पुरे जाणतो मीच माझे बळ

shiv sena national executive

shiv sena national executiveआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठीच कृपा केली आहे. म्हणजे यापूर्वी प्रत्येक निवडणुकीपूर्वी वेळकाढूपणा करून कुठेच काही जमत नाही म्हटल्यावर स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. तसे काही त्यांनी यावेळी केले नाही, ही एक फार मोठी घटना म्हणावी लागेल.

त्यांच्या या वाघगर्जनेचे पडसाद अखिल भूमंडळात उमटतील, अशीच शिवसेना नेत्यांची समजूत झाली असेल. शिवसेनेच्या एकूण विचार वर्तुळात त्यांची स्वतःची प्रतिमा अशीच आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठराव मांडणारे खासदार संजय राऊत यांच्या वागण्या-बोलण्यातून त्या समजाचे प्रतिबिबंब सातत्याने पडतच असते. परंतु (सेनेच्या) दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही. भारतीय जनता पक्ष सरकारच्या अस्तित्वामुळे मनातून खट्टू असलेल्या लोकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटणे, या पलीकडे या वाघगर्जनेचा अन्य उपयोग नाही.

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यातील बहुतेक सर्व नेत्यांवर उद्धव ठाकरे यांनी तोंडसुख घेतले. नरेंद्र मोदी यांच्यावर कोणीच टीका करत नसल्यामुळे, सगळे जण त्यांची पूजा-भक्ती करत असल्यामुळे आणि फक्त उद्धव ठाकरेच हेच त्यांच्यावर टीका करण्याचे धाडस दाखवत असल्यामुळे मोदी त्यांना खूप टरकत असतात. (हाही राऊतप्रणित शिवसेनेच्या आत्ममग्न प्रतिमेचाच एक पैलू).

जातीयवाद्यांनी हिसका दाखवल्यामुळे व्यंगचित्रकाराचे सदर बंद करणाऱ्या शिवसेनेच्या मुखंडांनी यानिमित्ताने विनोदाची मेजवानी तेवढी दिली. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी हा शब्दच मुळी या विनोदाचा स्टार्टर मेनू होता. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदी झालेली निवड हा त्यातील खास जिन्नस. अन् २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठराव हा त्यातील मेन कोर्स. “या ठरावाला कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला,” हे वाक्य लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या आणि वाचणाऱ्या अशा सर्वांच्याच ओठांवर स्मित खुलवून गेले असणार.

चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ या मुंबईबाहेरील नेत्यांची नेतेपदी केलेली निवड ही मात्र शिवसेनेच्या बैठकीतील निःसंशय स्वागतार्ह बाब. अखंड महाराष्ट्राचा नामजप करत मुंबई-कोकणचे नेतृत्व सर्व भागांवर लादण्याच्या पक्षाच्या परंपरेला त्यामुळे फाटा मिळाला आहे.

आपला कधीकाळचा मोठा भाऊ, नंतर होऊ घातलेला छोटा भाऊ आणि आता कागदोपत्री मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या या मेजवानीत त्याला एकटे वाटू नये, म्हणून भाजप नेत्यांनीही आपली पिपाणी वाजवायला सुरूवात केली. “शिवसेना स्वबळाची भाषा करत असल्यास 2019च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकाही भाजपा स्वबळावर लढवण्यास तयार आहे. परंतु शिवसेनेनं स्वबळावर लोकसभा निवडणूक लढण्यास त्यांचेच नुकसान होणार आहे,” असे भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे. भाजपचे नवप्रसिद्ध खासदार संजय काकडे यांनीही आपले चिमखडे बोल काढले आहेत. 

शिवसेना आणि भाजप या दोघांचेही बळ एकमेकांवाचून उणेच आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सत्तेत आल्यापासून दोघांमधून विस्तवही जात नाही, ही गोष्ट जेवढी खरी तेवढीच एकमेकांमुळेच दोघांचीही चूल पेटती आहे, हेही वास्तव आहे.

त्यामुळे पक्षाच्या ठरावाची दर्शनी किंमत फारशी मनावर घ्यायचे कारण नाही. तसेही निवडणुका वेगळ्या लढविण्याच्या ठरावाला ज्या प्रकारे कार्यकारिणीने माना डोलावून संमती दिली, तसेच युती करण्याच्या आदेशालाही ती देईल. ज्या पक्षात नेत्याचा शब्द हा अंतिम असतो, तेथे कागदाच्या भेंडोळ्याला विचारतो कोण? तसे नसते तर अफझालखानाच्या अवलादीसोबत संसार कोण मांडला असता? मोठा भाऊ आणि लहान भाऊ यांचे हे भांडण खाऊसाठीच आहे, हे ‘माझ्या तमाम बांधवांना’ माहीत आहे.

‘पुरे जाणतो मीच माझे बळ’ ही ओळ आत्मसामर्थ्य व्यक्त करण्यासाठी लिहिण्यात आली. पण शिवसेना आणि भाजपच्या दृष्टीने ती आपापल्या सामर्थ्याच्या मर्यादा जाणण्याची आहे. ती लक्षात घेऊनच दोन्ही पक्ष पुढे जाणार आहेत. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा याचेच सूचक आहे.
Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा