भाजप जिंकला पण हरले कोण?

जे जे आपणासी ठावे

IMG-20170223-WA0008.jpgनगरपालिकांच्या निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. पक्षाने अलीकडेच ज्यांची महाभरती केली, त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर ‘कल्ला केला’. आता जे निवडून आले त्यांच्यामध्ये मूळ भाजपनिवासी किती आणि भाजपवासी झालेले किती, हा प्रश्न वेगळा! राज्यातील दहा महापालिकांच्या शर्यतीत भारतीय जनता पक्ष पहिला आला, हे तर निर्विवाद आहे. आता कोणी त्याला सत्ता आणि संपत्तीच्या बळावर घेतलेली उडी म्हणो अथवा घाऊक पक्षांतरामुळे आलेली सूज म्हणो. अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या मुकाबल्यात भाजप विजेता म्हणून समोर आला, हे खरे. पण भाजप जिंकला तर हरले कोण? एखादा पक्ष (बाजू या अर्थाने) जिंकला असे आपण म्हणतो तेव्हा त्याने कोणाचा तरी पराभव केलेला असायला हवा. आता भाजप हा विजेता ठरला असेल, तर पराभूत कोण झाले?

काँग्रेसमुक्त भारत व्हावे, अशी प्रामाणिक इच्छा बाळगणाऱ्यांना काँग्रेसचा पराभव झाला असे वाटण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी काँग्रेसने या स्पर्धेत भाग घ्यायला हवा होत. तो त्या पक्षाने कधीच घेतला नाही. गल्लीतल्या खेळात क्रिकेटमध्ये एखाद्या मुलाने फलंदाजी केल्यानंतर क्षेत्ररक्षणाची त्याच्यावर वेळ येते, तेव्हा तो मुलगा टॅम्प्लिज म्हणून मैदानाबाहेर जातो. मुळात क्षेत्ररक्षण टाळण्याचा त्याचा प्रयत्न असतो. काँग्रेसचा प्रयत्न असाच आहे. त्याचा सत्ताकाळ झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी राजकारणाच्या खेळातून आपले अंगच काढून घेतले आहे. आपली मरगळ झटकण्याचाही प्रयत्न काँग्रेसने केला नाही. पंजा दाखवून अवलक्षण नको, असा सूज्ञ विचार काँग्रेसने केला होता. त्यामुळे त्याची पराभव भाजप करूच कसा शकेल? बहुमुखी प्रतिभेचे धनी असलेल्या काँग्रेसी मंडळींनी एकमुखाने तो कधीचाच मान्य करून ‘मी नाही खेळणार जा,’ असे सांगून ठेवले होते. त्यामुळे तो प्रश्न मिटला.

‘अस्तित्वाची लढाई’ म्हणून लढणाऱ्या शिवसेनेला धूळ चारली म्हणावे तर तसेही नाही. ‘मुंबई एके मुंबई’ हा शिवसेनेचा आधीपासून धोशा होता. त्यानुसार आपला बालेकिल्ला सेनेने जपला, इतकेच नाही तर तिच्या जागाही वाढल्या आहेत. शिवसेनेकडून मुंबई हिरावणे, हे भाजपचे स्वप्न होते, असा अनेकांनी समज करून घेतला होता. तसे असेल, तर ते काही झालेले नाही. इतकेच नव्हे, तर ठाण्यातही शिवसेनेने यश मिळविले आहे. मुंबई-ठाणे आणि कोकण एवढा पट्टा शिवसेनेकडे राहिला, की शिवसेनेचा अखंड महाराष्ट्राचा जाज्वल्य अंगार जागृत राहतो. त्या जागृतीला बाघ आणण्यात भाजपला फारसे यश आलेले नाही. सोलापुरातही शिवसेनेची कामगिरी भाजपपेक्षा चांगली आहे. खुद्द भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून सर्वांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगून मुळात हा ‘सामना’ नसल्याचे निक्षून सांगितले होते. त्यामुळे हा शिवसेनेचाही पराभव नाही.

हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का आहे, असे म्हणावे तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड वगळता एनसीपीचे फारसे नुकसान झालेले नाही. बहुतांश जिल्हा परिषदेमध्ये रा. काँग्रेसचीच सत्ता परत आली आहे. भाजपनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रा. काँग्रेसच्या मागील वेळेसच्या तुलनेत 40 टक्के जागा आल्या आहेत. जवळपास तेवढेच रा. काँग्रेसचे लोक सध्या केशरी उपरणे घेऊन फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या सात-बारावर फक्त मालकी हक्काचा फेरफार झाला आहे. नक्त मालमत्ता आहे तशीच आहे, असे म्हणावे लागेल.

 मग भाजपने नक्की पराभव कोणाचा केला? कमळाने पराभव केला तो पूर्वग्रहदूषित पॅनेलपंडितांचा. कमळाने पराभव केला स्वनामधन्य तज्ज्ञांचा. कमळाने पराभव केला तो हस्तीदंती मनोऱ्यात बसलेल्या निरीक्षकांचा. विश्लेषणाच्या नावावर स्वतःचे कल्पनाचित्रच लोकांपुढे मांडून तेच खरे आहे, असे भासविणाऱ्या सगळ्या प्रस्थापितांचा तोरा या एका निकालाने उतरवला आहे. भाजपला जनतेचा एवढा कौल मिळेल, हे कोणालाच कळाले नाही (माझ्यासकट).

भाजप सरकारवर समस्त जनता नाराज आहे आणि पहिल्या फटक्यात ती या पक्षाला त्याची जागा दाखवून देईल, हे छातीठोकपणे सांगणाऱ्यांचे एक पीक गेली दोन-अडीच वर्षे राज्यात आले आहे. खासकरून नोटाबंदीनंतर हे पीक खूपच तरारून आले आहे. रात्री एखाद्या बारमध्ये बसून दोन पेग घशाखाली उतरवायचे आणि बळीराजाच्या नावाने शहरी बोंब ठोकायची, हा यांचा आवडता धंदा. (जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्य आपण गेल्या दोन महिन्यांत कितीदा ऐकले असेल?) पण यांचे दुर्दैव असे, की नोटाबंदीनंतर झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये लोकांनी त्या निर्णयाच्या कर्त्या-करवित्याच्या बाजूनेच दान टाकले आहे.

पुण्यात भाजपच्या अंतर्गत रस्सीखेचीतून मुख्यमंत्र्यांच्या सभेची फटफजिती झाली, तेव्हा तर या पोटदुखे मंडळींना उकळ्या फुटल्या होत्या. आता मुख्यमंत्री तोंडघशी पडणार, याची खात्री झालेल्यांना स्वर्ग दोन बोटे उरला होता. पण मुख्यमंत्री तोंडघशी पडणे राहो, या मंडळींचीच दातखिळी बसायची वेळ आली. बैलांच्या शिंगांना पेटते पलिते बांधून दुष्मनांची दिशाभूल करण्यास आतापर्यंत कात्रज करणे म्हणत असत. आता रिकाम्या खुर्च्या दाखवून धूळ चारण्याला पालिका करणे म्हणायला लागतील. मुख्यमंत्र्यांचा घसा बसण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीना अवास्तव महत्त्व देणाऱ्यांचा हा पराभव आहे. पराचा कावळा आणि राईचा पर्वत करून आपली टिमकी वाजविणाऱ्यांना बसलेली ही चपराक आहे. ज्ञान धावते पण शहाणपण रांगते म्हणतात. पॅनेलपंडितांचे ज्ञान कितीही रांगत असले, तरी त्यांचे शहाणपण अद्याप रांगतच आहे, याचा हा ढळढळीत पुरावा आहे. तसे नसते, तर शेटजी-भटजींचा पक्ष आणि शहरी लोकांचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपला एकाच फटक्यात मनपा व जि. प. मध्ये असे घबाड मिळाले नसते. एवढे होऊनही जाती आणि धर्माभोवती फिरणारे आपले साचेबद्ध विश्लेषण बदलण्याची गरज आम्हाला वाटत नाही.

IMG-20161221-WA0004.jpgजलयुक्त शिवार, बाजार समित्या कायदा रद्द करणे आणि सहकारी कायद्यात बदल करणे, ही फडणवीस सरकारची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची कामगिरी. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांच्या ज्या जुलुमातून सुटका झाली, त्याची दखल घ्यायलाच कोणी तयार नाही. शेतकरी म्हटले की आभाळाकडे पाहत पावसाची वाट पाहणारा खेडूत किंवा अवकाळी पावसाने पीक गारद होणारा गावकरी, याच्या पलीकडे आमची धाव जात नाही. मोदी शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असतील आणि शहरी फडणवीसांना ग्रामीण प्रश्न कळत नसतील, तर ग्राम पंचायतीपासून महापालिकांपर्यंत भाजपला बळ का मिळतेय? शून्य ग्रामीण असलेल्या मुंबई-ठाणे पट्ट्यात शिवसेना पुढे जाते आणि पुणे, पिंपरी चिंचवड, अकोला, नाशिक, अमरावती येथे भाजप वरचढ ठरते. या नंतरच्या पालिका शहरांच्या असल्या, तरी मुख्यतः खेड्यांमधून आलेल्या लोकांनी बनलेली आहेत. अन् तिथे कमळ फुलते म्हणजे आपल्या मूलभूत विश्लेषणात काही तरी गफलत होते आहे, याचा विचार कोणीच करत नाही. तो होत नाही, तोपर्यंत अशा आणखी पराभवांना तयार रहावे, हेच बरे.

कृपया येथे प्रतिक्रिया नोंदवा