अण्णा केजरीनिना

जे जे आपणासी ठावे

सगळी यशस्वी आंदोलने एकसारखीच यशस्वी होतात, पण प्रत्येक अयशस्वी आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने अयशस्वी होते!

anna_hazare_and_arvind_kejriwal_1350992276_540x540लिओ तोल्स्तोयने ‘अॅना कॅरेनिना’ ऐवजी राजकीय कादंबरी लिहिली असती, तर तिची सुरूवात अशी झाली असती. महात्मा गांधी यांच्या काँग्रेस पक्षापासून जयप्रकाश नारायण यांच्या जनता पक्षापर्यंत धूळधाण उडालेल्या पक्ष व आंदोलनांची भारतात भरमार आहे. संपूर्ण क्रांती घेऊन येणाऱ्या जयप्रकाशांच्या चेल्यांनी त्यांचेच दात घशात घातले. त्यानंतर ‘राजा नहीं फकीर है, देश की लकीर है’ अशी ललकारी देऊन आणलेल्या मंड्याच्या राजानेही लोकांचा असाच भ्रमनिरास केला. या सर्व चळवळी-आंदोलनांना तोंडावर आपटण्यासाठी वर्ष-दीड वर्षाचा कालावधी पुरला. पण अण्णा हजारेंना वापरून घेऊन अरविंद केजरीवालांनी ज्या गेमाडपंथी वास्तुशास्त्राला जन्म दिला त्याला तोड नाही. गेली पाच वर्षे हा नैतिकतेचा नाट्याविष्यकार भारतीय जनता पाहत आहे.
अण्णा हजारे हे राळेगण सिद्धीच्या पंचक्रोशीचे दैवत. दिल्लीच्या आयआयटीछाप अभियंत्याने या दैवताची पुण्याई वापरायचा निर्णय कधीचाच घेतला होता. बाकी ती भ्रष्टाचारविरोधातील लढाई वगैरे निव्वळ भाषणबाजी होती. एखाद्या पानाच्या ठेलेवाल्याने स्वत:चा माल खपविण्यासाठी ‘अमुक पंचतारांकित हॅाटेलजवळ’ अशी जाहिरात करावी, असा तो प्रकार होता. मतलब फक्त माल खपवण्याशी होता, काय खपते याच्याशी नव्हे.
इकडे दुष्काळी नगर जिल्ह्यातील चार-पाच तालुक्यांपुरते मर्यादित झालेल्या अण्णांनाही स्वत:चा महीमा वाढविण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देश देत नव्हती. मग केजरीवाल व त्यांच्या गणंगांनी अण्णांची कॅमेरानुकूल तयारी करून घेतली. होतकरू प्रति-गांधीनीही मनापासून त्याला प्रतिसाद दिला. अन् सुरू झाली राजधानीतील एका शोकांतिकेला सुरूवात – कादंबरीच काय, एखाद्या रंजक चित्रपटालाही मागे टाकील अशी शोकांतिका!
या शोकांतिकेच्या कथनात काय नव्हते? प्राण त्यागण्याच्या वल्गना होत्या, एकमेकांवर डाफरण्याचे भावनोत्कट प्रसंग होते, वारंवार थपडा खाण्याचे हिंसक व खळबळजनक प्रायोजित वगनाट्य होते – फार कशाला, यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी एका गरीब शेतकऱ्याचा जीव जाण्याचा करुण क्षणसुद्धा होता. मोठ्या विश्वासाने ज्याच्या हाती लोकांनी सत्ता दिली, तो नौटंकीबाज राज्य चालवायचे सोडून नवरसाची उधळण करत होता. अन् ज्याच्या नावाची हुंडी वापरून हे नाटक उभे करण्यात आले होते त्या देवाचा शेंदूर पार उडाला होता.
महात्मा गांधी यांनी वारंवार प्राण पणाला लावून चळवळ रेटली हे खरे, पण आपल्याला काय करायचे आहे याबाबत त्यांच्या मनात काडीमात्र गोंडळ नव्हता. म्हणूनच नेहरू असो वा अन्य काँग्रेसी, गांधी नावाचे चलनी नाणे ते वापरू शकले ते गांधींचा अस्त झाल्यावरच. त्यांच्या हयातीत नाही. महात्मा गांधी व्हायला निघालेले अण्णा हजारे यांच्या बाबतीत हे घडले नाही. कोणी स्वतःच्या सत्ताकांक्षेसाठी वापरून घेत आहे, हे इंग्रजी नि हिंदी वाहिन्यांच्या मखरात बसलेल्या अण्णांना कळालेसुद्धा नाही. एकदा केजरीवाल नावाचा शिक्का बाजारात चालू लागल्यावर याच वाहिन्यांनी अण्णांना फुटक्या कवडीचीही किंमत द्यायचे बंद केले.
दिल्लीच्या दरबारी राजकारणात मुरलेल्या आणि नोकरशाहीची मलई खालेल्ल्या केजरीवालांनी अण्णांना हातोहात बनवले. भ्रष्टाचार निर्मूलन करायचे असेल तर आधी राजकारणात या, या काँग्रेसच्या आवतणाची जणू केजरीवाल वाटच पाहत होते. ती पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यांनी पहिल्यांदा अण्णांना टाटा केला आणि निवडणुकीत उतरले. त्यानंतर पहिल्या सत्तेच्या काळात धरणेबाजी करून वेळ काढला. मग वाहिन्यांनी मारलेल्या पंपाच्या जोरावर मोदींना अपशकुन करण्याच्या मोहिमेवर ते निघाले. तिथे डाळ शिजली नाही तरी नंतर दिल्लीकरांनी त्यांच्या पदरात भरभरून यशाचे माप टाकले. अन् ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशा या टोळक्याची छिद्रे उघडी पडू लागली.
मुळातच भंपक आणि भुरट्या असलेल्या एका पुरुषाला अण्णांनी महापुरुष केला. ‘अकाले बाढ़े सकाले मरते’ या बंगाली म्हणीप्रमाणे अवेळी भरते आलेला चळवळीचा तो पूर ओसरला आहे. अन् पुराच्या पाण्याचा फुगवटा उतरला की विध्वंसाच्या खुणा जशा उघड्या पडतात, तशी ‘आम आदमी पक्ष’ नावाच्या टोळीची वैगुण्ये बाहेर पडत आहेत.

आता भलेही स्वतः अण्णा हजारे केजरीवाल यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे म्हणत असले, तरी बाजी त्यांच्या हातातून निसटली आहे. जंतरमंतरवर बसून त्यावेळी त्यांनी जी लोकपालची छा-छू केली, त्यातून निर्माण झालेले भूत अशा रीतीने उतरणार नाही. अण्णांना आंदोलनच करायचे असेल, तर त्यासाठी नवीन आरोप सिद्ध होण्याची वाट कशाला पाहतायेत? ‘मैं हूं अण्णा’ नावाच्या ज्या टोप्या व टी-शर्ट 2011 च्या आंदोलनात विकण्यात आला, त्याचा हिशेब अण्णांनी कधी मागितला आहे काय ? तो व्यापार कोणाच्या संमतीने आणि पुढाकाराने झाला? किरण बेदी, प्रशांत भूषण हेही अण्णांचे लोकपाल आंदोलनातील सहकारी होते. अण्णांचे मार्केटिंग करण्यात त्यांचाही हात होताच. मग त्यांना व योगेंद्र यादव यांना आम आदमी पक्षातून हाकलण्यात आले तेव्हा अण्णांनी जंतरमंतरवर धाव का नाही घेतली?
सगळा बैल गेल्यानंतर आता झोपा करण्याचे भान अण्णा हजारेंना येतेय. ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता बदलले आहेत. त्यांच्या डोक्यात आता राजकारण घुसले आहे. माझा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे,’ असे आता म्हणून काय उपयोग? केजरीवाल यांच्या डोक्यात राजकारण होते म्हणूनच ते इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये सामील झाले. तेवढ्याकरिता त्यांनी अण्णांना उचलून दिल्लीत नेले होते. त्यावेळी केजरीवालांना कोणी ओळखत नव्हते आणि अण्णांकडे पुण्याई होती. आता केजरीवाल कोणाला जुमानत नाहीत आणि अण्णांना कोणी विचारत नाही. मुंबईच्या आझाद मैदानात – नव्हे, खुद्द त्यांच्या राळेगण सिद्धीत – त्यांच्या आंदोलनाचा कसा फज्जा उडाला हे सगळ्या जगाने पाहिले आहे. याचा अर्थ दिल्लीत त्यांचे एकमेव आंदोलन यशस्वी झाले कारण ते कोणाला तरी यशस्वी व्हायला हवे होते.
त्यामुळे त्यांनी आता कितीही आंदोलन वा चळवळीच्या गमजा केल्या तरी त्याला काही अर्थ नाही. त्यांच्या ‘लोकपाल’ वा ‘ इंडिया अगेन्स्ट करप्शन’ने कधी बाळसे धरलेच नव्हते. तो थाटमाट, ते भारावलेपण आणि तो रोमांच हे सगळेच पूर्वनियोजित संहितेनुसार घडत होते. प्रत्येक शोकांतिकेमध्ये असेच असते. महत्त्वाकांक्षी नायक स्वतःची योजना घडवतो आणि नियती त्या योजनेला धक्का देते. पंजाब व गोवा निवडणुकांच्या निमित्ताने नियतीने केजरीवाल नामक महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या नायकाला धक्का दिला आहे. इथून पुढची वाटचाल शोकांतिकेकडे आहे – अन् त्यात अण्णा हजारेंना काहीही स्थान नाही!

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा