सोनियांचे अज्ञान आणि अज्ञानाचे गुलाम

DGxRDGhWAAAm1IHवैभवाचे दिवस भोगलेल्या जमीनदाराला उतरती कळा लागल्यावर सणा-वाराला जुन्या संपत्तीच्या आठवणी काढायची त्याला आठवण होते. आपला तालेवारपणा जन्मजात आहे आणि दुसऱ्या कोणाकडे तो नाही, हे सांगण्याची त्याची धडपड असते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणवून घेणाऱ्या पक्षाची अवस्था आज तशीच झाली आहे. वर्तमानातील कर्तृत्व संपल्यामुळे जुन्या भांडवलाच्या आठवणींचे कढ काढणे, एवढेच कार्य या पक्षाला उरले आहे. अन् आपली रेषा मोठी असल्याचे सांगण्याऐवजी दुसऱ्याची रेषा छोटी असल्याचेच सांगण्यातच यांची हयात खर्ची पडत आहे.

स्वातंत्र चळवळीतील (काँग्रेसचा) महत्वाचा टप्पा असलेल्या ‘चले जाव’ चळवळीला बुधवारी 75 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त लोकसभेची विशेष बैठक काल झाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या बैठकीत केलेले भाषण हे जुन्या जमीनदाराला साजेशेच होते. ते त्यांनी स्वतःच्या गुणगानापुरते मर्यादीत ठेवले असते, तर कोणाची ना नव्हती. पण आपल्या पक्षाभोवती आरती ओवाळताना बाकी सगळ्यांचेच योगदान रद्दीत काढले.

“देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या ‘चले जाव’ चळवळीलाही विरोध केला होता,” असे सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितले. यामागे त्यांचे जाणूनबुजून प्रयत्न होते, असे न समजता ते त्यांचे अज्ञानच होते, असे मानूया. राजकीय विरोधक म्हणून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा त्यांचा हक्कही समजण्यासारखा आहे. त्यामुळे “आज धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे,” वगैरे त्यांची टीका धकेलही. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळण्यात अन्य कोणाचेही योगदान नाही, हा छातीठोक दावा त्या कशाच्या जोरावर करतात?

मूळ म्हणजे स्वातंत्र्यलढा म्हणजे फक्त सत्याग्रह आणि तुरुंगभरती नव्हे. अनेकांनी अनेक प्रकारे स्वातंत्र्यलढा लढला. कोणी सशस्त्र आंदोलने केली, कोणी जुलमी अधिकाऱ्यांना संपविले, कोणी ब्रिटन आणि युरोपमध्ये कायदेशीर लढाया लढल्या. रासबिहारी बोस व नेताजी सुभाषचंद्र बोसांसारख्या नेत्यांनी स्वतःचे सैन्य उभारून लढा दिला. परंतु सोनियाचींच्या लेखी स्वातंत्र्यलढा म्हणजे, “स्वातंत्र्य चळवळीदरम्यान पंडित नेहरुंनी त्यांच्या जीवनातील अनेक वर्ष तुरुंगात घालवली. अनेक काँग्रेस नेत्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला.” महात्मा गांधींबद्दलही ज्यांच्या तोंडून कौतुकोद्गार निघत नाही, त्यांनी विरोधकांना संकुचित म्हणावे?

बरे असे समजू की 1942 ची चळवळ हीच एकमेव चळवळ होती. तर किमान रा. स्व. संघाने तरी आपल्या स्वयंसेवकांना या चळवळीत वैयक्तिक सहभाग घेण्यास सांगितले होते. संघटना म्हणून तिने भाग घेतला नव्हता. विरोध करायचा तर प्रश्नच नव्हता. तरीही सरसंघचालक गुरुजी गोळवलकर अच्युतराव पटवर्धनांना नगर येथे जाऊन भेटले होते. संघाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे त्यांना विचारले होते. पण काय करायचे, हे त्यांनाही माहीत नव्हते. त्यामुळे संघ म्हणून सहभागी न होता प्रत्येक स्वयंसेवकाने व्यक्तिशः सहभाग घ्यावा अशा सूचना संघाने दिल्या. आष्टी, चित्तूर, यवतमाळ येथे गोळीबारात मारले गेलेले सर्वजण संघ स्वयंसेवकच होते. भूमिगत पुढार्‍यांच्या निवासाची व सुरक्षेची व्यवस्था संघ स्वयंसेवकांनीच केली होती. साने गुरुजी पुण्यात मोतीवाले आपटे यांचेकडे होते, अरुणा असफअली यांना दिल्लीचे संघचालक लाला हंसराज गुप्ता यांनी आश्रय दिला होता. क्रांतिसिंह किसनवीर व सेनापती बापट हेही काही काळ संघ स्वयंसेवकांच्याच घरी लपून छपून राहिले होते.

दुसरीकडे स्वा. सावरकरांच्या नेतृत्वाखालील हिंदू महासभेने या चळवळीला विरोधही केला नव्हता आणि पाठिंबाही दिला नव्हता. परंतु त्यामागे कारण होते ते चळवळीमागच्या भोंगळ ठरावात. ‘चले जाव’ ही या चळवळीची घोषणा, परंतु ती अर्धवट होती. त्याचे पूर्ण स्वरूप ‘तुम्ही जा, परंतु तुमचे सैन्य येथे ठेवा’ असे होते. कारण ब्रिटिशांनी जावे परंतु त्यांचे सैन्य येथेच ठेवावे, असे त्या ठरावात म्हटले होते. दूरदृष्टीच्या सावरकरांना त्यातील धोका लगेच लक्षात आला होता. एकीकडे ते भारतीय तरुणांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रवृत्त करत होते, जेणेकरून या तरुणांनी सैन्याचे प्रशिक्षण घ्यावे आणि ब्रिटिशांविरुद्धच त्याचा वापर करावा. त्यांचे हे धोरण नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारल्यावर फलद्रूप झाले. आझाद हिंद सेनेचे दैव बलवत्तर म्हणून त्याचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांत एक-दोन पाने येतो. पण या सैन्याला जवान कुठून मिळत होते, हे कोणीच सांगत नाही. अन् हेच लोक अकबराऐवजी शिवाजीला महत्त्व ठोकले म्हणून धाय मोकलून रडतात!

शिवाय 1942च्या चळवळीपासून फटकून राहणारे फक्त संघ किंवा हिंदू महासभा नव्हते. साम्यवाद्यांनी आणि खुद्द डॉ. आंबेडकरांनी ही या चळवळीला विरोध केला होता. कारण मुळातच त्या चळवळीचा पाया ठिसूळ होता, हे डॉ. आंबेडकरांना दिसत होते. या चळवळीला विरोध करताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, “अशा प्रकारच्या चळवळींतून अराजक निर्माण होऊन हा देश जपान्यांच्या कब्जात जाणे रोखणे, हे सर्व देशभक्त भारतीयांचे कर्तव्य आहे.”

डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर व हिंदुसभा, आर्यसमाज, कम्युनिस्ट पार्टी यांपैकी कोणीही या आंदोलनात सहभागी नव्हते. कारण काँग्रेसने आंदोलन पुकारण्यापूर्वी यातल्या कोणाशीही चर्चा केली नव्हती. हा निव्वळ एकतर्फी आणि अविचारी केलेला प्रयत्न होता.

अन् सरतेशेवटी 1942च्या चळवळीचे कितीही महिमामंडन केले, तरी ती शेवटी अपयशी चळवळ होती हेच वास्तव आहे. कारण करो या मरो म्हणून सांगितले तरी त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळालेच नाही. उलट तुरुंगातून सुटल्यावर नेहरु वगैरे मंडळी थेट प्रांतीय सरकारांमध्येच जाऊन बसली. “‘चले जाव’ चळवळ पूर्णतः अपयशी ठरली. हे वेडेपणाचे पाऊल होते आणि ते पूर्णपणे उलटले. ते एक प्रकारचे दग्धभू धोरण होते, त्यातील लूट, हिंसाचार व हत्यांच्या पीडीत व्यक्ती भारतीय होत्या आणि ते करणारे काँग्रेसजन होते,” असे डॉ. आंबेडकरांनी म्हणूनच म्हटले होते. (थॉट्स ऑन पाकिस्तान) कार्यक्षम संघटनेचा व कार्यक्रमांचा अभाव यांमुळे ही चळवळ फसली, अशी मीमांसा या लढ्यात भाग घेतलेल्या जयप्रकाश नारायण यांनीही नंतर केली होती.

भारताला स्वातंत्र्य देताना पंतप्रधान अॅटलींनी जे निवेदन केले होते, त्यात “दुसऱ्या महायुद्धाचा आर्थिक बोझा पडल्यामुळे ब्रिटनची झालेली हलाखी आणि सैन्यावरचा उडालेला विश्वास” हीच कारणे दिली आहेत. म्हणजे अंतिमतः स्वातंत्र्यास कारणीभूत ठरली ती सावरकर-नेताजींची रणनीती!

त्यामुळे अडखळत-अडखळत सोनियांनी वाचलेल्या या भाषणामुळे हरखून गेलेल्यांचा हा आनंद अज्ञानातील आनंद आहे. एक अभिनिवेश सोडला तर त्यात तथ्याचा मागमूसही नाही. अर्थात सोनियांच्या अज्ञानाचे गुलाम असलेल्यांना त्या अज्ञानाचाही आनंद मिळेल. तो त्यांना लखलाभ!

2 Comments

 1. लेख उत्तम आणि परखड

  पण अश्या फालतू पक्षाला आता केवळ अनुल्लेखानेही मरण येईल तेंव्हा अश्या बांडगुळ लोकांवर वेळ घालवायला नको

  त्यापेक्षा आता चांगले काय होतंय ते जास्त प्रसारित करायला पाहिजे

  सामान्य माणसाची स्मरणशक्ती कमी असते आणि हे पुरोगामी निवडणुका आल्या की पुरस्कार वापसी गॅंग ला बाहेर काढून पुन्हा पोळी भाजतील

  राजकारण पुन्हा भावनेच्या मुद्द्यावर न जाऊ देण्याची जबाबदारी खऱ्या पत्रकार, लेखकांवर आहे

  शेवटी एकच, हाथी चले अपनी चाल, बाकी भोंके कुत्ते चार

  हे ध्यानात घेऊन हाथी क्या कर रहा है ह्यावर बुद्धिवादी लेखकांनी लक्ष केंद्रित करावे ही नम्र सूचना

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा