अम्मांच्या पोरक्यांना बाबा पावले!

IMG_20170821_195034महाराष्ट्रात भूकंपाच्या भविष्यवाण्या वर्तविणारे धक्के देऊन थकले, पण राजकीय झटका अजूनही लागत नाही. तिकडे तमिळनाडूत दर महिन्याला एक धक्का आणि एक झटका असतोच असतो. जणू काही एक धक्का और दो असे म्हणत (तमिळमध्ये) तिथले राजकारणी लुंगी सावरून कामाला लागले असावेत. श्रावणातील शेवटच्या सोमवारी मात्र त्यांनी या सर्व धक्क्यांवर कडी केली.

आजी मुख्यमंत्री पळनीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम या दोघांनीही एकत्र येण्याची घोषणा केली. लगोलग पन्नीरसेल्वम यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. दोघाही नेत्यांनी मिळून शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी तलवारी उपसल्या आणि आपला अण्णा द्रमुक हाच खरा पक्ष असल्याचाही दावा केला. तुरुंगात असलेल्या शशिकला यांचे सर्व मनसुबे उधळले गेले आहेत.

त्यामुळे आणखी एक बदल होणार आहे. मागची पाच दशके तमिळनाडूचे राजकारण बुलंद व्यक्तिमत्त्वांभोवती फिरत आहे. दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये होत असलेला हा एक फार मोठा बदल आहे. त्यामुळे व्यक्तीकेंद्रित राजकारण संपणार आहे. या असल्या तरीही आपला पुतण्या दिनकरण यांच्या माध्यमातून त्या पक्षावर वर्चस्व ठेवणार होत्या. मात्र आता दिनकरण यांचीच हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. कामराज, सी. एस. अण्णादुरै, करूणानिधी, एम. जी. रामचंद्रन, जयललिता जयरामन अशा नावांनी तमिळ राजकारणावर गारूड घातले होते. त्याऐवजी आता सामुहिक नेतृत्व नावाचा नवीन प्रकार राज्यात सुरू होणार आहे.

मुळात ओ. पन्नीरसेल्वम यांनी बंड पुकारल्या दिवसापासूनच आपला रोख शशिकला आणि त्यांचे पुतणे दिनकरन यांच्यावर ठेवला होता. एडापडी पळनीस्वामी या व्यक्तीवर त्यांनी एका शब्दानेही टीका केली नव्हती. त्यांच्या या संयमाला आता गोमटी फळे आली आहेत. त्यासाठी तर त्यांनी शिरडीचे साईबाबा आणि शनी शिंगणापूरला धाव घेतली होती. त्यातील कुठले तरी एक दैवत त्यांना नक्की पावले आहे.

उपराष्ट्रपतीपदी निवड झालेल्या वैंकेय्या नायडू यांच्या शपथविधीनिमित्त पळनीस्वामी आणि पन्नीरसेल्वम दिल्लीला गेले होते. तेथे आदल्या दिवशी पळनीस्वामी आणि दुसऱ्या दिवशी पन्नीरसेल्वम यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. तेथे त्यांनी काय कानमंत्र दिला काय माहीत, परंतु गेली दोन तळ्यात-मळ्यात करणाऱ्या दोन्ही नेत्यांची सूत्रे वेगाने फिरू लागली. अगोदर चेन्नईला पोचल्या-पोचल्या पळनीस्वामींनी जयललितांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले. इकडे ओ. पन्नीरसेल्वम यांनी दिल्लीहून थेट चेन्नईला न जाता महाराष्ट्राकडे मोहरा वळविला. दिल्लीहून विमानाने परतत असताना त्यांनी मुंबईला उतरून शिर्डीला जाऊन बाबांचे दर्शन घेतले.

तेथे त्यांनी सकाळी4 वाजता मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत त्यांच्या गटाचे अन्य खासदार व नेतेही होते. त्यानंतर त्यांनी शनि शिंगणापूरला जाऊन शनिदेवाचे दर्शनही घेतले. तमिळ जनता सुखाने जगावी, अशी प्रार्थना या दोन्ही धार्मिक ठिकाणी केल्याचे त्यांनी नंतर सांगितले होते. त्यांची ती प्रार्थना सार्थकी लागली म्हणायची. कारण जयललिता उर्फ अम्मा गेल्यानंतर त्यांचा पक्ष पोरका झाला होता. पळनीस्वामी आणि पन्नीरसेल्वम अशा खाशांमध्ये अण्णा द्रमुकचे संस्थान विभागले होते. साईंच्या आशिर्वादाने का होईना, ही दोन शकले एकत्र आली आहेत. जयाम्मांवरील श्रद्धा आणि राजकारणातील सबुरी या दोन वल्ह्यांवर त्यांची राजकीय नौका अलगद पार होऊ शकते.

त्याच्या तीन दिवस आधी पळनीस्वामी यांच्या गटाने आपल्याच गटाचे सरचिटणीस आणि शशिकलांचे भाचे दिनकरन यांच्या विरोधात ठराव मंजूर केला होता. त्यामुळे एकत्रीकरणाची दिल्ली आता दूर नाही, हे जाणत्यांना कळालेच होते. सोमवारच्या घडामोडीने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

अर्थात या एकत्रीकरणामागे साईंचे आशीर्वाद आहेत का दिल्लीचे पाठबळ, हा प्रश्न आहेच. कारण बिहारमधील नीतीश कुमारांच्या धक्क्यानंतर ज्या प्रमाणे मोदींनी त्वरित आपले अस्तित्व दाखवले होते, त्याच प्रमाणे येथेही घडले आहे.

पन्नीरसेल्वम यांनी शपथ घेताच काही वेळातच पंतप्रधानांनी ट्वीट केले. ‘‘तिरू. ओ. पनीरसेल्सम आणि आज शपथ घेणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. येत्या काळात तमिळनाडू नवीन शिखरे गाठेल. केंद्र तमिळनाडूच्या विकासासाठी मुख्यमंत्री तिरू. एडापडी पळनीस्वामी आणि उपमुख्यमंत्री तिरू. ओ पनीरसेल्वम यांना संपूर्ण सहकार्य करेल,’’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. राजकारणाची पुढची दिशा दाखविण्यासाठी एवढा इशारा पुरेसा आहे.

आता आजपासून म्हणजे 22 ऑगस्टपासून भाजप अध्यक्ष अमित शहा तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील मागास आणि वंचित गटांच्या लोकांशी ते खासकरून चर्चा करणार आहेत.

शहा यांनी 2015 मध्ये तमिळनाडूचा दौरा केला होता. त्यावेळी मदुरै येथे त्यांनी अनुसूचित जातीच्या काही नेत्यांशी चर्चा केली होती आणि देंवेंद्रकुला वेळ्ळाळर जातीचे नाव बदलण्याच्या मागणीलाही पाठिंबा दिला होता. तत्पूर्वीच राज्य अध्यक्षा तमिळीसै सौंदरराजन यांनी एकत्रीकरणाचे स्वागत केले आहे. त्यामुळे अण्णा द्रमुकची दोन पाने अलगद कमळाला येऊन मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. नव्हे, येऊन नाही मिळाली तरच आश्चर्य!
Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा