आता तो काय बोलणार?

जे जे आपणासी ठावे

rajinikanth रजनीकांतपोंगल, जल्लिकट्टू, कार्तिकै दीपम इत्यादी दिवसांच्या बरोबरीने तमिळनाडूत आणखी एक महत्त्वाचा दिवस उत्सवाचा असतो, तो म्हणजे 12 डिसेंबरचा. स्टाईल किंग उर्फ तलैवा उर्फ रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड यांचा हा वाढदिवस. साधारणतः या दिवसाच्या आगेमागे चाहत्यांची भेट घेण्याचा त्यांचा रिवाज आहे. यंदा ही पर्वणी नाताळच्या दुसऱ्या दिवशी येणार आहे. येत्या 26 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत रजनीकांत हे चाहत्यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांच्या अधिकृत ऑल इंडियन रजनीकांत फॅन्स असोसिएशनने सुरक्षा पुरविण्याची मागणी चेन्नई पोलिसांकडे केली आहे. प्रत्येक दिवशी 1000 लोक येण्याची अपेक्षा असल्याचेही असोसिएशनने म्हटले आहे.

अर्थातच या घटनेने तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. रजनीकांत हे 12 डिसेंबर या आपल्या वाढदिवशी नवीन पक्ष स्थापन करतील आणि राजकारण प्रवेशाची घोषणा करतील, अशी चर्चा नेहमीप्रमामे होती. परंतु इतक्यात राजकारणात येणार नसल्याचे त्यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते. आता पुन्हा या घडामोडीने त्या चर्चेला उकळी फुटली आहे. आता तो काय करणार, काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

आता ते काय बोलणार, याचा अदमास घ्यायचा असेल तर गेल्या वेळेस ते काय म्हणाले होते, हे बघायला पाहिजे. आता आपण गेल्या वेळेस, म्हणजे 15 मे 2017 रोजी काय म्हणाले होते ते पाहू.

“मी सिनेक्षेत्रात पाहिलेली आदरणीय व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक एस. पी. मुथ्थुरामन. त्यांच्याकडून मी प्रामाणिकता, नम्रता अशा अनेक गोष्टी शिकलो. एस. पी. मुथ्थुरामन जेव्हा जेव्हा मला भेटत तेव्हा “रजनी, शरीराकडे लक्ष दे. बिलकुल हयगय नको करू,” असे उपदेश करत असत. चाहत्यांना भेटतानाही साथ देत. मी एस. पी. मुथ्थुरामन यांच्याकडे पहिल्यांदा काम केले ‘आरिलिरुंदु आरुपदुवरै’ चित्रपटात नायक म्हणून. त्यावेळी जे घडले ते सांगताना लाज वाटते. परंतु ते सांगायलाच पाहिजे. त्यावेळी मला मद्यपानाचे व्यसन होते. रात्री काम झाले, की मस्त झोपी जायचे (ही सवय होती). सकाळी उठून चित्रीकरणाला जाण्यास उशीर व्हायचा.

“एव्हीएम स्टुडियोत त्यांच्या चित्रीकरणाला सतत चार दिवस उशिरा गेलो. एस. पी. मुथ्थुरामन यांनी मला बोलावले आणि सांगितले, “तू या चित्रपटाचा नायक म्हणून काम करतोयस. नायक वेळेवर आला तरच सगळे वेळेवर येतील. नायक उशिरा आला तर बाकीचेही उशिरा येतात. त्या दिवसापासून आजपर्यंत चित्रीकरणाला येणारा मी पहिला व्यक्ती असतो. या पातळीपर्यंत मोठ्या भावासारखे ते मार्गदर्शन करत असत.

“चाहत्यांना भेटून मला 12 वर्षे झाली आहेत. पूर्वी चित्रपट 50 दिवस, 100 दिवस असे चालत तेव्हा ते यश साजरे करत असू. त्यावेळी आपण भेटत असू. एकमेकांना प्रत्यक्ष पाहत असू. दहा बारा वर्षांपासून अशी भेट झाली नाही. ‘एन्दिरन’ छान चालला, परंतु काही कारणाने त्याचे यश साजरे करण्यात आले नाही. त्यानंतर ‘कुसेलन’, ‘कोच्चडैयान’ व्यवस्थित चालले नाहीत. ‘कबाली’ चांगला चालला, परंतु त्याचेही यश साजरे करता आले नाही. त्यामुळे चाहत्यांना भेटता आले नाही. आता भेटण्याची संधी आली आहे.

“या भेटीचेही नियोजन करून ते पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर ‘2.0’ चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाचे काम आहे. मग माझ्या पुढच्या चित्रपटाला येत्या 28 तारखेला सुरूवात करणार आहोत. त्यासाठी कथेवर चर्चा चालू आहे. त्यामुळे लगेचच भेटीची व्यवस्था करता आली नाही. त्यासोबतच माझा श्रीलंका दौराही रद्द झाला.

“लगेच काही लोक म्हणतात, की रजनीकांत कोणत्याही गोष्टीत स्थिर नसतो, दरवेळी विचार बदलून योजना रद्द करत असतो. तो कचरतो, घाबरतो असे बोलतात, लिहितात. कुठल्याही बाबतीत मी विचारपूर्वक निर्णय घेतो. काही बाबतीत मात्र निर्णय घेतल्यानंतरच त्यात काय समस्या येतील, हे आपल्याला कळते. आपण पाण्यात पाय ठेवतो.पाण्यात पाय टाकल्यानंतरच त्यात किती शेवाळ आहे, हे आपल्याला कळून येते. त्यावेळी पाण्यातून पाय काढणार नाही म्हटल्याने चालते का? म्हणून अविचारी धाडस असता कामा नये.

“राजकारणाच्या बाबतीतही रजनी स्पष्टपणे काही बोलत नाही. नेहमी अस्पष्ट बोलतो असे लोक म्हणतात. लोकांनी चित्रपट बघण्यासाठी यावे म्हणूनच राजकारणात प्रवेश करण्याची हूल उठवतो, असेही ते बोलतात. एकवीस वर्षांपूर्वी एक राजकीय अपघात घडला आणि एका राजकीय आघाडीला पाठींबा देण्याची वेळ माझ्यावर आली. मला जगविणाऱ्या देवासमान तामिळ जनतेनेसुद्धा त्या आघाडीला आपली मते देऊन त्यांना विजयी केले. तेव्हापासून माझे नाव राजकारणाशी जोडले जाऊ लागले. चाहत्यांनीही राजकारणात जोमाने भाग घ्यायला सुरुवात केली.

“काही राजकारणी चाहत्यांचा वापर करून घेतात. काही चाहते सुद्धा राजकारण्यांचा उपयोग करून घेतात. त्यातील अनेकांनी त्यातून खूप पैसेही कमावले आहेत. भुंगा जसा फुलांकडे आकर्षित होतो तसे त्यांना त्याचे आकर्षण वाटते. नंतर निवडणूक आली की हा त्याच्याकडे आणि तयाच्याकडे अशी फिरवाफिरव सुरू होते. त्यातील काहीजण माझ्या नावाचा वापर करून मी माझा त्यांना पाठिंबा आहे असा दावा करतात. त्यामुळे प्रत्येक निवडणूक आली की माझा कोणालाही पाठिंबा नाही असे मला जाहीर करावे लागते.

“मी काही कोणी मोठा नेता किंवा समाजसेवक नाही. माझे नाव घेऊन घेऊन कोणी आला तर त्याच्यामुळे फसवणूक होऊ नये यासाठी मी हे स्पष्टपणे सांगत आहे. कितीतरी चाहते मला विचारतात, की आम्ही असे चित्रपट पाहत चाहते म्हणूनच राहावे का, आम्ही प्रगती कधी करणार? आमच्यासमोर कितीजणांनी राजकारणात येऊन पांढरे झक्क वेश घालून इनोव्हातून फिरायला सुरुवात केली. त्यातले काहीजण आमदार झाले.आम्ही कधी पैसे कमवायचे आणि आम्ही कधी प्रगती करायची? अशा प्रकारची पत्रे मला अनेकजण लिहितात.

“यात काही चुकीचं नाही. नगरसेवक व्हावं, आमदार व्हावं अशी आशा बाळगण्यात काही चूक नाही परंतु ते होऊन आपण खूप पैसे कमवावेत ही इच्छा बाळगणार्‍यांना पाहून हसावे, रडावे की त्यांच्यावर संताप करावा, हेच मला कळत नाही.

“मी हे मागेही सांगितलंय, आताही सांगतो की माझे आयुष्य ईश्वराच्या हातात आहे. मी ते ईश्वराच्या हातातला एक पक्षी आहे. ईश्वर मला चालवतो आणि तो चालवतो तसे मी चालतो. आता मी अभिनेता असावे अशी त्याची इच्छा आहे. म्हणून मी अभिनेता आहे. उद्या मी काय असावं असी त्याची इच्छा आहे, हे मला माहीत नाही. मी जे असं त्याला वाटतं, ते मी पूर्णपणे मनापासून आणि प्रामाणिकपणे करेन. सध्या मी अभिनेता म्हणून माझे कर्तव्य पार पाडत आहे. लोकांचे मनोरंजन करणे, लोकांना आनंद देणे हे महत्त्वाचे; पैसा वगैरे बाकी सगळे नंतर!

“देवच आपल्याला चालवत असतो अध्यात्मात असल्यामुळे मला हे माहित आहे. वाईट काम करत असू तर आपले मनच आपल्याला सांगते की हे काम करायला नको. राजकारणाची आशा लावून बसलेल्या चाहत्यांना मी एक सांगतो, तुम्हाला वाटते त्याप्रमाणे मी राजकारणात येणार नाही. एखाद्या वेळेस मी राजकारणात आलो ही तरी पैसे कमावण्याची इच्छा असणाऱ्यांना शेजारीसुद्धा उभे करणार नाही. ती तयारी असणाऱ्यांनीच माझ्या सोबत यावे नाहीतर तुम्हाला निराशा होईल.”

“एवढे सगळे सांगितल्यानंतर गेल्या महिन्यात तर रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे स्पष्टच सांगितले होते. आंध्र प्रदेशातील मंत्रालयम येथे श्री राघवेंद्र स्वामी मठात दर्शन केल्यानंतर रजनीकांत गुरुवारी चेन्नईला परतल्यावर ते हे बोलले होते. ‘‘माझ्यासाठी राजकारणात येण्याची ही वेळ नाही. राजकारणात येण्याची घाई करायची नाही,’’ असे ते म्हणाले होते.

“त्यामुळे आता 26 डिसेंबरच्या संवादात राजकारण प्रवेश वगैरेची आस लावून बसलेल्यांच्या हाती निराशाच लागणार आहे. रजनीच्या लकबींवर फिदा असलेल्यांसाठी मात्र ही पर्वणीच असणार आहे.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा