जयललिता : रजनीकांतच्या विधानात वेगळे काय?

Uncategorized, जे जे आपणासी ठावे

तमिrajinikanth-jayalalithaळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या शोकसभेत बोलताना “१९९६ साली जयललितांचा पराभव माझ्यामुळेच झाला होता,” हे विधान सुपरस्टार रजनीकांत यांनी केले. या विधानाने ज्यांना धक्का बसायचा त्यांना बसेल, पण तमिळनाडूची आणि रजनीकांतच्या चाहत्यांच्या दृष्टीने त्यात नवीन काहीही नाही. १९९६ साली रजनीकांत यांच्या एका विधानाने विधानसभा निवडणूक फिरली होती आणि अण्णा द्रमुकचे सरकार गडगडले होते, हे पुरेसे उघड सत्य आहे. विरोधी द्रमुक-तमिळ मानिला काँग्रेसचा (तमाका) विजय त्यावेळी प्रशस्त झाला होता.

जयललिता सत्तेवर आल्या १९९१साली. त्यानंतर सत्तेच्या नवलाईत त्यांनी अनेक आगळीकी केल्या. उतमात केला. त्याच्या विरोधात जो असंतोष उसळला त्यातील एक स्वर तलैवा (नेते) रजनीकांत यांचाही होता. १९९१ ते १९९९ पर्यंत आलेल्या रजनीच्या चार चित्रपटांमध्ये या वादाचे प्रतिबिंब उमटले आहे.

१९९२ साली आलेल्या ‘मन्नन’ चित्रपटात नायकाचा एका गर्विष्ट महिलेशी सामना होते. त्याच वर्षी आलेल्या ‘अण्णामलै’ चित्रपटातील एका दृश्यात नायक रजनी मंत्र्याला म्हणतो, “जनतेने दिलेली सत्ता आहे तर ती जनतेसाठी वापरा.” हा जयाम्मांवर मारलेला शेराच होता, हे रसिकांनी समजून घेतले. याच चित्रपटातील सायकलवर बसलेल्या रजनीकांतचे छायाचित्र हे द्रमुक-तमाका युतीचे मुख्य साधन ठरले होते.

त्यानंतर ‘मुथ्थु’ चित्रपटात नायिकेला उद्देशून एक संवाद आहे – “शिंक, खोकला, झोप आणि सत्ता ही ये म्हटल्याने येत नाही आणि जा म्हटल्याने जात नाही.” हा चित्रपट १९९५ साली म्हणजे जयाम्मांची सत्ता जाण्याच्या केवळ एक वर्ष आधी आला होता. याच ‘मुथ्थु’मध्ये “मी केव्हा येईन, कधी येईन कोणीही सांगू शकत नाही, मात्र मी यायच्या वेळीस नक्की येतो,” हा त्याचा संवादही राजकीय प्रवेशाची नांदीच मानण्यात आला होता.

१९९६ च्या निवडणुकीत रजनीकांत यांनी वक्तव्य केले होते, की जयललिता यांना पुन्हा सत्ता मिळाली तर ईश्वरसुद्धा तमिळनाडूला वाचवू शकणार नाही. त्यांचे हे विधान द्रमुकने वारंवार वाजवून सत्ता मिळविली होती.

त्यानंतर १९९९ साली आलेल्या ‘पडैयप्पा’त तर बाईच खलपात्र आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपटभर नायक आणि खलनायिकेचा संघर्षच आहे. १९९९ सालच्या फेब्रुवारीत हा चित्रपट आला होता. त्यावेळी एन वळी तनी वळी या त्याच्या खास ‘पंच डायलॉग’ने संपूर्ण तमिळनाडूला वेड लावले होते. या चित्रपटाच्या एका दृश्यात तो खलनायिकेला म्हणतो, ‘पोंबळ पोंबळेया इरुक्कनुम’ (बाईने बाईसारखे रहावे). त्यावेळी अख्ख्या थिएटरमध्ये ‘जयललिता…जयललिता’चा आवाज घुमायचा.

याट पडैयप्पा तील आणखी एका दृश्यात एक संवाद आहे – “’तुझ्याकडे सत्तेची शक्ती आहे, माझ्याकडे जनतेची शक्ती आहे. माझ्या शक्तीपुढे तुझी शक्ती जुजुबी आहे”. “प्रमाणाबाहेर लोभ असलेला पुरुष आणि प्रमाणाबाहेर संताप असलेली बाई आयुष्यात कधीही सुखी होत नाहीत, ” हा ‘पडैयप्पा’चा पंच डायलॉग (मर्मवाक्य) असल्याचे मानण्यात येत होते. अन् हे सर्व जयललितांना लक्षित करूनच होते, हाही सर्वसाधारण समज होता.

तेव्हा रजनीकांत हे जयाविरोधाचे प्रतीक बनले. एवढे, की करुणानिधि यांनी ज्योतिषाकडे जाऊन रजनीकांत राजकारणात येतील का, याची चाचपणी केली होती. जेणेकरून त्यांच्या कारकीर्दीला बाधा पोचू नये.

त्यामुळे माझ्यामुळे जयललितांचा पराभव झाला, हे रजनीकांत यांचे विधान अजिबात नवे नाही. मात्र या संघर्षानंतर दोन्ही बाजूंनी जो बदल दडवण्यात आला, तो अधिक महत्त्वाचा आआहे. एकदा पराभव चाखल्यानंतर जयललितांनी आपली वृत्ती कायम ठेवली, तरी कार्यशैलीत आमूलाग्र बदल केला. लोकप्रियतेच्या बाबतीत आपल्यापेक्षा कांकणभर सरस असलेल्या रजनीकांत यांच्याशी त्यांनी कधीही पंगा घेतला नाही. त्यामुळेच २००१ साली त्यांनी कावेरी पाणी वाटप प्रश्नी उपोषण केले, तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्यांमध्ये रजनीकांत अग्रभागी होते.

रजनीकांतचा यांचा महत्त्वाकांक्षी ‘शिवाजी’ प्रदर्शित झाला, तेव्हा पहिल्या खेळाला हजेरी लावून त्याचे कौतुक करणाऱ्यांमध्ये जयललिताही होत्या. शेवटी, काल रजनीकांत यांनी उल्लेख केल्याप्रमाणे त्या रजनीकांत यांच्या मुलीच्या लग्नालाही हजर राहिल्या.

यावरून कळते ते हे, की थोडा समंजसपणा दाखवला तर कितीही ताणलेले संबंध असू दे, ते सुरळीत होऊ शकतात. शिवाय सत्तेपुढे शहाणपण चालत नसले, तरी ते आपल्या पायावर उभे राहू शकते. सत्ता कितीही बेफाम असली, तरी तिला कधी ना कधी शहाणपणाच्या नजरेला नजर भिडवावी लागते!

2 comments

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा