कलगीतुरा चालू आहे, पुढच्या अंकासाठी सज्ज व्हा

जे जे आपणासी ठावे, मनोविनोद

अडीच वर्षांपासून ‘सख्खा मित्र पक्का वैरी’ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मऱ्हाटी जनतेची भरपूर करमणूक केली आहे. एवढी की, त्यामुळे राज्याच्या अन्य समस्यांची आचही जाणवेनाशी झाली आहे. हे दोघे वादावादी सुरू करतात कधी आणि त्यासाठी मुद्दा कोणता निवडतात, एवढेच फक्त औत्सुक्य. हा मुद्दा किती फालतू किंवा क्षुल्लक असावा, यावर अद्याप सट्टाबाजारात पैजा लागत नाहीत, हेच आश्चर्य. किंबहुना त्यामुळे सट्टा बाजार किती मागासलेला आहे, हेच उघड होते. त्यांची ही जुगलबंदी पाहूनही काँग्रेस-एनसीपीने अद्याप ओंजळभर पाण्यात उडी मारली नाही. खरोखरच हे लोक निर्लज्जच म्हणावे लागतील.

दोन्ही पक्षांनी पूर्ण दोन वर्षे राज्यातील जनतेला नूरा कुस्तीचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे शिवकाळाच्या बाहेर न आलेल्या शिवसेनेला काही प्रमाणात अलीकडच्या काळात आणण्याचे श्रेय यातून भाजपला मिळाले. आता या भांडणात कालापव्यय झाला, असे काही जण म्हणतात. परंतु प्रत्येक चांगल्या गोष्टीत काही वाक काढणारे लोक असतातच. त्यांचे काय मनावर घ्यायचे. यांच्या अशा वावदुक भांडणांमुळे जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काही जण करतात. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासकट अनेक नेते व पत्रकार असतात. आता हे लोक असे बोलतात, तेव्हा ऐकणारे सगळे गालातल्या गालात, मिशीतल्या मिशीत किंवा दाढीतल्या दाढीत (जे लागू असेल ते) हसतात. कारण हा आरोप करणाऱ्यांसकट कोणावरही विश्वास ठेवायला ही जनता काही दुधखुळी आहे का? आता हे खरे, की ऐन मतदानाच्या दिवशी कोणाच्या ना कोणाच्या मेहरबानीने जनतेला क्वार्टरखुळी व्हायला होते. पण ते तेवढ्यापुरतेच.

एक लक्षात आले का तुमच्या? गेल्या काही दिवसांत चित्रपटगृहांत मोठे चित्रपटच लागलेले नाहीत. ना हिंदी ना मराठी. कसे लागतील? मल्टिप्लेक्सातले प्रेक्षक मतदानाच्या सुटीचे नियोजन करण्यात गुंग तर पिटातले प्रेक्षक दादा-भाईंच्या प्रचारात दंग. मग तिकिटबारीवर येणार कोण आणि पैसे खर्चणार कोण? उलट घरातल्या टीव्हीसमोर बसले, की सगळी पैसा वसूल करमणूक हात जोडून (अक्षरशः) उभी! चोहो बाजूने एकाहून एक नटसम्राट आणि नोटसम्राट उभे असताना स्वतःच्या दमड्या खर्चून कोण जाणार तिकडे? या निवडणुकीचा प्रचार पाहून म्हणे गेल्या काही वर्षांतील वारे उलटे वाहू लागले आहेत. आतापर्यंत राजकारणी नट-नट्यांना आपल्या व्यासपीठावर आणत असत आणि गर्दीची बेगमी करत असत. पण आता म्हणे नट-नट्या आपल्या नेत्यांकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. म्हणजे पुरस्कार निश्चित!

‘एक तर तू आहेस नाही तर मी आहे,’ या नावाचा हा राजकीय वग फारशी काही गर्दी खेचत नव्हता. पण त्याची चर्चा मात्र होत होती. यातील मुख्य पात्र दोन.

एकीकडे शिवशाहीच्या स्मरणरंजनातून बाहेर न पडणारी शिवसेना होती. (याला कल्पनारंजन म्हणायचे, स्वप्नरंजन का स्मरणरंजन? कारण शिवशाही पाहिलेले आज कोणीही अस्तित्वात नाही आणि ज्या शिवकाळाचे चित्र रंगवण्यात येते त्यात वास्तव किती आणि कल्पना किती?) तिला जनतेच्या कल्याणाची खूपच काळजी. एवढी की नोटाबंदीनंतर तिने थेट आरपार की लढाईच चालू केली. चीट फंड व अन्य गैरव्यवहारांवरुन अडचणीत आलेल्या ममता बॅनर्जी व सहकाऱ्यांसोबत बिनदिक्कत जायला कमी केले नाही तिने. ममताच काय, कालपर्यंत ज्यांच्यावर तोंडसुख घेतले त्या डॉ. मनमोहन सिंह यांच्या आरत्या ओवाळण्या चालू केले. नंतर ऐन प्रचाराच्या काळात हार्दिक पटेल नावाच्या दिवट्यालाही हाताशी धरले.

याच्या विरुद्ध बाजूला होती स्वस्तातील चीनी अॅम्लिफायर तोंडात लावलेले भाजपची मंडळी. ज्या प्रमाणे चीनी मालाची गॅरंटी ती वस्तू विकल्या विकल्या संपते, त्याच प्रमाणे या मंडळीचा भरवसा बोलू लागला रे लागला की संपतो. मग त्यांच्या मुखातून काय बाहेर पडेल, हे साक्षात ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. जोडीला यांची जातीयवादी, गुंड, गुन्हेगार, सरंजामदार, मस्तवाल इ. ना पावन करून घेण्याची एक खिडकी योजना सुरू होतीच. त्यामुळे किर्तनाला म्हणून जावे आणि तिथे डिजेचा गोंधळ पाहायला मिळावा, अशी गत झाली. आतून बितून काही नाही, स्वच्छ पारदर्शक गोंधळ!

या दोघांनी जनतेसाठी काय केले नाही? एकमेकांचे कपडे फाडले, एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडले, एकमेकांची धुणी धुतली, एकमेकांना शिव्या घातल्या, एकमेकांविरोधात कज्जेबाजी केली. भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात असलेल्या नवरसांपैकी एकूण एक रस यांच्या रूपाने वावरत होते – या व्यासपीठावरून त्या व्यासपीठावर. बीभत्स म्हणू नका, करूण म्हणू नका, गेला बाजार शृंगार म्हणू नका – एकही रस सोडला नाही पठ्ठ्यांनी.

आता हे दोन मल्ल एकमेकांना भिडत असताना बिचाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काय करावे? फार फार तर पंधरा वर्षे राज्याला लुटणे हीच त्यांची जमा. जे काही बाहूबळ होते ते या दोन भगव्या पठ्ठ्यांनी खेचून नेलेले. म्हणूनच आमच्याकडे फक्त पाच लाख रुपये राहिलेत म्हणून पवारांनी कैफियत मांडावी काय आणि आम्हाला पैसे कमी पडताहेत, असे अशोक चव्हाणांनी सांगावे काय. घेतले पचवून लोकांनी. त्यातही मी पाठिंबा देणार नाही, हवे तर लिहून देतो असे सांगून शरद पवारांनी एक नाट्यछटा सादर केली. ती बहारदार होती.

ऐन आयपीएलचा सामना चालू असताना मैदानाबाहेर राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा चालू असावी, तशी या दोघांची गत झाली होती. एकुणात लोकांना आपल्या दुःखांचा विसर पडावा आणि घटकाबर त्यांना बरे वाटावे, यासाठी त्यांनी काहीही कसूर ठेवली नाही. आपल्या वाट्याला आलेली भूमिका त्यांनी इरेला पेटून बजावली, एवढे म्हणता येईल. तेवढे गुण त्यांना द्यायलाच पाहिजेत.

त्यातल्या त्यात एकच गोष्ट समाधानाची आहे. आज मतदान झाले तरी या राजकीय वगावर पडदा पडणार नाही. एक अंक संपत आलाय. पुढच्या अंकासाठी तयार राहायला हवे. त्याशिवाय का पुरोगामी, विकसित इ. इ. महाराष्ट्राचे भले होणार आहे? ‘एक तर तू आहेस नाही तर मी आहे,’ या शीर्षकाचा हा वग पुढच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांपर्यंत चालू राहणार आहे. तोपर्यंत कोणा-कोणाच्या टाळ्या देण्याचे आवाज येतात, ते मात्र पाहावे लागेल.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा