वा, पुतिन वा!

Vladimir Putin

Vladimir Putinरशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एक धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. मानवाधिकार, लोकशाही हक्क वगैरे थोतांडाच्या पाश्चिमात्य कल्पनांचा कित्ता गिरवत नसल्यामुळे या देशांचा त्यांच्यावर खास दात आहे. सोव्हियेत रशिया कोसळल्यानंतर अमेरिकेचे एकछत्र अंमल येणार आणि रशियासहित सर्व देश त्यापुढे मान झुकविणार, असा एक समज होता. पुतिन यांनी खासकरून त्याला धक्का दिल्यामुळे त्यांच्याबद्दल जरा अधिकच आकस. त्यामुळे पाश्चात्य माध्यमे सहसा त्यांच्याबद्दल बरे बोलत नाही. अन् अमेरिकी माध्यमांच्या बेबी फूडवर जगणारे भारतीय माध्यमेही तीच री ओढतात. पण ठामेठोक पुतिननी यातल्या कुठल्याही गोष्टीला हिंग लावूनही विचारलेले नाही.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरीताई क्लिंटन यांचा विजय त्या पक्षाने व उदारवाद्यांनी गृहितच धरला नाही. तो झाला नाही तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या मदतीने यश मिळविले, असा दावा करण्यापर्यंत अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए आणि अध्यक्ष बराक ओबामा यांची मजल गेली.

“अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला आणि डोनाल्ड ट्रम्प हे रशियाच्या मदतीने निवडणूक जिंकले. रशियानेच क्लिंटन आणि जॉन पॉडेस्टा यांचे इ-मेल हॅक केले होते. हे इ-मेल हॅक झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना लाभ झाला आणि अध्यक्षपदाची निवडणूक ते सहजपणे जिंकू शकले. सायबर सुरक्षेतील तज्ज्ञ आणि गुप्तचर अधिकाऱ्यांना इ-मेल हॅकिंगमध्ये रशियाचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत,” असे त्यावेळी सीआयएने म्हटले होते. आपली कारकीर्द संपण्याच्या आत ही चौकशी पूर्ण करून अहवाल देण्यास अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले होते.

एवढ्यावर थांबते तर ते उदारवादी कसले? अध्यक्षीय निवडणुकीत जी हॅकिंग झाली, त्यात पुतिन हे स्वतः सामील होते, असा आरोपही करण्यात आला. अमेरिकी वृत्तवाहिनी एनबीसीने या संबंधात बातमी दाखवली होती. हिलरी क्लिंटन यांचा बदला घेण्यासाठी पुतिन यांनी हॅकिंग घडवून आणली. खूप तपास व चौकशी केल्यानंतर आमची खात्री झाली आहे, की पुतिन या हॅकिंगमध्ये सामील होते, असे दोन अधिकाऱ्यांनी एनबीसीला सांगितले होते.

ट्रम्प यांच्या विजयानंतर एकीकडे निदर्शने आणि मोर्चे निघत होते तेव्हाच्या या घडामोडी होत्या. हे आरोप मुळातच बाष्कळ. ते खरे असल्याचे वादासाठी मान्य केले, तरी एखाद्या महाशक्तीला ते शोभेसे नव्हते. परंतु वावदूकपणा करणारच अशा इर्षेने कोणी तो करत असेल तर थांबवायचे कसे? स्वतःला लिबरल म्हणवून घेणाऱ्यांना पराभव पचवणे जड जात आहे, एवढंच त्यातून दिसत होते.

मात्र सोनारानेच कान टोचावेत, तसा खुद्द पुतिन यांनीच हा पराभव पचवा असा थेट सल्ला या लोकांना दिला आहे. “अमेरिकेचे नेते आपल्या सगळ्या समस्यांकरिता परदेशी कारणे शोधत असतात. या संबंधांत माझे स्वतःचे वेगळे विचार आहेत. अध्यक्षपदासहित सिनेट व काँग्रेसच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्ष मागे पडला. अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांत रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले. या दोन सभागृहांतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या पराभवालाही आम्ही जबाबदार आहोत का. त्यांना सन्मानाने पराभव स्वीकारायला हवा,” असे पुतिन म्हणाले. रशियन आणि परदेशी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवादाच्या वार्षिक कार्यक्रमात पुतिन यांनी थेट शरसंधान केले. त्यांचा रोख खासकरून हिलरी क्लिंटन यांच्यावर होता, हे उघड आहे. त्यांची एक एक विधाने पाहिली तर सणसणीत आणि खणखणीत अशीच त्यांची वर्गवारी करावी लागेल. मग आपोआपच भले शाब्बास म्हणून कौतुकाची थापही द्यावी वाटेल.

हॅकिंगच्या आरोपांची तर त्यांनी पार टर उडवली. “पराभूत होणारा पक्ष नेहमी आपल्या पराभवाची कारणे इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी आपल्या स्वतःच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, हे बरे. हे हॅकर कोण होते, हे कोणाला माहीत?”

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने केल्याचा आरोप अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासहित सीआयए आणि डेमोक्रॅटिक पक्षाने केला होता. या संबंधात ते म्हणाले, “डेमोक्रॅटिक पक्ष कदाचित स्वतःच्या नावाचा अर्थ विसरला असावा. म्हणूनच त्याने निवडणुकीत सरकारी साधनांचा दुरुपयोग केला. म्हणूनच मतदात्यांच्या आदेशानुसार मतदान करू नका, अशी विनंती त्यांनी मतदात्यांच्या प्रतिनिधींना (इलेक्टोरल कॉलेज) करणे सुरू केले,” असे ते म्हणाले.

” आज रेगन असते तर रिपब्लिकन पक्ष जिंकत आहे म्हणून आनंदीत झाले असते. डोनाल्ड ट्रम्पही खुश झाले असतील. मात्र आमच्या आणि तुमच्याशिवाय कोणालाही वाटत नव्हते, की या निवडणुकीत ट्रम्प जिंकतील. मात्र प्रमुख डेमोक्रॅट नेते आपल्या शवपेटीत जरूर कूस बदलत असतील. हे मी खरे बोलतोय,” असेही ते म्हणाले.

Be the first to comment

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा