काँग्रेसचा ‘बहादूर’शाह जफर

जे जे आपणासी ठावे

कोणाकडून तरी हल्ला किंवा मारहाण करून घ्यायचा. त्याचे भांडवल करून सहानुभूती, प्रसिद्धी व राजकीय लाभ घ्यायचा. त्यातून आपला कार्यभाग साधायचा, ही अरविंद केजरीवाल यांनी भारतीय राजकारणाला दिलेली देणगी. केजरीवालांनीच फटका दिलेल्या काँग्रेसच्या उत्तराधिकाऱ्यांनी ती शैली उचलली की काय, अशी शंका यायला जागा आहे.

बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटायला आलेल्या राहुल यांच्या कारवरधानेरा येथे दगडफेक झाली. त्यात त्यांना इजा झाली नाही, पण मोटारीचे नुकसान झाले. नेहमीप्रमाणे एसपीजीच्या जवानाच्या हाताला ईजा झाली. वास्तविक बनासकांठा येथे आल्यावरच लोकांनी राहुल गांधींसमोर काळे झेंडे फडकावले होते. त्यांनी मोदींच्या जयजयकाराच्या घोषणाही दिल्या. लाल चौक भागात राहुल गांधी 5 मिनिटे थांबले होते. तरीही लोकांचा विरोध चालूच राहिल्यामुळे त्यांना तेथून जावे लागले. धानेरा येथे व्यापाऱ्यांसोबत भेटीगाठी झाल्यावर होणारी सभाही मोदी मोदीच्या घोषणा चालू राहिल्यामुळे रद्द करावी लागली.

बनासकांठाचे पोलिस अधीक्षक नीरज बडगुजर यांनीही राहुल गांधींनाच जबाबदार धरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी राहुल गांधींना बुलेटप्रुफ कार देऊ केली होती, मात्र ते बुलेटप्रुफ कार सोडून पक्षाच्या मोटारीत बसले. तसेच ते वारंवार वाहनांचा ताफा थांबवून अनोळखी लोकांना भेटत होते. तसेच दगडफेक करणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत मुंबई समाचार या वृत्तपत्रात राजीव पंडीत या लेखकाचा उत्तम लेख आहे. “राहुल गांधी यांच्या मोटारीवर दगडफेक होणे या घटनेला फार महत्त्व देता कामा नये. ही घटना आपल्यासाठी लज्जास्पद म्हणावी लागेल. काँग्रेस म्हणते त्या प्रमाणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली असेल, तर ती आणखी लज्जास्पद म्हणावी लागेल. परंतु राष्ट्रीय मुद्दा बनवावा आणि बनासकांठाच्या लोकांच्या यातना बाजूला ठेवाव्यात, एवढी ती मोठी नाही. काँग्रेसने ज्या प्रमाणे ही घटना फुगविली ते योग्य नाही. बनासकांठामध्ये लोक ज्या स्थितीत राहत आहेत, ते पाहून कोणाचे माथे भडकले आणि त्यांनी एखादा दगड फेकला असेल तर मन मोठे करून राहुलनी ही घटना विसरून जायला हवी होती. त्यांनी कदाचित ते केलेही असते, परंतु काँग्रेसजनांनी एवढे मोठे मन करता आले नाही. काँग्रेसचे आमदार लोकांच्या समस्या दूर करण्याऐवजी बंगळुरुत जलशे करत आहेत, हे पण लज्जास्पद आहे. काँग्रेसने राज्यसभेची एक जागा वाचविण्याची चिंता करण्याऐवजी त्या सर्व आमदारांना बंगळुरुला न पाठवता बनासकांठात उतरविले असते, तर त्यांना जोशही आली असता आणि राजकीय फायदाही मिळाला असता. काँग्रेसने हे केले त्याबद्दलही तिला शरम वाटली पाहिजे,” असे त्यांनी लेखात म्हटले आहे. अर्थात त्यांनी भाजपला कानपिचक्याही दिल्या आहेत.

पण प्रश्न राहुल गांधींचा आहे. भरतसिंह सोळंकींसारखे नेते सोबत घेऊन राहुलना फिरता येते, मग बंगळुरुला मौजमजा करायला पाठविलेले 44 आमदार त्यांच्यासोबत का नव्हते? आपल्या आमदारांना शेळ्या-मेंढ्यांसारखे इतरत्र पाठवायचे आणि मी तर तुमच्यातलाच एक नेता आहे, असा आव आणत फिरायचे. आज 2017 मध्ये अशा प्रकारचे ढोंगी राजकारण आपण करू शकतो, ही हिंमत त्यांच्यात कुठून येत असेल? पुन्हा काळे झेंडे दाखवणाऱ्यांना घाबरत नाही, असेही ते सांगतात. 

तिकडे बंगळुरु पायाखालची वाळू सरकलेले सिद्धरामय्या झेंडा, भाषा आणि धर्म अशा मुद्द्यांवरून पेटवापेटवी करत आहेत आणि सत्ता वाचविण्याची खटपट आहेत. इकडे आपल्या फुटक्या आमदारांना सांभाळण्यासाठी राहुल गुजरातेतील आमदार तिकडे पाठवत आहेत. त्यांच्या स्वतःच्या पक्षातील नेते त्यांना पप्पू म्हणून हिणवताहेत आणि आपली ‘आपकमाई’ राहुल कुठेही दाखवू शकत नाहीत.
या वर्षीच्या सुरूवातीस झालेल्या पंजाबच्या निवडणुकांतील विजय सोडला, तर काँग्रेसला 2014 पासून एकही चांगली बातमी मिळालेली नाही. पंजाबच्या निवडणुकीतही काँग्रेस जिंकली ती केवळ आणि केवळ कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यामुळे. अकाली-भाजपच्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये रोष होता. मात्र या रोषाचा फायदा घेण्याएवढेसुद्धा चैतन्य काँग्रेसमध्ये उरलेले नव्हते. अमरिंदरना धन्यवाद द्यायला पाहिजेत, की त्यांनी खऱ्या लढवय्याप्रमाणे झुंज दिली. मुख्य म्हणजे चांगल्या रणनीतीकाराला साजेसे डावपेच रचून राहुल गांधींना त्या निवडणुकीपासून दूर ठेवले.

राहुल गांधी ही काँग्रेसची सर्वात मोठी कमजोरी होय. ‘मी खात नाही आणि खाऊही देत नाही’ हा नरेंद्र मोदींचा ‘जुमला’ त्यांनाही लागू पडतो. राहुल आणि त्यांच्या आई सोनिया यांची मानसिकता समजण्यापलीकडची आहे. या दोघांनाही मंत्री किंवा पंतप्रधान व्हायचे नाही, पण काँग्रेसवरची पकडही सोडायची नाही. आज काँग्रेस ही एक कौटुंबिक पेढी बनली आहे आणि काँग्रेसजनांना त्याचा अभिमान आहे. थोडक्यात मोगल सत्तेला जशी उतरकळा लागली होती, तशी काँग्रेसला लागली आहे आणि ही गोष्ट गांधी कुटुंबाच्या आश्रितांसकट सगळ्यांना जाणवली आहे. म्हणूनच अरुणाचल प्रदेशपासून कर्नाटकापर्यंत काँग्रेसजन दुसऱ्या होड्यांमध्ये उड्या मारत आहेत. या परिस्थितीवर मार्ग काढण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये नाही. म्हणून आता ते केजरीवाल शैलीच्या राजकारणावर आले आहेत. अन् त्यासाठी बहादूर असल्याचा आव आणत आहेत.

काँग्रेस नावाच्या मोगल साम्राज्याचे म्हणजे काँग्रेसचे बहादूरशाह जफर राहुल गांधी बनतील, याची पूर्ण शक्यता आहे. अठराशे सत्तावनच्या बंडात सगळे सैनिक बादशहाच्या नावाने लढत होते, पण प्रत्यक्ष बादशहा रणांगणावर नव्हताच. राहुलची गत तशीच आहे. म्हणूनच नुकतेच काँग्रेस सोडलेले शंकरसिंह वाघेला म्हणाले, “राहुल स्वतःही लढत नाहीत आणि लढूही देत नाहीत.” फक्त बहादूरशाह रंगूनला गेले, राहुल इटालीला जातील एवढाच काय तो फरक!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा