सुंठीवाचून गेलेली उबळ

sasikalaसर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून लगोलग राजकीय आखाड्यातून व्ही. के. शशिकला यांना बाद केले आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची अस्सल काळजी गेली आहे. नव्हे, सुंठीवाचून त्यांची उबळच गेली आहे. आजच सकाळी एका आमदाराने त्यांच्या शिविरात उडी मारली होती. आता त्यांच्याकडे सात आमदार आणि 12 खासदार झाले आहेत. किमान 45 ते 50 आमदार त्यांच्या बाजूने आहेत, असे म्हणतात. त्यामुळे हा निकाल आल्या-आल्या त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडले तर ते समजून घेणे सोपे आहे.

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात शशिकला दोषी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठासून सांगितले. त्यामुळे जयललिता यांच्या मागोमाग शशिकला यांनाही तुरुंगाचा रस्ता धरावा लागणार आहे. त्यांना चार वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. तमिळनाडूची सध्याची विधानसभा आणि शशिकला यांच्या शिक्षेचा काळ तंतोतंत जुळतात. काय ही नशिबाची थट्टा! गंमत म्हणजे या खटल्यातील मुख्य आरोपी जयललिता या होत्या.

सिंहाचा वारस सिंहच असतो, असे दोनच दिवसांपूर्वी शशिकलांनी सांगितले होते. आता सिंहाच्या पदचिन्हांवर त्यांना असेही चालावे लागेल, हेच विधिलिखित आहे. धावचित झालेल्या फलंदाजाप्रमाणे खिन्न होऊन खेळपट्टीकडे पाहणे, हा शशिकलांपुढे असलेला एकमेव मार्ग आहे.

न्यायमूर्ती पी सी घोष और न्यायमूर्ती अमिताभ राय यांच्या पीठाने तमिळनाडूतील एका मोठ्या राजकीय नाट्याचे मध्यंतर केले आहे. न्यायालयाने शशिकला यांना आत्मसमर्पण करण्याचेही आदेश दिले आहेत. शशिकला यांनी आपल्या वतीने कोणाला नियुक्त केले, तर तेही लोकांना पचण्यासारखे नाही कारण जो कोणी असेल त्याच्यामागे जयाम्मांचा वरदहस्त नाही. पन्नीरसेल्वम व शशिकला यांची गोष्ट वेगळी होती.

पन्नीरसेल्वम हे जयाम्मांचे ‘हातचा आला एक’ होते. राजकीय अडचणीची समीकरणे सोडविण्यात ते कामास येत. शशिकला या तर साक्षात जयाम्मांच्या सावली! त्यामुळे त्यांच्या दाव्यालाही काही एक बळ होते. तिसऱ्या कोणत्याही चेहऱ्याला हे स्थान नाही का बळ नाही. थोडक्यात पन्नीरसेल्वम हे, मी मागे म्हटल्याप्रमाणे, एकाच वेळेस माजी, आजी व भावी मुख्यमंत्री आहेत. धर्माचा जय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आता त्यांचा पक्ष वरचढ ठरल्यामुळे ते आणखीच सश्रद्ध होतील.

मात्र या निर्णयाने चिंता मिटलेले पन्नीरसेल्वम एकटे नाहीत. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या ‘वेदनिलयम’ या घरातून शशिकला यांना बाहेर काढा, अशी मागणी एका महिला वकिलाने चेन्नईच्या पोलिस आयुक्तांकडे नुकतीच केली होती. त्यांनाही आता फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. कलादेवी नावाच्या या वकिलांचीही चिंता मिटली असेल.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचीही एक अडचण न्यायालयाने परस्परच दूर केली आहे. आता शक्तिप्रदर्शनही नको आणि कोणाचे हात दाखवून अवलक्षणही नको. सगळे कसे सुरळीत, सहज आणि सोपे! आता ते उजळमाथ्याने चेन्नईला जाऊ शकतील. अन् गेले नाहीत तरी कोणी त्यांच्यावर कालापव्यय करण्याचा आरोप करू शकणार नाही.

इतकेच काय, कृष्णरायपुरम येथील अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदार गीता यांच्या पतीचीही चिंता आता दूर झाली असणार. “माझी आमदार बायको दोन दिवसांपासून दिसली नसून तिला माझ्यासमोर हजर करा,” अशी मागणीच गीता यांच्या पतीने चेन्नई उच्च न्यायालयात केली होती.

त्यांच्या पतीने मद्रास उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस् (व्यक्तीला उपस्थित करण्याची) याचिका दाखल केली आहे. “गीता यांच्या प्रमाणेच अनेक आमदारांना बळजबरीने कोंडून ठेवले आहे. उच्च न्यायालयाने माझ्या बायकोला शोधून माझ्यासमोर आणावे,” अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

या आमदारांना जिथे कोंडून ठेवले होते, त्या कूवंदूर येथील रिसॉर्टची कटकट गेली असेल. गेले आठवडाभर येथे आमदारांना कोंडून ठेवल्यामुळे तेथे आणीबाणीसदृश वातावरण होते. त्यामुळे आधीच असलेल्या पाहुण्यांनाही त्रास सहन करावा लागला. त्यामुळे म्हणे या रिसॉर्टची रेटिंग घसरली होती. आता आमदारांनाच हलावे लागल्यामुळे या रिसॉर्टचे दरवाजेही सताड उघडू शकतील.

पुराणकथेतील आकाशवाणीप्रमाणे ऐन मोक्याच्या वेली आलेल्या या निर्णयाचे म्हणूनच अनेक ठिकाणी स्वागत होईल. यात शंका नको!

Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा