देणाऱ्यांबद्दल बोलण्यास कधी सांगणार?

अन्सारींना बंगळुरूमध्ये नक्की कोण भेटले? या बंगळुरूमध्ये गेली दोन महिने मुख्यमंत्री सिद्धरामैया कन्नड-हिंदीची भाषणे लावून तमाशा पाहत आहेत. लिंगायतांना स्वतंत्र धर्म जाहीर करण्याची चाल खेळून फोडाफोडी करत आहेत. त्याच बंगळुरूमध्ये त्यांना मुस्लिमांना धोका जाणवत असल्याचे सांगण्यात आले? कमाल आहे! अन् बंगळुरूला गेले असताना उडुपीत एका हिंदू संतांने स्वतःच्या मठात मुस्लिमांना इफ्तार दिल्याचे त्यांना कोणी सांगितले का नाही? जून महिन्यात उडुपी येथील प्रसिद्ध पर्याय पेजावर मठाचे मठाधीश श्री विश्वेशतीर्थ यांनी ईदनिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. पर्याय पेजावर मठ हा उडुपीच्या श्रीकृष्ण मंदिराशी संलग्न आहे. ‘सौहार्द उपाहार कूट’ या नावाने हा कार्यक्रम झाला. स्वतः श्री विश्वेशतीर्थ यांनी मुस्लिम बांधवांना त्यांचा उपवास सोडण्यासाठी केळी, कलिंगड आणि सफरचंद दिले. नंतर अन्नब्रह्म इमारतीत त्यांना नमाज पढण्याची परवानगीही देण्यात आली. हे अन्सारींना असहिष्णुतेचे उदाहरण वाटते?

अन् हे सौहार्द एकतर्फी नाही. गेल्याच आठवड्यात “येत्या ईद-उल-अझा या सणाच्या दिवशी गाईंची कत्तल करू नये,” असा ठराव हैदराबादमधील मुस्लिम विद्वान व धर्मगुरूंनी संमत केला. तसेच लोकांनीही गाईंची कत्तल करू नये व मदरशांनीही शेळ्या-मेंढ्यांचीच कत्तल करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. जमात-ए-इस्लामी तेलंगाणा व ओरिसाचे अध्यक्ष मौलाना हामेद मोहम्मद खान, मौलाना मुफ्ती सादिक मोहिउद्दीन इ. विद्वान या बैठकीत उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे हा प्रस्ताव भीतीपोटी मंजूर केलेला नसून राज्य व देशात शांतता नांदावी, यासाठी संमत केल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

त्यामुळेच प्रश्न हा येतो, की अन्सारी नक्की भेटतात तरी कोणाला? खोटेपणा करणाऱ्या लिबरलांच्याच संगतीत ते राहणार असतील, तर असाच खोटेपणा त्यांच्याकडून होत राहणार! आता माजी उपराष्ट्रपती म्हणून त्यांना भरपूर वेळ आहे आणि त्यांची ही वाग्मौक्तिके वेचण्यासाठी लिबरलांचे थवेही उमडत राहणार! त्यासाठीच तर हा सगळा अट्टाहास होता. काल पंतप्रधान मोदींनी ज्या प्रमाणे एका वाक्यात त्यांची संभावना केली, ती सार्थ होती. खोटे बोलून अन्सारींनी आपला कार्यालयातील शेवटचा दिवस गोड केला, असे म्हणून सोडून द्यावे.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा