हा आहे होय ब्राह्मणप्रतिपालकाचा इतिहास?

जे जे आपणासी ठावे

IMG-20170712-WA0002स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांचे अगदी नेमक्या शब्दांत वर्णन केले होते. नाही, नाही…मैद्याचे पोते नाही. ते नंतर. त्याच्याही आधी म्हणजे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून खुर्चीत बसले असताना ते वर्णन केले होते. “बारा पिंपळावरचा मुंज्या” हे ते शब्द होते. बाळासाहेबांची खूबी अशी, की त्यांच्या रेषांमध्ये आणि शब्दांमध्ये तरतम भाव करणे अंमळ अवघडच जाते. शरदरावांनीही आपल्या मित्राचा शब्द कधी खालू पडू दिला नाही. ते कधीही कुणाचे झाले नाहीत आणि कोणाला त्यांनी आपलेसेही केले नाही. खोटं वाटत असेल तर विचारा अजितदादांना!
तर आता या मुंज्याने नवा घरोबा केला आहे. खरे सांगायचे तर आपणच वाढवलेल्या बांडगुळावर हा मुंज्या जाऊन बसला आहे. इतके दिवस या बांडगुळाशी संबंध नसल्याचे मुंजा दाखवायचा. कदाचित बांडगुळ तेवढे मजबूत असल्याचे वाटत नसावे किंवा बांडगुळाची लाज वाटत असावी.

आता बांडगुळाची संगत धरलीच म्हटल्यावर बांडगुळाची भाषाही उचलायला हवीच. मग दोन-तीनशे वर्षांच्या अलीकडे न येणाऱ्या मावळ्यांना घेणेही आलेच. तसेच गुरु, गोब्राह्मणप्रतिपालक आणि कुत्रे अशा सुशिक्षित युवकांच्या जिव्हाळ्याचे विषय घेणेही आलेच. म्हणून शिवाजी राजांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणू नका, असे फर्मान निघते. साहेब एवढ्यावर थांबले असते तर चालले असते. पण अफझल खानाचा एकमेव उद्देश राज्यविस्तार हा होता आणि म्हणून शिवाजी राजांनी त्याला (बाय द वे, अफझल खानाला एकेरी संबोधले तर चालेल ना आता की सुशीलकुमार शिंदेंसारखे त्याला आदरार्थी विशेषण जोडायचे?) मारले, असेही त्यांनी सांगितले.

“अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला ही वस्तुस्थिती आहे. मात्र, तो स्वराज्याचा शत्रू होता आणि राज्य उध्वस्त करायला तो आला होता म्हणून त्याला नष्ट केले; मुसलमान म्हणून नव्हे,” असेही त्यांनी म्हटले होते. पुलोद सरकारच्या वेळेस मुख्यमंत्रीपदाचा हव्यास होता म्हणून नव्हे, तर जनतेची मागणी होती म्हणून वसंतदादांना त्यांनी दगा दिला होता, तसेच होते हे! दहा वर्षांच्या कृषिमंत्रीपदाच्या कारकीर्दीत लाखो शेतकऱ्यांना नागवल्यानंतर साहेबांनी इतिहासाच्या काष्ट्याला हातत घातला आहे.

पण अर्थात त्यामागे त्यांचा जातीद्वेष मुळीच नाहीत. ते इतक्या स्वच्छ मनाचे आणि पुरोगामी विचारसरणीचे आहेत, की जातीचा विचार त्यांच्या मनालाही शिवत नाही. त्यांचा हेतू राजकीयही नव्हता, कारण आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ते अशा उंचीला पोचले आहेत, की प्रत्येक पद त्यांच्या पुढे खुजे भासते (कोल्ह्याला द्राक्षे भासली तशी)!
“शाळेत शिकत असताना वेगळाच इतिहास शिकविला गेला. तर विशिष्ट वर्गाने त्यांना सोयीचे असलेले ज्ञान देण्याची खबरदारी घेतली. त्यामुळे बहुजन समाजातील काही पिढ्या वेगळ्या इतिहासाची मांडणी करण्यात गेल्या. आता कुठे हळूहळू वस्तुनिष्ठ इतिहास समोर येऊ लागला आहे,” असे गेल्याच महिन्यात त्यांनी एखाद्या तर्कतीर्थाच्या थाटात सांगितले होते. हा इतिहास नक्की कोणता होता, ते आता समोर येऊ लागले आहे. शेजारी दिलेल्या चित्रात त्या इतिहासाची चुणूक दिसते. परवा साहेबांनी ज्या पुस्तकाचे अनावरण केले, त्या पुस्तकातील हे पान आहे असे सांगितले जाते.

श्री. प्रतापराव पवार लिखित ‘निवडक वाटचाल’ पुस्तकातील पान

मातोश्री जिजाऊंनी म्हणे आर्यब्राह्मणांच्या विरोधा शिवाजीराजांना मार्गदर्शन केले! ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ या शब्दावर साहेबांनी जरा जास्तच भर दिला होता. वास्तविक महाराजांना ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ म्हणण्यास साहेबांचा जराही विरोध नव्हता. ज्या प्रमाणे शिवाजी राजांची ‘जाणता राजा’ ही पदवी साहेबांनी बेमालूम हिसकावली, तशीच ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ ही पदवीही त्यांना हवी आहे. 

कारण जेवढे ब्राह्मण शरद पवारांनी त्यांच्या कार्यकीर्दीत पाळले, तेवढे प्रत्यक्ष पेशव्यांनीही पाळले नसतील. यांना तब्येत सांभाळायला डॉ. बापट लागतात, धंदे सांभाळायला अनिरुद्ध देशपांडे लागतात…गेला बाजार ज्ञानेश्वर आगाशे तर लागतातच. वैचारिक क्षेत्रात गोविंद तळवलकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मधुकर भावे यांच्यासारखे लोक लागतात.

बरे, ब्राह्मणांच्या संगतीत राहायचे ही काही त्यांची बुद्धी नाही. त्यांना शिकवणच तशी दिलेली. “आमच्या आईने (शारदाबाई पवार) यांनी ब्राह्मण मुलांच्या संगतीत राहा,” अशी शिकवण दिल्याचे श्री. प्रतापराव पवारांनीच त्यांच्या आत्मचरित्रातच दिलेले आहे.

आयुष्यभर मी ज्या ब्राह्मणांना सांभाळले, त्यांच्या प्रतिपाळाचे श्रेय शिवाजी राजांना कसे जाते हे शरद पवारांचे खरे दुखणे आहे. त्यासाठी महाराजांना ब्राह्मणांपासून तोडणे आवश्यक आहे. म्हणून कल्पनेची श्रीमंती मोकाट सोडून नवा इतिहास लिहिला जातोय. आता एक तर या आधुनिक जाणत्या राजाला ‘ब्राह्मण प्रतिपालक’ म्हणून मान्यता द्या, नाही तर छत्रपतींच्या चारित्र्यावर आणि माहात्म्यावर आणखी घाव पडण्याची वाट राहा.

2 comments

  • कर्तुत्व नाही म्हणून हे अशे उद्योग करतात आणि इतिहास बदलून यांची पोट भरणार की भारत पुढे जानार?
    येवढीच धमक असेल तर भारतातील गरीबी बलात्कार
    लाजखोरी सीमा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तरी खुप झाले

    • तसले काही स्वत:ही करायचे नाही आणि इतरांना करूही द्यायचे नाही. जी माणसे मनाने १५०-२०० वर्षांच्या अलीकडे यायला तयारच नाहीत, त्यांना आजच्या समस्या दिसणार कशा आणि त्या ते सोडवतील कशा?

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा