चोराच्या मनात चीन!

जे जे आपणासी ठावे

W020170123517156590109

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे थोर देशभक्त आहेत, यात वाद नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा सांगणाऱ्या काँग्रेसची दारोमदार त्यांच्यावर आहे. शिवाय नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी यांच्या कुळात जन्म झालेला असल्यामुळे तो सर्व वारसा – त्यातील देशभक्ती आणि स्वदेशभक्तीसह – त्यांना लाभलाय यात काहीही वाद नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कृतीकडे संशयाच्या नजरेने पाहण्यात अर्थ नाही. शिवाय त्यांची प्रत्येक कृती जगाला सांगून-सवरून केलेली असते.

ते कुठे जातात, काय करतात, सुट्ट्या कशा आणि कुठे घालवतात याबद्दल त्यांनी कधीही शंकेला वाव ठेवलेला नाही. पर्यटनस्थळाच्या थाटात एखाद्या दलिताच्या घराला दिलेली भेट असो किंवा खाटांवर बसून चर्चा करण्याची त्यांची मोहीम असो, त्या प्रत्येक वेळी माध्यमांचा जामानिमा त्यांच्यासोबत होता. आडपडदा नावाची गोष्टच त्यांच्याकडे नाही. त्यामुळे एका साध्याशा भेटीवरून त्यांच्याविरोधात गहजब व्हावा, हे काही योग्य नाही. काँग्रेसला शक्य असते तर हीच कथा पक्षाने भारतभरात प्रसृत केली असती. पण ते शक्य नाही, म्हणून जो काही तोडकामोडका खुलासा काँग्रेसच्या मुखंडांनी केलेला आहे, त्याच्या दर्शनी मूल्यासह समाधान मानणे भाग आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या राजदुतांशी भेट घेतली आहे असा कबुलीजबाब काँग्रेसचे प्रवक्ते यांनी दिला आहे. आज नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी यांनी चीनचे राजदूत लु झाओहुई यांची भेट घेतली असून भूटानचे राजदूत शिवशंकर मेनन यांची देखील भेट घेतली अशी माहिती आर.एस. सुरजेवाला यांनी म्हणूनच उघड केली. आठ जुलै रोजी लु झाओहुई आणि राहुल गांधी यांची भेट झाली होती. मात्र राहुल गांधी राजदूतांना भेटले ही काही मोठी बाब नाही आणि याचा काही मोठा मुद्दा करण्याची गरज नाही असे सुरजेवाल यांनी आज सांगितले आहे. किती हा ठामपणा, किती ही खंबीरता.

प्रश्न एवढाच आहे – ही गोष्ट जर एवढ्याच निर्मळ मनाने केली होती, तर ती जाहीर करण्यास कुठे माशी शिंकली होती? राहुलजींनी चीनी राजदूताची भेट घेतल्यानंतर सुरुवातीला कॉंग्रेसने त्याची वाच्यताच केली नव्हती. पण त्यांच्या दुर्दैवाने ही बातमी बाहेर कोणाला सांगू नका, असे चिनी लोकांना सांगायला ते विसरले असावेत. एरवी चिनी सरकारच्या संकेतस्थळाने ती जाहीर केली नसती. त्यावरून बोफोर्स प्रकरणाची आठवण झाली. या बोफोर्समध्ये दलाली दिल्याची पहिली बातमी स्विस रेडियो इंटरनॅशनलने दिली होती, भारतातील एका वृत्तपत्राने दिली नव्हती!

आता यात दुर्दैव नं. 2 आडवे आले. बोफोर्सच्या काळात माध्यमे जशी मोजकी होती, तशी ती नाही. त्यातही सोशल मीडिया नावाचा एक त्रस्त समंध उभा आहे. भल्याभल्यांची भंबेरी उडविणाऱ्या या समंधाचा युवराज राहुल यांच्याशी विशेषच जिव्हाळा! त्यामुळे त्या बाजूने टिकेची राळ उडाल्यानंतर त्यांनी ते मान्य केले. हे करतानाही त्यांनी आपला वावदूकपणा जाहीर करायला मागेपुढे पाहिले नाही.
“विविध गंभीर मुद्द्यांबाबत जाणून घेणे हे माझे काम आहे, त्यामुळे मी चीनी राजदूत, माजी सुरक्षा सल्लागार, ईशान्य भारतातील नेते आणि भूतानचे राजदूत यांची भेट घेतली. केंद्र सरकारला माझ्या चीनी राजदूतांच्या भेटीबद्दल आक्षेप वाटत असेल तर केंद्र सरकारने देखील कबुली जबाब द्यावा की, सीमेचा एवढा गंभीर मुद्द्यावर वाद सुरु असताना केंद्र सरकारचे तीन मंत्री चीनमध्ये पाहुणचार का घेत होते?“ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आजच्या घडीला राहुल गांधी यांचे स्थान सामान खासदारापेक्षा जास्त नाही. एकीकडे सीमेवर चीन आणि भारताची खडाखडी चालू असताना हे महाशय चीनच्या राजदूताला भेटतात. तेही गुपचूप. यांची हिंमत एवढी, की त्याबद्दल लपवाछपवी करण्यासही ते व त्यांचे गणंग मागे-पुढे पाहत नाहीत. त्यानंतर उपकार केल्यासारखे हे युवराज “हो, मी चिनी राजदूताला भेटलो होतो,” हे जाहीर करतात! आणि हेच लोक नरेंद्र मोदी वारंवार परदेश दौऱ्यावर जात असल्याबद्दल बोंबा मारतात. मोदी अमेरिकेला जावो किंवा टिंबक्टूला, पण त्यांच्या प्रत्येक दौऱ्याचा तपशील, हिशेब उपलब्ध असतो. राहुल गांधी तसा दावा करू शकतात काय?
मोदी शी जिनपिंग यांना झोपाळ्यावर सोबत घेऊन बसले होते, हे खरे आहे. पण तो झोपाळा जगजाहीर होता. यांच्यासारखा अंधारातला मामला नव्हता. या वादग्रस्त भेटीच्या आगेमागेच राहुल गांधींनी अंगात आहे तेवढे बळ काढून “मोदी हे दुबळे पंतप्रधान” असल्याचे विधान केले होते. हे त्यांचे मत चिनी विद्वानांना भेटण्यापूर्वी बनले होते का नंतर बनले होते? संसद सदस्य आणि संसदेच्या परदेश विषयक समितीचे सदस्य म्हणून राहुल गांधींना सामान्यांपेक्षा बरीच जास्त माहिती मिळते. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी हे त्यांच्या दिमतीला नेहमी असतातच. मग राहुलना चिन्यांकडून अशी कोणती माहिती हवी होती, की ती या लोकांकडून मिळाली नसती.

पाकिस्तानाच जाऊन ‘मोदी हटल्याशिवाय आपले संबंध सुधारणार नाहीत‘ असे सांगणारे गणंग राहुलच्या आगे-मागे फिरतात. म्हणून चिन्यांकडे जाऊन त्यांनी चहापान करणे आणि वर त्याचा बोभाटा होऊ नये म्हणून धडपड करणे, हे संशयास्पदच आहे. तुमच्या मनात काही तरी काळेबेरे आहे, हे दाखवून देणारा हा प्रकार आहे. चोराच्या मनात चीन आहे, एवढे नक्की!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा